कचराभूमीवर माती पसरवण्याचे काम पूर्ण करण्याची मागणी

पाऊस पडण्यापूर्वी उत्तन येथील कचराभूमीतील कचऱ्याच्या ढिगांवर माती पसरण्याचे काम पूर्ण करण्यात आले नाही तर कचऱ्याच्या गाडय़ा उत्तनमध्ये येऊच दिल्या जाणार नाहीत, असा निर्वाणीचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

उत्तनच्या धावगी येथील डोंगरावर असलेल्या कचराभूमीला आग लागून निर्माण होणाऱ्या धुरामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दोन आठवडय़ांपूर्वी कचऱ्याला मोठी आग लागल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते. कचऱ्याला आग लागण्याच्या घटना यापुढे होऊ नयेत यासाठी कचऱ्यावर माती पसरण्यात यावी, अशी सूचना आमदार मुझफ्फर हुसेन यांनी केली होती. त्यानुसार प्रशासनाने केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी हुसेन यांनी आज कचराभूमीची पाहणी केली. या वेळी महापालिकेचे उपायुक्त संभाजी पानपट्टे, लिओ कोलासो आदी उपस्थित होते. आठ दिवसांत कचऱ्यावर माती पसरण्याचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी हमी प्रशासनाने दिलेली असतानाही प्रत्यक्षात या कामात कोणतीही प्रगती झाली नसल्याचा आरोप हुसेन यांनी या वेळी केला. या वेळी उत्तनमधील ग्रामस्थही मोठय़ा संख्येने उपस्थित होते. पावसाला सुरुवात होण्यापूर्वी माती पसरण्याचे काम पूर्ण झाले नाही तर कचऱ्याचे दूषित पाणी गावात पसरण्याची भीती या वेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.

माती पसरण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे आणि त्यासाठी लागणाऱ्या जेसीबी व पोकलेन यंत्राच्या संख्येत वाढ करावी, अशी सूचना मुझफ्फर हुसेन यांनी या वेळी केली. हे काम पूर्ण झाले नाही तर ग्रामस्थ कचराभूमीकडे येणाऱ्या कचऱ्याच्या गाडय़ा वाटेतच अडवतील. या आंदोलनात आपणही सहभागी होऊ, असा इशारा हुसेन यांनी या वेळी दिला.

कचरा प्रकल्प वसई तालुक्यातील सकवार येथे स्थलांतर होईपर्यंत सध्याच्या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालय तसेच राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. ही कार्यवाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व आयआयटी यांच्या मार्गदर्शनाखाली करायची आहे. आयआयटीने कचऱ्यावर बायोरेमीडिएशन पद्धतीने प्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. याबाबतची सविस्तर माहिती घेण्यासाठी पुढील आठवडय़ात प्रदूषण नियंत्रण मंडळ, आयआयटीचे तज्ज्ञ यांची संयुक्त बैठक महापालिकेत आयोजित करण्यात येणार आहे.

अतिक्रमणांवर कारवाई

उत्तन कचराभूमीची जागा जिल्हाधिकाऱ्यांनी मीरा-भाईंदर महापालिकेला कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारणीसाठी दिली आहे. मात्र या जागेवर मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमणे झाली असून अनधिकृत बांधकामेही झाली आहेत, असे महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. या अनधिकृत बांधकामांना लवकरच नोटिसा जारी करण्यात येतील, अशी माहिती उपायुक्त पानपट्टे यांनी दिली.