वाचन संस्कृतीची जोपासना करणे हे एक व्रत आहे. वर्षांनुवर्षे कोणत्याही प्रसिद्धीची आणि पुरस्काराची अपेक्षा न करता हे काम करावे लागते. महोत्सवी वातावरणापासून दूर राहून अनेकजण हे काम निरलसपणे करीत असतात. डोंबिवलीतील पुंडलिक पै त्यापैक एक. मूळचे कन्नड भाषिक असणाऱ्या मात्र डोंबिवलीसारख्या सांस्कृतिक शहरात शिक्षण झाल्याने मराठी भाषेवर अतोनात प्रेम असणाऱ्या पुंडलिक पै यांनी आपल्या फ्रेंड्स ग्रंथालयाच्या माध्यमातून अखंडित सुरू राहणारी ग्रंथोपासना डोंबिवलीत सुरू केली. पेंढरकर महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर पुंडलिक पै यांची नोकरी करण्याची इच्छा नव्हती. लहानपणापासूनच पुस्तकांची आवड असल्याने आपले एखादे ग्रंथालय असावे असे त्यांचे स्वप्न होते. याच उद्देशातून २२ मे १९८६ रोजी पुंडलिक पै यांनी डोंबिवलीमध्ये टिळकनगर परिसरात फ्रेंड्स ग्रंथालयाची स्थापना केली.
२०१६ वर्षांत तीस वर्षे पूर्ण करणाऱ्या फ्रेंड्स ग्रंथालयाच्या एकूण सहा शाखा असून काळाला अनुसरून ऑनलाइन ग्रंथसेवा गं्रथालयातर्फे सुरू करण्यात आली आहे. ग्रंथालयात सध्या २ लाखांपेक्षा जास्त पुस्तकसंख्या असून जास्तीत जास्त पुस्तकसंख्या असणारे हे भारतातील पहिले ग्रंथालय आहे. ग्रंथालयात मराठी, इंग्रजी, हिंदी पुस्तकांबरोबरच कन्नड, गुजराथी भाषेतील वेगवेगळ्या पुस्तकांचा भरणा आहे. सुरुवातीला १०० पुस्तकांपासून पै यांनी ग्रंथसेवेचा प्रारंभ केला. पूर्वी ग्रंथालयात वर्षभरात ७२ सभासद होते. पुंडलिक पै यांनी ग्रंथालयाचा मोठय़ा प्रमाणात विस्तार व्हावा यासाठी अविरत प्रयत्न केले आणि सध्या ग्रंथालयात सहा हजार सभासद आहेत. ग्रंथालयाच्या सर्व शाखांमध्ये मिळून दररोज सुमारे ६०० सभासद पुस्तकांची देवघेव करत असतात. वाचकांची मागणी आणि आवड लक्षात घेऊन ग्रंथालयात नियमितपणे पुस्तकांची खरेदी होत असते. ग्रंथालयात पुस्तकांची विविधता आणि प्रती जास्त असल्याने दरवर्षी हजारएक सभासद नव्याने दाखल होतात.
बालवाचकांची संख्या कौतुकास्पद
अलीकडे लहान मुलांचे वाचन कमी झाले आहे असा नारा ऐकायला मिळतो. मात्र फ्रेंड्स गं्रथालयातील परिस्थिती कौतुकास्पद आहे. लहान मुलांसाठी वेगवेगळ्या पुस्तकांचा खजिना उपलब्ध असल्याने संध्याकाळच्या वेळी ग्रंथालयात लहान मुलांची गर्दी पाहायला मिळते. टिळकनगर परिसरातील गं्रथालयात टिळकनगर शाळेतील विद्यार्थी शाळा संपल्यावर ग्रंथालयात बसून पुस्तकांच्या सान्निध्यात पालकांची वाट पाहात असतात. १५०० हून अधिक बालवाचक ग्रंथालयाचे सभासद आहेत. सभासद नसलेली लहान मुलेही ग्रंथालयात येऊन पुस्तके वाचू शकतात हे विशेष. लहान मुलांना वाचनाची गोडी लागावी हाच त्यामागचा उद्देश.
विविध उपक्रमांची रेलचेल
वाचक आणि ग्रंथालयातील कर्मचारी यांच्यात सुसंवाद राहावा यासाठी विविध कार्यक्रमांची रेलचेल ग्रंथालयात होत असते. लेखक बालवाचक महोत्सवाच्या अंतर्गत विविध शाळांना सहभागी करून विद्यार्थ्यांच्या स्वरचित कथांची स्पर्धा घेतली जाते. तसेच शाळांमध्ये काही कूपन्स दिली जातात. ती कूपन्स भरून देणाऱ्या विद्यार्थ्यांना १०० रुपयांमध्ये हवी तेवढी पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. ग्रंथालयाच्या वर्धापन दिनाच्या दिवशी वाचक लेखक मेळावा भरवला जातो. आठवडय़ाच्या दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी फ्रेंड्स कट्टा आयोजित केला जातो. यात वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा केली जाते. तसेच दरवर्षी जागतिक पुस्तक दिन ग्रंथालयातर्फे साजरा केला जातो.

पत्ता – फ्रेंड्स ग्रंथालय, टिळकनगर शाळेसमोर, डोंबिवली (पूर्व)
वेळ – सकाळी ७.३०
ते ९, सोमवार बंद.

दोन हजार ऑनलाइन सभासद
ग्रंथालयातर्फे लेखकांसाठी मधुश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. गेली ८ वर्षे ग्रंथालयातर्फे मुंबई, पुणे, नाशिक येथे ऑनलाइन यंत्रणेच्या माध्यमातून घरपोच सेवा पुरवली जाते. ग्रंथालयाचे ऑनलाइन दोन हजार सभासद आहेत. ग्रंथालयात संगणकीकरण करण्यात आले असून २००३ साली ठाणे जिल्ह्यातील संगणकीकरण झालेले पहिले ग्रंथालय आहे. अभ्यासिका, ग्रंथालयाचा शैक्षणिक विभाग, पुस्तक विक्री विभाग अशा अनेक विभागांमुळे ग्रंथालयाचा नागरिकांना उपयोग होत असतो. पुंडलिक पै स्वत: पुस्तकांची खरेदी करत असतात. दरवर्षी पाच हजार दिवाळी अंकांची खरेदी केली जाते. पुंडलिक पै यांनी प्रदर्शनात अनेकदा आपल्या पुस्तकांच्या साहाय्याने पुस्तकांचा स्टॉल सजवला आहे. दर्जेदार साहित्य, विविध उपक्रम यासोबत वाचकांशी जपलेले स्नेह यामुळे फ्रेंड्स ग्रंथालय वाचकांना आपलेसे वाटते.