कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना संतप्त जमावाने बुधवारी संध्याकाळी बेदम मारहाण केली आहे. एक पोलीस अधिकारी या मारहाणीत जखमी झाला आहे. पण पोलिसांकडून या घटनेबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.

भीमा कोरेगाव घटनेबाबत शहरात बंद पाळण्यात आला होता. या बंद काळात कल्याण पूर्वेतील अनेक वाहने आंदोलनकर्त्यांनी फोडली. त्याचा राग म्हणून संतप्त झालेले दोन गट परस्परांना फिडले. या गटांना शांत करण्यासाठी कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस पुढे गेले. तेव्हा जमावाने पोलिसांना बेदम मारहाण केली. कल्याणमधील खासगी रूग्णालयात दोन पोलिसांवर उपचार सुरू आहेत. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात सतत संपर्क केला. पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क करूनही कोणीहा या घटनेबाबत माहिती देण्यास नकार दिला. कोळसेवाडी पोलिसांनी पोलीस ठाण्यात खूप गर्दी आहे. जमाव संतप्त आहे. आम्ही काही बोलू शकत नाही, असे उत्तर दिले. बंद काळात जमावाने अनेक नव्या कोऱ्या वाहनांवर दगडफेक केली. त्या प्रकारातून हा सगळा प्रकार घडल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात येते. रात्री उशीरापर्यंत पोलीस ठाणे परिसरात जमाव होता.