22 November 2019

News Flash

भाईंदर वसई रो-रो सेवा डिसेंबरपासून

डिसेंबरमध्ये हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती मेरीटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

जेटीच्या कामाला वेग; वाहतूक कोंडी टळणार

भाईंदर : प्रवाशांना भाईंदरहून वसईला वाहनासह नेणारी रो रो सेवा येत्या डिसेंबर महिन्यापासून सुरू होणार आहे. या मार्गासाठी उभारण्यात येत असलेल्या जेटीचे काम सध्या जलदगतीने सुरू आहे. डिसेंबरमध्ये हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती मेरीटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

भाईंदरहून वसईला रस्ते मार्गाने जायचे झाल्यास वाहतूक कोंडीमुळे दीड ते दोन तासांचा वेळ लागतो, शिवाय हे अंतरदेखील खूप आहे. सध्या भाईंदर आणि वसई यांना जोडणाऱ्या वसई खाडीपुलाचे काम एमएमआरडीएकडे प्रस्तावित आहे, मात्र या कामाची अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे वसई खाडीतून रो रो सेवा सुरू व्हावी अशी मागणी केली जात होती. २०१७ मध्ये मेरीटाइम बोर्डाने रो रो सेवेला मंजुरी दिली आणि भाईंदर तसेच वसई येथे जेटीचे कामदेखील सुरू करण्यात आले. मध्यंतरीच्या काळात हे काम रेंगाळले होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून जेटीचे काम पुन्हा एकदा सुरू झाले आहे.

खासदार राजन विचारे यांनी जेटीच्या कामाची पाहणी नुकतीच केली असता मेरीटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी हे काम डिसेंबपर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती दिली. त्यावर हे काम दिवाळीपर्यंत पूर्ण करायच्या सूचना विचारे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जेटीच्या कामासाठी शासनाने १४ कोटी २५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. जेटी ९६ मीटर लांब आणि १० मीटर रुंद असणार आहे. रो रो सेवेअंतर्गत १५ चार चाकी वाहने वाहून नेण्याची क्षमता असणाऱ्या बोटीचा समावेश असणार आहे, तसेच प्रवाशांसाठी पार्किंग आणि प्रतीक्षेची सुविधा असेल, असे खासदार राजन विचारे यांनी सांगितले.

First Published on June 19, 2019 4:25 am

Web Title: bhayander vasai ro ro service from december
Just Now!
X