रेतींबंदर ते खारेगाव टोलनाका रस्त्याचे चौपदरीकरण; डिसेंबर महिन्यात कामास सुरुवात

कळवा, खारेगाव, मुंब्रा परिसरातील वाहतूक कोंडीचे आगार बनलेल्या मुंब्रा रेतीबंदर ते खारेगाव या साधारण एक किलोमीटर अंतराच्या अरुंद रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ िशदे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. उरणच्या जवाहरलाल नेहरु बंदरातून निघालेली अवजड वाहने मुंब्रा वळणरस्त्यामार्गे खारेगाव टोलनाक्यावरुन भिवंडीच्या दिशेने जाण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे या संपूर्ण पट्टयात मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून त्यावर उपाय म्हणून रेतीबंदरच्या परिसरात रुंदीकरणाची कामे हाती घ्यावीत, असे आदेश िशदे यांनी दिले आहेत.

मुंब्रा, खारेगाव, रेतीबंदर, टोलनाका परिसरात होणारी वाहतूक कोंडी दुर व्हावी, यासाठी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणी कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत िशदे आणि स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. या मागणीची दखल घेत पालकमंत्री िशदे यांनी रस्ते विकास महामंडळ तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत या भागाची पहाणी केली. या पहाणीनंतर किमान एक किलोमीटर अंतराच्या या रस्त्याचे चौपदरीकरण केल्याशिवाय पर्याय नाही, असे मत िशदे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून तातडीच्या उपाययोजना

कळव्याकडून रेतीबंदरकडे येणारा रस्ता तसेच रेतीबंदरकडून मुंब्य्राकडे जाणारा रस्ता हे दोन्ही बाजूस काँक्रिटचे असून ४ पदरी आहेत. मात्र, खारेगाव टोलनाक्याकडून रेतीबंदरकडे येणारा रस्ता अरुंद असून डांबरी असल्यामुळे येथे पावसाळ्यात मोठे खड्डे पडतात. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून या भागात मोठी वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीमुळे मुंब्रा वळण रस्त्यापासून शीळ मार्गापर्यत वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे कल्याण-शीळफाटा तसेच नवी मुंबईकडील दिशेने होणाऱ्या वाहतूकीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. जेमतेम एक किलोमीटर अंतराच्या अरुंद रस्त्यामुळे अवजड वाहने कोंडीत सापडत असल्यामुळे त्यादृष्टीने तातडीने उपाय हाती घेतले जाणार आहेत.

पालकमंत्र्याचे निर्देश

या रुंदीकरणाची आवश्यकता लक्षात घेऊन तातडीने निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून डिसेंबर महिन्यापासून या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. तसेच पुढील आठ महिन्यात हे काम पुर्ण करण्यात येईल, असा दावा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केला जात आहे. यावेळी कशेळी टोल नाका ते अंजुर फाटा या रस्त्यावरील दुभाजक क्रॉसिंगकरीता अनेक ठिकाणी अनधिकृतरित्या तोडल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे हे दुभाजक तातडीने दुरुस्तीचे आदेश देण्यात आले आहेत. या मार्गावर ट्रॅफिक वॉर्डन देखील उपलब्ध करून दिले जाणार आहेत तसेच चौकांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. अंजूरफाटय़ाजवळील खड्डे तातडीने बुजवण्याचे निर्देश सुप्रीम कंपनीला देण्यात आले आहेत.