आइस्क्रीम हा तसा आता बारमाही खाल्ला जाणारा पदार्थ असला तरी उन्हाळ्यातील काहिलीवर उतारा म्हणून मोठय़ा प्रमाणात आइस्क्रीम खाल्ले जाते. या काळात रात्री उशिरापर्यंत आइस्क्रीम पार्लर खवय्यांच्या जिभेला थंडावा देण्यासाठी खुले असतात. तनामनाला गारेगार करणाऱ्या या आइस्क्रीम पार्लर्सपैकी ठाण्यातील एक ठळक नाव म्हणजे राम मारुती रोडवरील टेम्पटेशन. नावाप्रमाणेच येथील नावीन्यपूर्ण स्वादांचे आइस्क्रीमचे कप समोर आले की जिभेला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. नैसर्गिक स्वादांचे आइस्क्रीम मिळणाऱ्या टेम्पटेशनमध्ये निरनिराळ्या फळांच्या स्वादाबरोबरच लिंबू, मिरची आदी स्वादांची लज्जत चाखायला मिळते. पुण्यात प्रचलित असणारा मस्तानी हा आइस्क्रीमचा बहुलोकप्रिय प्रकारही येथे मिळतो.

नैसर्गिक स्वादांच्या आइस्क्रीमची महती आता खवय्यांना पटली असली तरी राम मारुती रोडवरील ‘टेम्पटेशन’ने २० वर्षांपूर्वीच ही चव ठाणेकरांना उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे येथील आइस्क्रीमच्या चवीत गेल्या २० वर्षांत अजिबात फरक पडला नसल्याची ग्वाही अनेक वर्षे येथे आइस्क्रीम खाण्यासाठी येणारे ग्राहक देतात. सुरुवातीची दोन वर्षे हाताने आइस्क्रीम बनवले जात होते. त्यानंतर मागणी वाढल्याने यंत्राद्वारे आइस्क्रीम बनविणे गरजेचे ठरले. विशेष म्हणजे दुकानाचे मालक शेखर वैद्य यांनीच आइस्क्रीम बनविणारे यंत्र बनवले. मोठे सिलेंडर आणि सव्वादोन फूट उंचीचे भांडे एका वेळी फिरत राहून आइस्क्रीम तयार होते. या आइस्क्रीममध्ये कोणतीही रासायनिक द्रव्ये वापरली जात नाहीत. त्यामुळे त्याला एक विशिष्ट चव आहे. अनेकजण या आइस्क्रीमची ‘फ्रॅन्चाईसी द्या’ अशी विनवणी करतात. मात्र या आइस्क्रीममध्ये कोणतेही केमिकल नसल्याने त्याची चव दोन ते तीन दिवसांनंतर बदलते. त्यामुळे आम्ही फ्रॅन्चाईसी नाकारत असल्याची माहिती केसरीनाथ वैद्य यांनी दिली. आइस्क्रीमचे अनेक प्रकार आहेत. दूध हा त्यातील समान घटक. मिरचीचा झणझणीतपणा आइस्क्रीमचा गोडवा असा दुहेरी स्वाद खवय्यांना मिरची आइस्क्रीममधून मिळतो. मुळात आपल्याकडे जेवण झाल्यानंतर आइस्क्रीम खाण्याची पद्धत आहे. त्यामुळे मुखवास किंवा पानमसाला नावाचे आइस्क्रीमही येथे उपलब्ध आहे. येथील मेलबा नावाचे एक वेगळ्या चवीचे आइस्क्रीमही विशेष लोकप्रिय आहे. खवय्ये त्यावर ताव मारतात. या आइस्क्रीममध्ये फ्रेश क्रीम, मोसमानुसार उपलब्ध असणाऱ्या फळांच्या फोडी तसेच व्हेनिला आणि त्या फळाचे आइस्क्रीम असा मोठा कप आपल्या पुढय़ात येतो. ‘स्विंगर’ हे खाद्यपदार्थाने नाव वाटत नाही. मात्र ‘टेम्पटेशन’मध्ये तो एक आइस्क्रीमचा प्रकार आहे. त्यामध्ये खवय्ये आपल्या आवडीप्रमाणे आइस्क्रीमचे कोणतेही तीन प्रकार घेऊ शकतात. ब्लॅक करंट, लिची आदी फळांच्या आइस्क्रीमबरोबरच येथे शहाळे म्हणजेच नारळाचे आइस्क्रीम १२ महिने उपलब्ध असते. आंब्याच्या स्वादाचे आइस्क्रीम आता सर्वत्र उपलब्ध असते. टेम्पटेशनने त्या जोडीला फणसाच्या गऱ्यांच्या स्वादाचे आइस्क्रीम बनविले आहे.

Pile of Dead fish, Airoli creek
ऐरोली खाडीत मृत माशांचा खच….मच्छीमार हवालदिल; मासे का मरत आहेत ? 
Summer Special Sabudana Batata Recipe
फक्त १ वाटी साबुदाणा-१ बटाटा आणि तोंडात घालताच विरघळणारे उपासाचे पापड, १५ मिनिटतात ५० पापडाची सोपी कृती
bengaluru woman viral video three men chasing her car banging windows road rage
“ते शिवीगाळ करून जबरदस्तीने…” भररस्त्यात तरुणीला पाठलाग करून घाबरवण्याचा प्रकार; पाहा घटनेचा धक्कादायक VIDEO
market is loaded with cakes candies chocolates for Easter festival
ईस्टर सणासाठी बाजारात केक, कॅन्डी, चॉकलेटची रेलचेल

हल्ली लहान मुलांना केकबरोबर आइस्क्रीम खायला आवडते. त्यामुळे केक स्टॅण्डी नावाचा आइस्क्रीमचा एक प्रकार खायला मिळतो. त्यामध्ये आपल्या पसंतीची दोन आइस्क्रीम आणि केकचा एक तुकडा आकर्षक पद्धतीने मांडून खवय्यांपुढे ती डिश आणली जाते. ‘थ्री इन वन’ नावाचा एक प्रकार येथे आहे. त्यात टट्रीफ्रुटी, केशरपिस्ता आणि चॉकलेटचे फ्यूजन असते. खास पुण्याचा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मस्तानी’मध्ये सीताफळ, मँगो, स्ट्रॉबेरी, केशरपिस्ता असे प्रकार आहेत. रेन्बोट्रीट फ्लेवरमध्ये ड्रायफ्रूट अधिक असतात. तसेच ३१ डिसेंबरसाठी खास रम स्पेशल आइस्क्रीम तयार करण्यात आले आहे. मात्र हल्ली या आइस्क्रीमची लोकप्रियता इतकी वाढली आहे की, ३१ डिसेंबरची हे खास आइस्क्रीम आता बारमाही खाल्ले जाते. टेम्पटेशन हा स्वतंत्र ब्रॅण्ड असल्याने त्यात वेगवेगळे प्रयोग करता येतात. या सर्व आइस्क्रीममध्ये फळांचा वापर केल्याने सर्व फळेही पोटात जातात. सेलिंग बोट या आइस्क्रीम प्रकारात ब्लॅक करंट, केशरपिस्ता आणि नवीनच तयार केलेले हानी अ‍ॅप्रीकोट हे आइस्क्रीम दिले जाते. त्यावर डेकोरेशन केले जाते. त्यामुळे मुलेही आनंदाने खातात, असे केसरीनाथ वैद्य म्हणाले. हानी अ‍ॅप्रीकोट या आइस्क्रीममध्ये मध आणि जर्दाळूचा वापर केला जातो. पोट भरल्यानंतरही दहा आइस्क्रीम खावे इतकी त्याची चव लाजबाब आहे. आल्याचे आइस्क्रीमही येथे प्रचलित आहे. दिवसाला ४००-५०० विविध प्रकारचे आइस्क्रीमचे कप सहज संपतात.

  • कुठे- टेम्पटेशन आइस्क्रीम पार्लर, राम मारुती रोड, नौपाडा, ठाणे (प.).
  • कधी- सकोळी १० ते रात्री १०.३०.