सेनेतील अंतर्गत राडेबाजी पुन्हा चव्हाटय़ावर
शिवसेनेच्या माजी पदाधिकारी असलेल्या अनील चव्हाण यांच्या हत्येचा प्रयत्नाप्रकरणी शिवसेनेचेच उपशहरप्रमुख असलेल्या अविनाश पाटील यांच्यावर आरोप होत असतानाच शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षाच्या पदाधिकाऱ्यास सेना नगरसेवकानेच जबर मारहाण केल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांतील या राडेबाजीमुळे सेनेतील अंतर्गत मतभेद चव्हाटय़ावर आले आहेत.
शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षाचे पदाधिकारी असलेले दीपक सुर्वे व शिवसेनेचे नगरसेवक हरिश्चंद्र आमगावकर यांच्यात मंगळवारी रात्री बाचाबाची झाली. या वेळी आमगावकर यांनी आपल्याला शिविगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार सुर्वे यांनी नवघर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. आमगावकर यांच्या विरोधात या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा करण्यात आला आहे. मात्र या घटनेशी आपला काही संबंध नसून उलटपक्षी आपण भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला होता. आपल्याविरोधात खोटी तक्रार दाखल करण्यात आल्याचा खुलासा आमगावकर यांनी केला आहे. आमगावकर हे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात.
आठच दिवसांपूर्वी शिवसेनेचे माजी पदाधिकारी असलेले अनिल चव्हाण यांच्यावर गोळीबार झाला होता. पक्षांतर्गत स्पध्रेतून शिवसेनेचे उपशहरप्रमुख अविनाश पाटील यांनीच सुपारी देऊन हा गोळीबार करवल्याचे समोर आले आहे. त्यानंतर मंगळवारी सुर्वे यांना सेना नगरसेवकाकडूनच मारहाण झाल्याचा प्रकार घडला. शिवसेना सध्या केंद्रासह राज्यात आणि मीरा-भाइंदर महानगरपालिकेतही सत्तेत सहभागी आहे. यामुळे शिवसनिकांच्या आकांक्षादेखील वाढल्या आहेत. यातूनच एकमेकांविरोधातला सुप्त संघर्ष अधिक प्रखर झाल्याचे बोलले जात आहे.