खोपटची गर्दी टाळण्यासाठी कॅडबरी जंक्शन येथे स्थलांतर

ठाणे : ठाण्यातील खोपट बसस्थानकातून पूर्वी एसटीसह बेस्टच्या बसही सोडण्यात येत होत्या. जुन्या ठाण्यातील प्रवाशांसाठी हे स्थानक सोयीचे होते. टाळेबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे खासगी कार्यालयात काम करणाऱ्या नागरिकांना बेस्ट बसचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे दररोज सकाळी खोपट बसस्थानकात बेस्टने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी होऊ लागल्याने ती टाळण्यासाठी आगार व्यवस्थापकांनी येथून सुटणाऱ्या बेस्टच्या बस कॅडबरी जंक्शन येथून सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्य शासनाने पुन्हा कडक निर्बंध लागू केले. यामध्ये अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या नागरिकांना रेल्वे आणि एसटी बसमधून प्रवास करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे खासगी कार्यालयात काम करणाऱ्या नागरिकांना प्रवासासाठी बेस्ट बसचा आधार घ्यावा लागत आहे. ठाण्यातील खोपट बसस्थानकातून दररोज मुंबईला जाणाऱ्या बेस्ट बस सोडण्यात येतात. गेल्या काही दिवसांपासून या बसस्थानकावर मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी होत होती. करोना काळात ही गर्दी टाळण्यासाठी स्थानक व्यवस्थापकांनी कॅडबरी जंक्शनहून बेस्ट बस सोडण्याचे ठरविले. हा निर्णय तडकाफडकी घेण्यात आल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. अनेक प्रवाशांना खोपट आगाराहून पुन्हा कॅडबरी जंक्शनकडे जावे लागत आहे. यामध्ये त्यांचा बराच वेळ खर्च होत असून त्यांना कार्यालयात पोहोचण्यासही विलंब होत आहे, अशी माहिती काही प्रवाशांनी दिली.

तांत्रिक कारणामुळे परवानगी नाही

ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी पूर्वी दादलानी पार्क येथून बेस्टच्या बसगाडय़ा सोडण्यात येत होत्या. गेल्या वर्षी करोनाच्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी ठाण्याहून मुंबईला जाण्यासाठी खोपट स्थानकातून बेस्टच्या बसगाडय़ा सोडण्यात येत होत्या. काही तांत्रिक कारणामुळे एसटी महामंडळाने या स्थानकातून गाडय़ा सोडण्यासाठी परवानगी नाकारली. त्यामुळे ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या या बसगाडय़ा कॅडबरी जंक्शन येथून सोडण्यात येत आहेत, अशी माहिती बेस्टच्या एका अधिकाऱ्याने दिली.

कळव्यावरून मी खोपट बसस्थानकात रिक्षाने येतो आणि बाजूलाच बेस्ट गाडय़ा लागत असल्याने सोयीचे जात होते. कॅडबरी जंक्शन येथून गाडय़ा सुटत असल्याचे माहीत नसल्याने मला खोपट बसस्थानकातून कॅडबरी जंक्शन येथे येण्यासाठी पायपीट करावी लागली. त्याचबरोबर आता कमी आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक होत असल्याने बसमध्ये बसण्यासाठी सुमारे दीड ते दोन तास प्रतीक्षा करावी लागत आहे.

– श्रेयस सनगरे, प्रवासी