News Flash

तणावमुक्तीसाठी ‘लॅटिन’ नृत्याचे धडे

दैनंदिन जीवनात आपण प्रत्येक जण तणावास सामोरे जात असतो.

| September 4, 2015 12:27 am

तणावमुक्तीसाठी ‘लॅटिन’ नृत्याचे धडे

दैनंदिन जीवनात आपण प्रत्येक जण तणावास सामोरे जात असतो. या तणावाला वयोमर्यादा नसते. नर्सरीमधल्या चिमुरडय़ांपासून ते दररोज गच्च भरलेल्या लोकलने प्रवास करणाऱ्या प्रौढांपर्यंत आपण सगळेच निरनिराळ्या प्रकारे ताणतणावातून जात असतो. वाढत्या तणावामुळे नैराश्य येते व त्यामुळेच अनेक व्यक्ती गळून पडतात. त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर, वैवाहिक आयुष्यावर तसेच कार्यालयीन कामकाजावर होतो. तणावातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या युक्त्या लढवतो. अशाच प्रकारे तणावावर रामबाण उपाय देण्याचा प्रयत्न अभिनेते, नर्तक नकुल घाणेकर कार्यशाळेच्या माध्यमातून करत आहेत. ठाण्याच्या डिफरंट स्ट्रोक्स या नृत्यशाळेचे संचालक नकुल घाणेकर यांनी तीन दिवसीय मोफत कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यामध्ये साल्सा, बचाटा यांसारख्या प्रसिद्ध नृत्यशैलींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ८, १० आणि ११ सप्टेंबर या दिवशी सकाळी ७ ते ८ या वेळेत ही कार्यशाळा वासुदेव सदन बिल्डिंग, दत्त मंदिरासमोर, रामवाडी, गोखले रोड, ठाणे (प.) येथे घेण्यात येणार आहे. सहभाग घेण्यासाठी संपर्क: ९६१९७०५२६२ किंवा २५३७५०९५.

’कधी– ८, १० आणि ११ सप्टेंबर
’कुठे– वासुदेव सदन बिल्डिंग, दत्त मंदिरसमोर, रामवाडी, गोखले रोड, ठाणे (प.).

निसर्गाच्या विविध रूपांचे दर्शन
गेल्या काही वर्षांत माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल कॅमेरे या क्षेत्रांत विलक्षण क्रांती घडून आलेली दिसते. निसर्गाचे विविध आविष्कार प्रभावीपणे टिपणे, त्याच्या पुनर्प्रत्ययाचा आनंद घेणे, जंगलातील विविध पशुपक्ष्यांच्या प्रतिमा कॅमेरामध्ये कैद करणे आता पूर्वीपेक्षा सोपे आणि अधिक परिणामकारकपणे करणे शक्य झाले आहे. ठाण्याच्या कापूरबावडी परिसरातील ठाणे कलाभवनमध्ये प्रसिद्ध छायाचित्रकार वेदवती पडवळ यांच्या वाइड आय फोटोग्राफी या गटातर्फे ४ ते ६ सप्टेंबर या कालावधीत ‘नेचर हार्मोनी’ या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या कार्यशाळांमध्ये सहभागी झालेल्या छायाचित्रकारांची निवडक छायाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.

’कधी- ४ ते ६ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७.३०.

’कुठे– ठाणे कलाभवन, कापूरबावडी, ठाणे(प.).

कृष्णलीलांचा ‘बॅले’
मोहिनी घालणारे नृत्य आणि त्याला भावपूर्ण संगीताची जोड मिळाल्यावर एक सुंदर कलाकृती उभी राहते. अशीच एक कलाकृती म्हणजे सोनिया परचुरे दिग्दर्शित ‘कृष्ण’ हा बॅले नृत्याचा कार्यक्रम. श्रीकृष्ण जयंतीनिमित्ताने कल्याणच्या अत्रे रंगमंदिर सभागृहात रविवारी, ६ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये कृष्णजन्म, बालकृष्णाच्या लीला, पूतना वध, कालियामर्दन, यशोदेला कृष्णाच्या मूळ रूपाचे झालेले दर्शन यांसारख्या प्रसंगांवर आधारित नृत्याविष्कार सादर होणार आहेत. सोनिया परचुरे, संपदा कुलकर्णी, नकुल घाणेकर यांसारखे दर्जेदार कलावंत या नृत्यनाटिकेत सहभागी होणार आहेत.
’कधी– रविवार, ६ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता
’कुठे– अत्रे रंगमंदिर, कल्याण(प.)

उशी बनवण्याची कार्यशाळा
घर सजवणे हे सर्वाच्या आवडीचे. त्यात आपल्याला आराम आणि शांत झोप देणाऱ्या उशा जर आपण स्वत: बनविलेल्या असतील, तर त्यावर डोके ठेवण्याचे सुख काही वेगळेच असेल. डोंबिवलीतील रेखा पाठक यांनी खास महिलांसाठी विनामूल्य डिझायनर उशा बनविण्याची कार्यशाळा आयोजित केली आहे. ५ व ६ सप्टेंबर रोजी (शनिवार-रविवारी) दुपारी १२ ते ४ या वेळेत ओम नीलकंठ कृपा, बी/३, गोपाळनगर लेन नं. १, मंजुनाथ शाळेजवळ, डोंबिवली (पू) येथे ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे.
कधी- ५ व ६ सप्टेंबर दुपारी १२ ते ४.
कुठे– ओम नीलकंठ कृपा, बी/३, गोपाळनगर लेन नं. १, मंजुनाथ शाळेजवळ, डोंबिवली(पू)

‘ब्लेम इट ऑन यशराज’
भरत दाभोळकर दिग्दर्शित ‘ब्लेम इट ऑल यशराज’ हा इंग्रजी नाटकाचा प्रयोग रविवारी ठाण्यातील काशिनाथ घाणेकर येथे होणार आहे. पारंपरिक लग्न सोहळ्यावर हिंदी सिनेमाचा वाढता प्रभाव, यामुळे सोहळ्याचे बदलेले स्वरूप, एका विनोदी कथेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये अनंत महादेवन, जयंती भाटिया, आंचल सबरवाल, पुनीत तेजवानी, स्मिता ???है, ??? गौरव शर्मा, पलाश दत्ता, नील गिडवानी यांसारख्या दर्जेदार कलाकारांनी आपल्या अभिनयाने हा नाटकाला अधिक खुलविण्याचा प्रयत्न केला आहे.

’कधी– रविवार, ६ सप्टेंबर रात्री ९ वाजता
’कुठे– काशिनाथ घाणेकर नाटय़गृह, ठाणे (प.)

प्रतिभावंत बदलापूरकरमध्ये पं. अच्युत जोशी व अनंत जोशी
बदलापुरातील प्रतिभावंतांची ओळख समस्त रसिकांना करून देण्याच्या हेतूने सुरू झालेल्या प्रतिभावंत बदलापूरकर या मुलाखतीच्या कार्यक्रमाला सहा महिने पूर्ण होत आहेत. या महिन्यात शहरात गेली चाळीस वर्षे संगीत साधना करत असलेले व ऊर्मिला धनगर व अनघा ढोमसे आदी सारेगम फेम महागायिकांचे गुरू ज्येष्ठ गायक पंडित अच्युत जोशी व त्यांचा मुलगा संवादिनी वादक अनंत जोशी या प्रतिभावंतांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. तसेच त्यांची गाणीही रसिकांना ऐकण्यास मिळणार आहेत. तरी, या विनामूल्य कार्यक्रमात रसिकांनी आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

’कधी– ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता.
’कुठे– विरंगुळा, ज्येष्ठ नागरिक केंद्र, गणेश पॅराडाइजजवळ, गोळेवाडी, बदलापूर (पू.).

‘१९ वे थिएटर फेस्टिव्हल’
वरळी येथील नेहरू सेंटरच्या वतीने दर वर्षी ‘थिएटर फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात येते. या नाटय़ महोत्सवाचे यंदाचे १९ वे वर्ष असून भारतभरातील विविध भाषांमधील नाटके या महोत्सवांतर्गत नाटय़रसिकांना पाहायला मिळतील. यंदा १० भाषांतील नाटके पाहण्याची संधी मिळणार आहे. ८ ते १४ सप्टेंबर या कालावधीत हा नाटय़ महोत्सव होत आहे. मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता ‘आज रंग है’ या हिंदी नाटकाने महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. बुधवारी सायंकाळी ७ वाजता नादिरा बब्बर लिखित-दिग्दर्शित ‘जैसे सुखे हुए फूल किताबों मे मिले’ हे हिंदी नाटक पाहायला मिळेल. १० सप्टेंबरला सायंकाळी ७ वाजता ‘बुल्हा’ हे पंजाबी नाटक आहे. ११ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता रोहन टिल्लू लिखित व प्रीतेश सोधा दिग्दर्शित ‘ती’ हे मराठी नाटक तर त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता ‘कुत्राणी पुंछाडी वांकी’ हे पारसी-गुजराती भाषेतील नाटक सादर केले जाणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या अ‍ॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सचे ‘मृच्छकटिक’ हे हिंदी नाटक १२ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता तर ‘आग्र्युमेंट अ‍ॅण्ड सन’ हे इंग्रजीतील नाटक सायंकाळी ७ वाजता पाहायला मिळेल. १३ सप्टेंबरला अशोक मिश्रा लिखित-दिग्दर्शित ‘अटके-लटके-भटके-सूर’ हे हिंदी नाटक दुपारी २ वाजता तर सतीश आळेकर लिखित व रघुनाथ कदम दिग्दर्शित ‘एक दिवस मठाकडे’ हे मराठी नाटक सायंकाळी ७ वाजता सादर होणार आहे. गो. पु. देशपांडे लिखित आणि अतुल पेठे दिग्दर्शित ‘सत्यशोधक’ या १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता सादर होणाऱ्या कानडी नाटकाच्या प्रयोगाने १९ व्या थिएटर फेस्टिव्हलची सांगता होणार आहे. ४ सप्टेंबर म्हणजे शुक्रवारी या नाटकाच्या मोफत प्रवेशिका सकाळी १०.३० वाजल्यापासून नेहरू सेंटर सभागृहाच्या तिकीट खिडकीवर उपलब्ध होणार आहेत. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावर सर्व नाटकांना प्रवेश दिला जाणार आहे.
शेअर बाजार व्याख्यान
महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंडच्या अर्थ विभागाच्या वतीने संस्थेच्या सभागृहात शेअर बाजारविषयक मार्गदर्शन करणारे व्याख्यान, कार्यशाळा शनिवार, १२ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता आयोजन करण्यात आले आहे. ‘चला होऊ या शेअर बाजारावर स्वार!’ असे या कार्यक्रमाचे नाव असून शेअर गुंतवणुकीचे महत्त्वाचे फायदे, गुंतवणूक करण्यामागची सूत्रे, गुंतवणूक करताना घ्यावयाची काळजी, शेअर गुंतवणुकीचे सुलभ आणि सोपे मार्ग यांसारख्या गोष्टींबाबत अर्थतज्ज्ञ डॉ. अभिजीत फडणीस मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला मर्यादित जागा असून त्यासाठी प्रवेश शुल्क आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संस्थेच्या ०२२ – २५६८१६३१ या क्रमांकावर संपर्क साधावा.
‘श्याम रस रंग’
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त सोमय्या कल्चरल सेंटरतर्फे ‘श्याम रस रंग’ या विशेष संगीत मैफलीचे आयोजन मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता हुतात्मा चौक येथील सोमय्या भवन, किताबखाना दुकानाच्या वर दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात करण्यात आले आहे. ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका नीला भागवत या मैफलीत श्रीकृष्णाविषयीच्या संगीतरचना सादर करणार असून रसिकांना ख्याल, ठुमरी, दादरा, अष्टपदी असे विविध प्रकार ऐकायला मिळतील. त्यांना व्हायोलिनवर कैलाश पात्र तर तबल्यावर मंदार पुराणिक हे कलावंत साथसंगत करणार आहेत. हा कार्यक्रम संगीतप्रेमी रसिकांसाठी खुला आहे.
‘कल्चरल एक्स्प्रेशन्स’
चित्रकार जी. ए. दांडेकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन ‘कल्चरल एक्स्प्रेशन्स’ ८ सप्टेंबरपासून काळा घोडा येथील जहांगीर कला दालनात भरविण्यात येणार आहे. लोकजीवन, संस्कृती, परंपरा, जीवनपद्धती अशा या विषयांबरोबरच या प्रदर्शनात जंगलसफारी, ग्रामीण भागातील लोकांची जीवनशैली यांसारख्या विषयांवरी अनेकविध चित्रे मांडण्यात येणार आहेत. गणेशाचीही चित्रे या प्रदर्शनात पाहायला मिळतील. हे प्रदर्शन १४ सप्टेंबपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत खुले राहील.
श्रीगणेशाची चित्रे
गणेशोत्सव या महिन्यात असून त्यानिमित्त अनेक कलावंत या कालावधीत विद्या आणि कलांच्या या देवतेची आपल्या मनाला भावतील अशी चित्रे, शिल्पे साकारतात. संजुक्ता अरुण यांनीही गणेशाची विविधी रूपे आपल्या चित्रांतून मांडली आहेत. त्यांच्या चित्रांचे हे प्रदर्शन सध्या ग्रॅण्ट रोड येथील बॉम्बे म्युच्युअल टेरेसच्या डी. डी. नेरॉय कला दालनात भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन ५ सप्टेंबपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत पाहायला मिळेल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2015 12:27 am

Web Title: best week end plans
Next Stories
1 भिवंडीचे स्वप्नरंजन
2 जनजागृतीसाठी नगारा आंदोलन
3 वडाळा ते कासारवडवली प्रवास ६४ मिनिटांत!
Just Now!
X