डोंबिवलीची लोकसंख्या गेल्या दहा-बारा वर्षांत झपाटय़ाने वाढत गेली. त्यानुसार मोठमोठय़ा टोलेजंग इमारती, मॉलही उभे राहिले. परंतु बदलत्या डोंबिवलीत आपली जुनी ओळख भानू सोसायटी आजही जपत आहे. वर्दळीचा रस्ता सोसायटीच्या समोर असला तरी सोसायटीच्या आत प्रवेश करताच एक नीरव शांतता आणि प्रसन्न वातावरण तुम्हाला पाहावयास मिळते. एकीकडे सदैव गोंधळ आणि दुसरीकडे नीरव शांतता अशा दोन्ही विरोधाभासात येथील नागरिक गुण्यागोविंदाने नांदत आहेत.

भानू सोसायटी, डोंबिवली (पू.)

डोंबिवली शहराच्या पूर्व विभागात रेल्वे स्थानकापासून अवघ्या दहा-पंधरा मिनिटांच्या अंतरावर भानू को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी आहे. बाहेरील रस्त्यावर वाहनांची वर्दळ, नागरिकांचा सदैव राबता असूनही सोसायटीत मात्र कमालीची शांतता आहे. बोहरी समाजाच्या भांजी यांनी १९७४ मध्ये स्थानक परिसरातील ही जागा घेतली होती. या जागेवर त्यांनी एकूण चार इमारती उभारल्या. त्यातील दोन इमारती या दुसऱ्या बांधकाम व्यावसायिकांना दिल्या असल्याने त्यातील एक पारस सोसायटी मालकी तत्त्वावरील घरांची आहे, तर दुसरी पागडी पद्धतीची इमारत आहे. त्या दोन्ही इमारती या वेगवेगळ्या बांधकाम व्यावसायिकांनी घेतल्याने पुढे त्या स्वतंत्र झाल्या. केवळ ‘बी’ आणि ‘सी’ विंग या इमारती भानू सोसायटी नावे एकत्र राहिल्या. या संकुलात एकूण चार इमारती असल्या तरी जागेचा विस्तार मोठा असल्याने आणि त्यात त्या नियोजनबद्ध बांधण्यात आल्याने इमारती सुटसुटीत असल्याचे जाणवते. १९७४ मध्ये हा गृहप्रकल्प पूर्णत्वास आला. तळमजला अधिक तीन मजली असलेल्या या सोसायटय़ांमध्ये एकूण ४० सदनिका आहेत. सर्व धर्माची मध्यमवर्गीय कुटुंबे येथे गुण्यागोविंदाने राहात आहेत.
सर्वाच्या सुखदु:खात सहभागी होऊन अडीअडचणीला सामोरे जाणारी सोसायटी असा भानूवासीयांचा लौकिक आहे. सहकार्याचा हा वारसा नव्या पिढीतही संक्रमित झाला आहे. सोसायटीच्या आवारात दहीहंडी, नवरात्रोत्सव, गणेशोत्सव, दिवाळी आदी सारे सणउत्सव मोठय़ा धूमधडाक्यात साजरे होतात. तसेच सोसायटी परिसरात भरपूर मोकळी जागा असल्याने सुट्टीच्या दिवसात मुलांचे मैदानी खेळही रंगतात. ज्यांनी ही परंपरा सुरू केली, ती पिढी कर्ती होऊन नोकरी-व्यवसायात गुंतून गेली. त्यांना आता फारशी उसंत मिळत नाही. मात्र नव्या पिढीने हौसेने हे उपक्रम सुरू ठेवले आहेत. सोसायटीच्या आवारात कार्यक्रमांसाठी पुरेशी जागा आहे. काही कार्यक्रम गच्चीवर साजरे होतात.
१९७४-७५ मध्ये येथील परिसर खूप वेगळा होता. सोसायटीच्या समोर पानवाला चाळ होती. आजूबाजूला सर्वत्र चाळी होत्या. तसेच कोपऱ्यावर गुप्तेंचा बंगला होता. सोसायटीच्या पुढे फार वस्ती नव्हती. ओसाड रान होते. गावकऱ्यांची शेती आजूबाजूला होती. त्यामुळे गावातील वातावरणात आल्याचा भास होत होता. रेल्वे स्थानकापासून सोसायटीपर्यंत यायला टांगा होता. पावसाळ्यात गुडघाभर पाणी साचत असे. त्या पाण्यातून चालत येत घर गाठावे लागे. परिसरात पाणी साचत असल्याने इमारत रस्त्यापासून चार-पाच पायऱ्या उंचावर होती. आता रस्त्यावर सतत भर पडत गेल्याने सोसायटीच्या आवारातही भर घालावी लागली. कारण पावसाचे पाणी सगळे सोसायटीच्या आवारात यायचे. भर टाकता टाकता आता सोसायटीचे आवारच घराच्या उंबऱ्यापर्यंत आले. त्यामुळे २६ जुलैच्या पावसात अनेक खोल्यांमध्ये पाणी साचले असल्याचेही नागरिक सांगतात. वीज, पाणी, रस्ते अशा अनेक समस्यांना त्यावेळी तोंड द्यावे लागत असे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची स्थापना झाली, रिक्षांची सुविधा उपलब्ध झाली. स्थानक परिसराचा झपाटय़ाने विकास झाल्याने स्टेशन परिसरातच भाजी मंडई, मासळी बाजार, आरोग्य केंद्र, पोलीस स्टेशन आदी सुविधा उपलब्ध असल्याने तशा काही समस्या कधी जाणवल्या नाहीत. शिवाय गावी जायचे असले तरी कस्तुरी प्लाझा परिसरातच एसटी स्टॅण्ड असल्याने तेही जवळच होते. परंतु आता ते एसटी स्टॅण्डही तेथून स्थलांतरित झाले आहे.
स्टेशनपासून अवघ्या पाच ते दहा मिनिटांच्या अंतरावर आता सोसायटी आहे. बाजूला मोठमोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत. सोसायटीच्या समोरच एक मॉल उभा आहे, त्यापुढे एक खाजगी बँक व प्रशस्त रुग्णालय आहे. शाळा, क्लास, महाविद्यालयेही येथून जवळ असल्याने सोसायटीच्या समोरील रस्त्यावर सतत वर्दळ असते. या वाढत्या वर्दळीचा येथील नागरिकांना सध्या त्रास होत आहे. रात्री एक-दोन वाजेपर्यंत वाहनांची सतत ये-जा सुरू असल्याने घरात शांतता जाणवत नाही. वाहनांच्या आवाजाचा, कर्कश हॉर्नचा त्रास नागरिकांना होतो.
अवैध पार्किंगचा त्रास
सोसायटीच्या आवारात भरपूर मोकळी जागा आहे, त्या जागेचा वापर वाहनतळ म्हणून केला जातो. वाहनतळासाठी पुरेशी जागा असल्याने त्याचे भाडे भरून सोसायटीतील नागरिक त्याचा वाहनतळ म्हणून उपयोग करतात. परंतु समोरील मॉल अथवा दुकानात येणारे नागरिक वाहन उभे करण्यासाठी सोसायटीच्या आवारात घुसखोरी करतात. सोसायटीच्या गेटसमोर, बाजूच्या पदपथावर नागरिक वाहने उभी करतात. बाहेरील प्रवासी येथे येऊन वाहन उभे करत असल्याने अनेकदा सोसायटीतील नागरिकांना वाहने ठेवण्यासाठी जागा मिळत नाही. त्या नागरिकांना अटकाव केला असता काही तासापुरते वाहन उभे करणार आहोत, अशी कारणे ते देतात. या फुकटय़ा वाहनचालकांचा सोसायटीच्या सदस्यांना खूप त्रास सहन करावा लागतो.
गृहसंकुलातील दोन सोसायटय़ा या वेगळ्या असून भानू सोसायटीत आता केवळ दोनच इमारती राहिल्या आहेत. या सोसायटय़ा जरी वेगवेगळ्या असल्या तरी चारही सोसायटय़ांचे अंगण आजही एकच आहे. या अंगणाची सध्या दुरवस्था झाली आहे, तेथे सीमेंटचा मुलामा द्यायला हवा, परंतु सगळ्यांचे एकमत होत नसल्याने हे काम रखडले आहे.

वाहतूक सेवेचा अभाव

भानू सोसायटी स्थानकपासून जवळ असली तरी येथे येण्यासाठी एकही वाहनसेवा उपलब्ध नाही. जवळचे भाडे म्हणून वाहनचालक येथे येण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक अथवा रुग्णांची गैरसोय होते. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची परिवहन सेवा उपलब्ध आहे, परंतु स्टेशन परिसरातील जवळपासचा थांबा त्यांच्याकडे नाही, तो उपलब्ध व्हावा. मीटरप्रमाणे जवळपासच्या विभागात रिक्षा सुरू व्हाव्यात अशी आमची माफक अपेक्षा असल्याचे सुरेश कलंतरे सांगतात.

इमारतीची डागडुजी
भानू सोसायटीला आज ३० ते ३५ वर्षे होऊन गेली आहेत. या संकुलात कोणतीही सीसीटीव्ही यंत्रणा नाही की सुरक्षारक्षक नाही. असे असतानाही चोरी, मारामारी किंवा इतर काही घटना येथे घडल्या नसल्याचे येथील रहिवासी सांगतात. जुनी सोसायटी झाल्याने सोसायटीने नुकतीच इमारतींची डागडुजी केली. गच्चीतून पाणी गळत होते. त्यामुळे आता पत्र्याची शेड टाकल्याची माहिती सोसायटीचे सचिव प्रकाश पालव यांनी दिली.