ठाणे : मध्य रेल्वे प्रशासनाने भिवंडी रोड रेल्वे स्थानक माल वाहतूक आणि पार्सल सेवेसाठी विकसित केले असून बुधवारपासून या स्थानकामधून माल वाहतुकीला सुरुवात करण्यात आली. रेल्वेने उभारलेली ही सुविधा येत्या काही वर्षांत या शहरातील उद्योगांसाठी फायदेशीर ठरणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांनी गुरुवारी दिली. या सेवेच्या माध्यमातून मध्य रेल्वे प्रशासनाला अतिरिक्त उत्पन्न मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. रेल्वेने सुरू केलेल्या माल वाहतुकीमुळे हजारो गोदामे आणि यंत्रमागाचे शहर असलेल्या भिवंडीमधील अवजड वाहतूकही कमी होण्याची शक्यता आहे.

रेल्वे मंत्रालयातर्फे रेल्वे माल वाहतुकीसाठी सुविधा उभारण्याच्या सूचना रेल्वेच्या विविध विभागांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार मध्य रेल्वे विभागाने यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले होते. मध्य रेल्वेवर माल वाहतूक सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कापडनिर्मिती आणि विविध गोदामांचे केंद्र असलेल्या तसेच दक्षिण आणि उत्तर दिशेला जाण्यासाठी सोयीस्कर असलेल्या भिवंडी शहरातील रेल्वे स्थानकाची निवड केली. त्यानुसार अवघ्या दोन महिन्यांमध्ये या स्थानकात माल वाहतुकीसाठी गरजेच्या असणाºया सुविधा उभारण्यात आल्या. तसेच या भागातील विविध मोठ्या कंपन्यांसोबत संपर्क साधून त्यांच्या माल वाहतुकीची कामे रेल्वे प्रशासनाने मिळवली. त्यामुळे ९ सप्टेंबरपासून भिवंडी रेल्वे स्थानकातून माल वाहतुकीची सुविधा सुरू करण्यात आली आहे.

सध्या या स्थानकातून दानापूर, गुवाहाटी आणि कोलकत्ता दिशेकडे जाणाºया गाड्या आठवड्यातून दोनदा चालवल्या जात असल्याची माहिती मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांनी दिली.  येत्या काही दिवसांत भिवंडी, कळंबोली, पेण आणि रोहा या ठिकाणी इंडस्ट्रियल कॉरिडॉर उभारण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती शलभ गोयल यांनी दिली.

शहरातील वाहतूक कोंडी फुटणार?

भिवंडी शहरात हजारो यंत्रमाग कारखाने आणि गोदामे असल्यामुळे या शहरात दररोजच अवजड वाहनांचा राबता असतो. त्यामुळे या शहरात आणि आसपासच्या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीचा फटका उद्योगांनाही बसतो. रेल्वे प्रशासनाने भिवंडी रोड रेल्वे स्थानकातून माल वाहतूक सुरू केल्याने शहरातील वाहतूक कोंडीही कमी होण्यास मदत होणार आहे.