News Flash

भाकरीची फॅक्टरी..

राज्याच्या कानाकोपऱ्यात रोजच्या जेवणात प्राधान्याने भाकरी खाल्ली जाते.

जयंत परचुरे यांचा भाकरीउद्योग

अस्सल महाराष्ट्रीय खाद्यपदार्थामध्ये पुरणपोळीचे नाव अग्रक्रमाने घेतले जात असले तरी ती असते फक्त सणासुदीला. बाकी राज्याच्या कानाकोपऱ्यात रोजच्या जेवणात प्राधान्याने भाकरी खाल्ली जाते. मात्र चपात्यांच्या तुलनेत थोडे अधिक कष्ट आणि कौशल्य लागत असल्याने धावपळीच्या महानगरी जीवनशैलीत आवड आणि इच्छा असूनही अनेकांना जेवणात भाकरी मिळत नाही. नेमकी हीच गरज ओळखून ठाण्यातील जयंत परचुरे यांनी १६ वर्षांपूर्वी चक्क यंत्राद्वारे भाकरी बनविण्याचा उद्योग सुरू केला. पीठ मळणे आणि थापणे हा भाकरी बनविण्यातला सर्वात अवघड प्रकार मानला जातो. परचुरेंनी आपले तांत्रिक कौशल्य वापरून ही कामे यंत्राद्वारे करून घेतली. सध्या त्यांच्या नौपाडय़ातील कारखान्यात दररोज किमान अडीच ते तीन हजार भाकऱ्या भाजल्या जातात. सामिष आहार घेणारे चपातीपेक्षा भाकरी खाणे अधिक पसंत करतात. त्यामुळे बुधवार, शुक्रवार आणि रविवारी भाकऱ्यांची मागणी वाढते. अशा विशिष्ट दिवशी अगदी पाच ते सहा हजार भाकऱ्याही ऑर्डरनुसार येथे बनविल्या जातात. सकाळी सात ते संध्याकाळी सहा आठवडय़ांचे सातही दिवस हा उद्योग सुरू असतो. सीझनच्या काळात तर रात्री उशिरापर्यंत त्यांना काम करावे लागते.

ठाणे-मुंबई परिसरांतील अनेक हॉटेल्स, धाबे, खानावळी आणि पोळी-भाजी केंद्रांना परचुरे भाकऱ्या पुरवितात. भाकरी हा आरोग्यपूर्ण आहार आहे. आता तर अनेक रुग्णांना डॉक्टर्स चपातीऐवजी भाकरी खाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे तांदळाच्या भाकऱ्यांबरोबरच ज्वारी आणि बाजरीच्या भाकऱ्याही परचुरेंच्या कारखान्यात बनविल्या जातात. तांदळाच्या पिठाची उकड काढून केलेल्या आगरी पद्धतीच्या भाकऱ्या सध्या बऱ्याच लोकप्रिय आहेत. अनेक गृहिणींना त्या घरी बनविता येत नाही. मात्र ही पांढरी, मऊ लुसलुशीत उकडीची भाकरीही यंत्राद्वारे थापण्यात परचुरे यशस्वी झाले आहेत. मूळ उद्योग भाकरीचा असला तरी त्या जोडीने याच यंत्राद्वारे चपात्या, फुलके, गुळपोळ्या, इतकेच काय अगदी पुरणपोळीही त्यांच्या कारखान्यात बनते. भारतात इतरत्र कुठेही यंत्राद्वारे पुरणपोळी होत नाही, ती फक्त ठाण्यात आमच्या कारखान्यात बनते, असे जयंत परचुरे अभिमानाने सांगतात.

जयंत परचुरे एका खासगी कंपनीत नोकरी करीत होते. ऐंशीच्या दशकात ती कंपनी अचानक बंद पडली आणि त्यांनी आईच्या गृहउद्योगात लक्ष घातले. त्यांची आई नलिनी परचुरे यांचा निरनिराळय़ा प्रकारच्या भाजणीची पिठे तयार करून व्यवसाय आहे. याच काळात घरगुती पद्धतीच्या जिन्नसांना खूप मागणी असल्याचे जयंत परचुरे यांच्या लक्षात आले. एका कंपनीने त्यांना दररोज दहा हजार पोळ्या देता येतील का हे विचारले होते. मुंबई महापालिकेने तर त्या काळी शाळेतील मुलांना देण्यासाठी दररोज ५० हजार लाडूंचा पुरवठा करण्यासंदर्भात चक्क निविदा काढली होती. अर्थातच इतक्या प्रमाणात खाद्यपदार्थ हाताने बनविणे केवळ अशक्य होते. महाराष्ट्रीय पदार्थाना असलेली ही वाढती मागणी पुरवायची असेल तर त्याचे काही प्रमाणात यांत्रिकीकरण करावे लागणार हे मूळच्या तंत्रज्ञ असणाऱ्या जयंत परचुरे यांनी ओळखले आणि स्वत:पुरते भाकरी थापता येईल, असे यंत्र बनविले. पिठाच्या गोळ्याला विशिष्ट दाब देऊन त्यापासून एकसारख्या आकाराच्या भाकऱ्या येथे बनविल्या जातात.

प्रमाणीकरण आणि दर्जा

परचुरेंच्या या कारखान्यात प्रामुख्याने भाकऱ्या भाजल्या जात असल्या तरी त्याबरोबरीनेच मागणीनुसार चपात्या, फुलके, गुळपोळ्या, पुरणपोळ्या, खजूरपोळ्या, तेलपोळ्या आदी पोळ्या वर्गातील सर्व पदार्थ बनविले जातात. मोठय़ा प्रमाणात अन्नछत्र चालविल्या जाणाऱ्या धार्मिक स्थळी आता भाकऱ्या आणि पोळ्यांसाठी यंत्रे आली असली तरी ती त्या रोटीसारख्या प्रामुख्याने पंजाबी पद्धतीच्या जाडसर असतात. मात्र जयंत परचुरे यांनी खास तयार केलेल्या या यंत्रावर खास महाराष्ट्रीय पद्धतीच्या पातळ आणि मऊसूत भाकऱ्या आणि चपात्या केल्या जातात. अशा प्रकारचे यंत्र त्यांनी पुण्यातही एका-दोघांना बनवून दिले आहे. भाकऱ्यांच्या बरोबरीनेच येथे उकडीचे मोदकही करून दिले जातात. यांत्रिकीकरणामुळे मोठय़ा प्रमाणात हे पदार्थ करणे जसे शक्य झाले, तसेच त्यांचे निश्चित प्रमाणीकरणही झाले. एरवी घरगुती पद्धतीत हाताने काम करताना मापात अधिक-वजा होऊ शकते. आता यंत्रांमुळे ती शक्यता उरली नाही. त्यामुळे दर्जा टिकवून ठेवण्यात यश आल्याचे परचुरे सांगतात. त्यांच्याकडे साधारण ४० ग्रॅमचा लाडू असतो. यंत्राद्वारे नेमके तितकेच सारण वेगळे काढले जाते. त्यामुळे वजनात कमी-जास्त होत नाही. तसेच वर्षांनुवर्षे पदार्थाच्या चवीत फरक पडत नाही, असे जयंत परचुरे यांनी सांगितले.

तिसरी पिढी कार्यरत

नलिनी परचुरे यांनी घरगुती स्वरूपात सुरू केलेल्या या उद्योगात यांत्रिकीकरण आणून जयंत परचुरे यांनी त्याला एका कारखान्याचे स्वरूप दिले. त्यातून दहा जणांना येथे कायमस्वरूपी रोजगार मिळाला असून त्यातील बहुतेक महिला आहेत.

आता परचुरे कुटुंबाची तिसरी पिढी या व्यवसायाची धुरा सांभाळत आहेत. जयंत परचुरे यांचा मुलगा सुमंत परचुरे आणि मुलगी तेजश्री परचुरे-गोडबोलेही व्यवसायात आहे. सुमंत परचुरे यांनी हॉटेल मॅनेजमेंट केले आहे.

जयंत परचुरे यांचा भाकरीउद्योग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 11, 2016 2:13 am

Web Title: bhakri business in thane
टॅग : Thane
Next Stories
1 औचित्य महिला दिनाचे..
2 होळीच्या झणझणीत जेवणाचा गोड शेवट
3 भटक्या कुत्र्यांचा धुडगूस
Just Now!
X