10 July 2020

News Flash

भाईंदर खाडीपूल चार वर्षांत पूर्ण

एमएमआरडीएकडून अखेर कामाच्या निविदा प्रसिद्ध

प्रतिनिधिक छायाचित्र

एमएमआरडीएकडून अखेर कामाच्या निविदा प्रसिद्ध

वसई : आता भाईंदर पश्चिमेकडून वसई पश्चिमेला जोडणारा भाईंदर खाडीववरील सहा पदरी पुलाच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए)पुलाच्या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र पुलाच्या कामाला विलंब झाल्याने पुलाच्या निर्मितीचा खर्च ४०० कोटी रुपयांनी वाढला आहे. सप्टेंबर २०२४ र्प्यत पूल पुर्ण करणार असल्याचे एमएमआरडीएने सोमवारी जाहीर केले.

रेल्वे मार्गाने वसई-विरार शहर मुंबईला जोडले गेलेले आहे. मात्र वाहन घेऊन मुंबईला जायचे असेल तर महामार्गावरून खाडीला वळसा घालून जावे लागत होते. भाईंदरला जरी जायचे तर महामार्गावरून जावे लागत होते. वसईहून भाईंदरला रेल्वेने जाण्यासाठी दहा मिनिटे लागत असली तरी महामार्गावरून जाण्यासाठी एक ते दीड तास लागत होता. त्यामुळे रस्तामार्गे जाताना नागरिकांचा वेळ आणि इंधनाचा अधिक खर्च होत असे. भाईंदर-नायगावदरम्यानचा ब्रिटिशकालीन लोखंडी पूल वापरासाठी देण्याची बरीच वर्षे नागरिकांची मागणी होती, परंतु तो कमकुवत असल्याने त्याला परवानगी मिळाली नाही. त्यामुळे भाईंदर खाडीवर रेल्वेपुलाला समांतर असा पूल बांधावा, अशी पर्यायी मागणी समोर आली. तत्कालीन नवघर माणिकपूर नगरपरिषदेने १०० कोटी रुपये खर्चाच्या पुलाचा प्रस्ताव तत्कालीन एमएमआरडीए अध्यक्ष रत्नाकर गायकवाड यांना सादर केला होता. वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी एमएमआरडीएकडे खाडीवरून वाहनांच्या पुलाच्या मागणीसाठी पाठपुरावा सुरू केला होता. २०१३ मध्ये एमएमआरडीएने या पुलाच्या कामाला मंजुरी दिली होती. त्यावेळी पुलाचा खर्च ११०० कोटी रुपये होता. मात्र विविध कारणांमुळे पुलाच्या कामाच्या निविदा निघत नव्हत्या.

सोमवारी एमएमआरडीएने पुलाच्या कामाची निविदा प्रसिद्ध करत असल्याचे जाहीर केले आहे. हा पूल मॅन्ग्रोज, वनक्षेत्र आणि मीठागरातून जाणार असल्यामुळे परवानग्यांची आवश्यकता आहे. या परवानग्या व्यतिरिक्त ‘मुंबई मेरीटाईम बोर्ड’ (एमएमबी), ‘इनलँड वॉटरवेज अथॉरिटी ऑफ इंडिया’ (आयडब्ल्यूएआय) आणि ‘महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी’च्या (एमसीझेडएमए) परवानग्याही आवश्यक होत्या. या परवानग्यांची काळजी प्राधिकरणाने घेतली आहे.

खाडीवरील पूल असा असेल..

* हा पूल विस्तारित मुंबई शहरी परिवहन प्रकल्पाचा (एमयूटीपी)एक भाग आहे.

* हा पूल सहा पदरी असून  ४.९८ किमी लांब आणि ३०.६० मीटर रूंद आहे.

*  १५०१.१६ कोटी इतकी या पूलाची अंदाजे किंमत आहे.

खर्चात वाढला

पूर्वी राज्य सरकारच्या निर्देशानुसार हा पूल ४ पदरी असणार होता.  एमएसआरडीसीने नेमलेल्या सल्लागारांनुसार हा पूल ५.६४ किमी लांबीचा आणि १.५ मीटर रुंदीचा होता. पुलावर तीन ठिकाणी १८० मीटर लांबीचे ‘केबल स्टे’ असावे अशी सूचना त्यांनी केली होती. नवघर- माणिकपूर नगरपरिषद असताना या खाडी पुलाचा प्रस्ताव एमएमआरडीएकडे ठेवण्यात आला होता. तेव्हा पुलाचा खर्च ३०० कोटी होता. २०१८पर्यंत तो ११०० कोटींवर पोहोचला होता. तर आता या पुलाच खर्च १५०० कोटींवर गेला आहे. सप्टेंबर २०२४ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा एमएमआरडीएचा निर्धार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2020 3:14 am

Web Title: bhayander creek bridge will complete in four years mmrda zws 70
Next Stories
1 बेकायदा मातीभरावामुळे आदिवासी पाडय़ांना धोका
2 अभिनत्रीवर शेरेबाजीप्रकरणी गुन्हा दाखल
3 ‘शॉपिंग फेस्टिव्हल’चा बक्षीस सोहळा उत्साहात
Just Now!
X