नीलेश पानमंद

आर्थिक तोटय़ात असलेल्या टीएमटीत सुधारणा करण्यासाठी आणि प्रवाशांच्या तुलनेने कमी असलेल्या बस गाडय़ांच्या संख्येत वाढ करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. हे प्रयत्न तोकडे पडत असतानाच आता टीएमटी प्रशासनापुढे बेस्ट भाडेकपातीमुळे नवा पेच निर्माण झाला आहे. भाडे कपात केली किंवा नाही केली तरी ‘इकडे आड तिकडे विहीर’ या उक्तीप्रमाणे दोन्ही बाजूंनी आर्थिक कोंडी होणार असून यापैकी एक निर्णय टीएमटी प्रशासनाला घ्यावा लागणार आहे.

ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात २७७ बसगाडय़ा आहेत. त्यांपैकी १२० ते १२५ बसगाडय़ा दररोज प्रवासी सेवेसाठी आगराबाहेर पडतात. त्यामध्ये २५ ते २८ वातानुकूलित बसगाडय़ांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त १९० बसगाडय़ा जीसीसी तत्त्वावर चालविण्यात येतात. त्यामुळे एकूण ४६७ बसगाडय़ांपैकी सुमारे ३१० बसगाडय़ा प्रवाशांसाठी उपलब्ध होतात. पुण्याच्या सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ रोड ट्रान्स्पोर्ट (सीआयआरटी) संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार १ लाख लोकसंख्येस ३० बस असणे गरजेचे आहे. ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २३ लाखांच्या आसपास असून त्यानुसार शहरात ६९० बसेसची गरज आहे. नेमकी ही बाब लक्षात घेऊन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तीन वर्षांपासून बसगाडय़ांची संख्या ६०० इतकी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विजेवर चालणाऱ्या १०० बसगाडय़ा पीपीपीच्या माध्यमातून घेण्यात आल्या असून त्यांपैकी केवळ एकच बस टीएमटीच्या ताफ्यात दाखल झाली आहे. तसेच महिलांसाठी शासनाकडून ५० तेजस्विनी बसगाडय़ा परिवहन सेवेत दाखल होणार असून त्यासाठी अजून काही महिने लागणार आहेत. याशिवाय टीएमटीच्या ताफ्यातील नादुरुस्त १५० पैकी १२० बसची दुरुस्ती करून त्या जीसीसी तत्त्वावर चलविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मात्र त्यास विरोध झाल्यानंतर प्रशासनाने त्याची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे सद्य:परिस्थितीत ३१० पेक्षा जास्त बसगाडय़ा प्रवासी सेवेसाठी उपलब्ध होत नसून त्या बसगाडय़ा लोकसंख्येच्या मनाने पुरेशा नाहीत.

बेस्ट उपक्रमाने लागू केलेल्या नव्या तिकीट दरानुसार साध्या बसचे किमान भाडे पाच रुपये तर कमाल भाडे २० रुपये इतके आहे. वातानुकूलित बसचे किमान भाडे ६ रुपये तर कमाल भाडे २५ रुपये इतके आहे. त्या तुलनेत टीएमटीच्या साध्या बसगाडय़ांचे किमान भाडे ७ रुपये तर कमाल भाडे ३६ रुपये आहे. तसेच वातानुकूलित बसचे किमान भाडे २० रुपये तर कमाल भाडे १०५ रुपये इतके आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातून जाणारे आणि आसपासच्या शहरांना जोडणाऱ्या मार्गावर बेस्टच्या २०० बसगाडय़ा चालविण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे टीएमटीचे भाडे जास्त असल्यामुळे प्रवासी बेस्टकडे वळण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईतील बेस्ट उपक्रमाप्रमाणेच भाडेकपात केली तर उत्पन्न घटण्याची शक्यता आहे. यामुळे  ‘इकडे आड तिकडे विहीर’ या उक्तिप्रमाणे दोन्ही बाजूंनी आर्थिक कोंडी होणार असल्याचे चित्र आहे. भाडेकपातीचा निर्णय घेतल्यास बेस्टप्रमाणे प्रवासी संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर स्वस्त प्रवासाच्या पर्यायासोबत ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होऊ  शकेल. त्यासाठी जास्त बसगाडय़ा टीएमटीला रस्त्यावर आणाव्या लागतील. मात्र, लोकसंख्येच्या मनाने पुरेशा बसगाडय़ा नाहीत. त्यामुळे भाडेकपातीनंतर प्रवाशांची गर्दी वाढली तर करायचे काय, हा प्रश्न प्रशासनापुढे उभा राहीला आहे.

ठाणे परिवहन सेवेचा २०१९-२० या वर्षांचा ४७६ कोटी १२ लाख रुपयांचा अर्थसंकल्प आहे. त्यामध्ये बस प्रवासी भाडय़ापोटी वार्षिक १६३ कोटी ७४ लाखांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. तसेच २९८.४१ कोटींचे अनुदान पालिकेकडे मागितले आहे. त्यामध्ये महसुली आणि भांडवलीसह २०५ कोटी ९९ लाख, दिव्यांग व इतर संवर्गातील व्यक्तींच्या सवलतीपोटी ८ कोटी ५० लाख तसेच जीसीसीअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या बसगाडय़ाच्या संचलन तुटीपोटी आणि कंत्राटी कामगार देणीपोटी ८३ कोटी ९२ लाख असे मिळून २९८ कोटी ४१ लाख रुपयांच्या अनुदानाची मागणी करण्यात आली आहे. असे असले तरी महापालिकेकडून शंभर टक्के अनुदान आजवर देण्यात आलेले नाही.  त्यामुळे आधीच अनुदानावर मदार असलेली टीएमटी भाडेकपातीच्या भार कसा पेलवणार हा मोठा प्रश्न आहे.

तोपर्यंत दिलासा

ठाणे-बोरिवली या मार्गावर टीएमटीच्या वातानुकूलित बसचे भाडे ८५ रुपये आहे तर बेस्टच्या वातानुकूलित बसचे तिकीट दर २५ रुपये असणार आहे. या मार्गावर बेस्टच्या वातानुकूलित बसचे तिकीट १२० रुपये होते. मात्र दर्जेदार सुविधा नव्हती आणि तिकीट महाग या कारणास्त्व प्रवाशांनी या बसकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे या मार्गावरील वातानुकूलित बस सेवा बेस्टने बंद केली. असे असले तरी येत्या काही महिन्यांत बेस्टच्या ताफ्यात वातानुकूलित नवीन बस दाखल होणार असून त्यांपैकी काही बस ठाणे-बोरिवली मार्गावर चालविण्यात येणार असल्याचे समजते. टीएमटीला बस भाडय़ातून दररोज २८ लाखांच्या आसपास उत्पन्न मिळते. त्यापैकी ४ ते ५ लाख रुपयांचे उत्पन्न ठाणे-बोरिवली या मार्गावरून मिळते. बेस्टच्या वातानुकूलित बसचे कमाल भाडे यापुढे २५ रुपये असणार आहे. या स्वस्त प्रवासाकडे प्रवासी वळून टीएमटीच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे. असे असले तरी या बस येईपर्यंत टीएमटीला काहीसा दिलासा मिळणार आहे.