कोणताही व्यवसाय सुरू करताना जिथे व्यवसाय करायचा, त्या बाजारपेठेचे सर्वेक्षण हितकारक ठरते, हा व्यवस्थापनशास्त्राचा मूलभूत नियम आहे. डोंबिवलीतल्या व्यंकटेश बाळकृष्ण ऊर्फ नाना कुलकर्णी यांना साठ वर्षांपूर्वी तो नियम माहिती असण्याचे काही कारण नव्हते. मात्र तरी शहरात जे नाही, ते दिले तर त्यातूनच चार पैसे कमविता येतील, एवढी दूरदृष्टी त्यांच्यापाशी होती. ते तेव्हाच्या कळवा नॅशनल मशिनरी मॅन्यूफॅक्चर्समध्ये नोकरी करीत होते. पुढे ही कंपनी मफतलाल समूहाने घेतली. कंपनीत मशिनिस्ट म्हणून नोकरी करणाऱ्या नानांना अवघा ५२ रुपये पगार होता. त्यातले ३५ रुपये घरभाडय़ापोटी द्यावे लागत. अर्थातच कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी त्यांना जोडव्यवसाय करणे भाग पडले. त्यामुळे पन्नासच्या दशकात नानांनी अनेक व्यवसाय करून पाहिले. शहरातील पहिले उसाचे गुऱ्हाळ आणि टांगा चालविणाऱ्या नानांनी पुढे ध्वनिक्षेपण यंत्रणा (लाऊड स्पीकर्स) विकत घेतली. कारण त्या वेळी डोंबिवलीत एकही सनई-चौघडा नव्हता. त्यामुळे मंगलकार्यात लोकांची पंचाईत व्हायची. मफलतलालमध्ये मशिनिस्ट म्हणून नोकरी करीत असताना नाना कुलकर्णी दादर येथील लादीवाले जोशी यांच्याकडे इलेक्ट्रिशियनचे काम शिकायला जात असत. त्यांचा लाऊड स्पीकर्सचा व्यवसाय होता. त्यांनीच नानांना डोंबिवलीत लाऊड स्पीकर्सचा व्यवसाय सुरू करण्याविषयी सुचविले. पोळीभाजीवाले कानिटकर हे त्यांचे परममित्र. त्यांच्या वडिलांनी व्यवसायासाठी ५०० रुपये भांडवल दिले आणि ‘सुदर्शन ऑडिओ’चा जन्म झाला. मात्र त्यांच्या लाऊड स्पीकर्सचा आवाज शहरातील मंगल कार्यापुरता मर्यादित राहिला नाही. त्यापुढे जात त्यांच्या ‘सुदर्शन ऑडिओ’ने शहरातील सांस्कृतिक चळवळीला हक्काचा आवाज दिलाच, शिवाय अतिशय चोख सेवेने देशभरातील नामांकित गायक-वादकांचा विश्वास संपादन केला.

कनिष्ठ मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय लोकांची बहुसंख्या असल्याने अगदी सुरुवातीपासूनच डोंबिवलीत सांस्कृतिक चळवळ रुजू लागली. शनिवार-रविवारी गाण्याच्या मैफली, व्याख्यानमाला असे उपक्रम सुरू झाले होते. नाटय़गृहे खूप अलीकडच्या काळात आली. मात्र १९६० पासून शहरातील जोशी हायस्कूलच्या पटांगणावर व्यावसायिक नाटकांचे प्रयोग होत होते. पुढे भरत नाटय़मंदिराचा खुला रंगमंच नाटकांसाठी उपलब्ध झाला. त्यामुळे अर्थातच नानांच्या ‘सुदर्शन’ ऑडिओचा अल्पावधीतच व्यवसायात जम बसला.
कोणताही व्यवसाय दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी त्यात काळानुरूप बदल करत राहणे आवश्यक असते. नाना कुलकर्णीना अगदी सुरुवातीपासूनच त्याचे भान होते. ज्या वेळी ते लाऊड स्पीकर्सच्या व्यवसायात आले, तो एल.पी. रेकॉर्डस्चा काळ होता. पुढे कॅसेट आणि सीडींचे युग आले. मात्र ध्वनिमुद्रित गाणी ऐकविणे एवढय़ापुरता कुलकर्णीचा व्यवसाय कधीच मर्यादित नव्हता. ध्वनिक्षेपण आणि ध्वनिसंयोजन क्षेत्रातील नवनव्या अद्ययावत प्रयोगांचा व्यवसायात अंतर्भाव करीत राहिल्याने सुदर्शन ऑडिओ कायम काळाबरोबर राहिले. नाना कुलकर्णी यांच्या राजू, पपी आणि टिटू या तिन्ही मुलांनी सुदर्शन ऑडिओची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. नानांनी साठ वर्षांपूर्वी डोंबिवली शहरात सुरू केलेल्या या व्यवसायाची कीर्ती आता संपूर्ण देशभरात पोहोचली आहे. लाखोंचा जनसमुदाय असलेला कोणताही कार्यक्रम मग ती गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या गाण्याची मैफल असो वा यशवंतराव चव्हाण, अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या दिग्गज राजकीय नेत्यांच्या सभा सुदर्शन ऑडिओने समर्थपणे अशी आव्हाने पेलली. अर्थातच त्यामुळे १९७८ पासूनच कुलकर्णीचा ‘ऑडिओ’ डोंबिवलीबाहेर जाऊ लागला. सुरुवातीच्या काळात मुंबईतल्या कार्यक्रमासाठी लोकलमधून सामान घेऊन जावे लागे. पुढे १९८८ मध्ये मुंबईत खांडके बिल्डिंगमध्ये सुदर्शन ऑडिओचे कार्यालय सुरू झाले. आता तर संपूर्ण देशभरात कुलकर्णीबंधूंना ध्वनिसंयोजनासाठी बोलावले जाते.
दिग्गज कलावंतांचा विश्वास
कोणत्याही कलावंतांची मैफल रंगण्यासाठी ध्वनिसंयोजन खूप महत्त्वाचे असते. ‘सुदर्शन ऑडिओ’ने याबाबतीत कधीही गुणवत्तेशी तडजोड केली नाही. त्यामुळे अनेक दिग्गज कलावंतांचा विश्वास त्यांनी मिळविला. सुधीर फडके यांचा ठाणे जिल्ह्य़ात कुठेही कार्यक्रम असला तरी ते कुलकर्णीकडे ध्वनिसंयोजनाची जबाबदारी सोपवत. सुरुवातीच्या काळात मंगल कार्यालयांमध्ये ज्या बिस्मिल्ला खाँ यांच्या सनईची ध्वनिमुद्रिका ते लावत, त्याच बिस्मिल्ला खाँ यांच्या लाइव्ह सनईवादनाच्या कार्यक्रमाचे ध्वनिसंयोजन करण्याची संधी पुढे सुदर्शन ऑडिओला मिळाली. आशा भोसले यांचे ‘नक्षत्रांचे देणे’ असो वा लता मंगेशकर यांच्या गाण्यांचा लाइव्ह कार्यक्रम. ‘सुदर्शन’ने या मोठय़ा जबाबदाऱ्या अतिशय चोखपणे पार पाडल्या. पं. हृदयनाथ मंगेशकर मंगेशकर यांचा ‘सुदर्शन’शी विशेष स्नेह जडला. त्यांच्या ‘भावसरगम’ या गाजलेल्या कार्यक्रमाचे सलग २५ वर्षे ध्वनिसंयोजन कुलकर्णीबंधूंनी केले. पं. रविशंकर यांचा अपवाद वगळता संगीत क्षेत्रातील जवळपास सर्व दिग्गज कलावंतांच्या मैफलींचे ध्वनिसंयोजन कुलकर्णीबंधूंनी केले आहे.
ध्वनिसंयोजन ते ध्वनिमुद्रण
सतत काही तरी नवे करीत राहणाऱ्या कुलकर्णी बंधूंनी १२ वर्षांपूर्वी ध्वनिसंयोजनातून ध्वनिमुद्रण क्षेत्रात प्रवेश केला. त्यासाठी अद्ययावत स्टुडिओ उभारला. राजू कुलकर्णी यांचा मुलगा परीक्षित या स्टुडिओचे काम पाहतो. त्याने साऊंड इंजिनीअरिंग केले आहे. अशा रीतीने ‘सुदर्शन ऑडिओ’मध्ये कुलकर्णीची तिसरी पिढी आता कार्यरत आहे. डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाटय़गृहाच्या संपूर्ण ध्वनिक्षेपणाची जबाबदारी ‘सुदर्शन ऑडिओ’कडे आहे.
टीमवर्कचे फलित
वेळोवेळी व्यवसायातील अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करून टीमवर्कने केलेल्या कामामुळेच ‘सुदर्शन ऑडिओ’ने देशभरात कीर्ती मिळवली. त्यात नानांचे मोठे योगदान आहेच, पण आमची आई-प्रभा कुलकर्णी हिचाही मोठा वाटा आहे. आम्ही तिघे भाऊ, आमचे कुटुंब तसेच सोबत काम करणारी माणसे एकदिलाने ‘सुदर्शन’चा गाडा हाकीत आहोत. सतत नवे काही तरी करण्याचा आमचा प्रयत्न असतो. तसेच आता डोंबिवलीत ध्वनिक्षेपण तसेच ध्वनिसंयोजनविषयक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा विचार आहे. – राजू कुलकर्णी, सुदर्शन ऑडिओ.

पेलले ‘अन्प्लग्ड’चे आव्हान
कलाकार, बील्टस्, जीवनगाणी, आलाप, शहेनशहा आदी अनेक वाद्यवृदांचे ध्वनिसंयोजन कुलकर्णी बंधूंनी केले. शिवाय गेल्या काही वर्षांत वाद्यवृंदाच्या क्षेत्रात लक्षणीय ठरलेल्या ‘अन्प्लग्ड’ वाद्यवृंदाच्या मैफलींचे यशस्वी संयोजन करण्याचे शिवधनुष्यही कुलकर्णीबंधूंनी यशस्वीरीत्या पेलले. या ‘अन्प्लग्ड’ वाद्यवृदांमध्ये एकाच वेळी रंगमंचावर साठहून अधिक वाद्यांचा ताफा असतो. विविध आवाजांचे सुयोग्य ध्वनिसंयोजन करणे हे फार मोठय़ा कसरतीचे काम असते.