20 January 2019

News Flash

ठाण्यात ठिकठिकाणी मोर्चे

बंद दगडफेक, जाळपोळीचेही प्रकार

बंद दगडफेक, जाळपोळीचेही प्रकार

भीमा कोरेगाव येथील घटनेचे ठाण्यातही पडसाद उमटले. ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर या शहरांत काही प्रमाणात दगडफेक व रास्तारोकोच्या घटना घडल्या. भीमा कोरेगाव हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. काही भागांत दुकाने बंद ठेवण्यात आली. आंदोलकांनी टीएमटीच्या सहा बसगाडय़ांची मोडतोड केली. तर डोंबिवलीतही १०-१५ वाहनांचे नुकसान करण्यात आल्याचे वृत्त आहे.

भिमा-कोरेगावातील घटनेच्या निषेधार्थ सोमवार रात्रीपासून रिपाइंचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. सावरकर नगर, लोकमान्य नगर या भागांत मोर्चे काढून दुकाने बंद ठेवण्यात भाग पाडण्यात आले. रिपाइच्या कार्यकर्त्यांनी आनंदनगर चेक नाक्याजवळ तर दहा ते पंधरा महिलांनी कॅडबरी नाक्याजवळ रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. शहरामध्ये दुपारच्या वेळेत वाहनांची वर्दळ कमी असते. त्याचवेळेत रास्ता रोको झाल्यामुळे त्याचा फारसा परिणाम शहरातील वाहतूकीवर झाला नाही. ठाणे परिवहन उपक्रमाच्या बसगाडय़ावर आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केली असून त्यात सहा बस गाडय़ांच्या काचा फुटल्या आहेत. या घटनेमध्ये कुणीही जखमी झालेले नसल्याचे परिवहन प्रशासनाकडून सांगण्यात आले. डोंबिवलीतील मानपाडा आणि कल्याणमधील महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत आंदोलनकर्त्यांनी मोर्चे काढून निषेध व्यक्त केला. डोंबिवली येथील इंदिरानगर परिसरात रात्री शेकडोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या जमावाने येथील १० ते १५ वाहनांची तोडफोड केली. काही वाहनांवर दगड भिरकावण्यात आल्याने त्यात काही वाहन चालक, प्रवासी जखमी झाले आहेत. रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

बदलापुरात विविध रिपब्लिकन संघटनांनी पश्चिमेतील रमेशवाडी भागात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करत निषेध मोर्चाला सुरुवात केली. पुढे हा मोर्चा बाजारपेठ, उड्डाणपूल, पालिका मुख्यालय, पूर्वेतील रेल्वे स्थानकमार्गे महात्मा गांधी चौक ते शिवाजी चौकापर्यंत काढण्यात आला. येथे घोषणाबाजी केल्यानंतर कार्यकर्त्यांना परतण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते. मात्र मोर्चेकरी पुढे कर्जत महामार्गाकडे वळले. मोर्चा दत्तवाडीतून थेट कात्रपच्या घोरपडे चौकात महामार्गाद्वारे गेल्याने तासभर वाहतूक विस्कळीत झाली होती. पुढे वैशाली टॉकीज परिसरात दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने मोर्चेकऱ्यांनी डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ रास्ता रोको केला होता. मात्र दहा मिनिटात कार्यकर्त्यांना सोडल्याने मोर्चा संपवण्यात आला.

First Published on January 3, 2018 2:17 am

Web Title: bhima koregaon violence protests spread in maharashtra part 3