भीमा-कोरेगाव येथील घटनेच्या पाश्र्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला मीरा-भाईंदरमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. भाईंदर भागात दुकाने बंद ठेवण्यात आली होती, तर मीरा रोडमध्ये दुकाने चालू होत्याचे चित्र होते. शहरात दोन ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. भीमसैनिक मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरून दुकाने बंद करताना दिसत होते.

भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद सर्वत्र उमटत असतानाच बुधवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली होती. मीरा-भाईंदर शहरातील व्यवहार सकाळी ११ वाजेपर्यंत सुरळीत सुरू होती, त्यानंतर मात्र भीमसैनिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले. यानंतर भीमसैनिक गोल्डन नेस्ट चौक आणि काशिमीरा नाका या ठिकाणी जमा झाले आणि या ठिकाणची वाहतूक बंद पाडली. देवेंद्र शेलेकर, सुनील भगत, अरुण दाभाडे आदींच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेले रास्ता रोको आंदोलन सुमारे दोन तास सुरू होते.

बंद पुकारण्यात आल्याने काही शाळांनी अगोदरच सुट्टी जाहीर केली होती तर काही शाळा सकाळी वातावरण पाहून सोडून देण्यात आल्या, परंतु अनेक ठिकाणी वाहने अडवण्यात येत असल्याने शालेय विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या पालकांचे मात्र हाल झाले. काही महाविद्यालये मात्र सुरू होती. यावेळी भाईंदर पूर्व, भाईंदर पश्चिम भागातील दुकाने बंद ठेवण्यात आली, तर मीरा रोड भागातील काही दुकाने मात्र सुरू होती, तसेच रस्त्यावरची वाहतूकही काही प्रमाणात सुरू होती. खासगी वाहने आणि काही प्रमाणात रिक्षा मात्र रस्त्यावरून धावताना दिसत असल्या तरी खबरदारी म्हणून मीरा-भाईंदर महापालिकेची परिवहन सेवा बंद ठेवली होती. यावेळी पोलिसांनी बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार झाला नाही.