पाणीपुरवठा होत नसल्याने रहिवासी त्रस्त; दरमहा पाणीखरेदीवर तीन ते चार हजार रुपये खर्च

ऋषिकेश मुळे, ठाणे</strong>

यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, पाऊस थांबून जेमतेम महिना उलटत असतानाच भिवंडी आणि कल्याण या शहरांच्या वेशीवरील गृहसंकुलांसमोर तीव्र जलसंकट उभे ठाकले आहे. याठिकाणी पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी खरेदी करावे लागत आहे. यापोटी या नागरिकांना दरमहा तीन ते चार हजार रुपये खर्च करावे लागत आहेत.

भिवंडी पालिकेच्या अखत्यारीत येत असलेल्या कल्याण-भिवंडी मार्गालगत गेल्या काही वर्षांत मोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत. याशिवाय, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून भिवंडी-कल्याण या मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गालगत गृहसंकुलांमधील घरे घेण्याकडे नागरिकांचा ओढा वाढला आहे. तसेच भादवड, सरावली आणि नायबस्ती या ठिकाणीही मोठय़ा गृहसंकुले उभी राहत आहेत. मात्र, या गृहसंकुलांना सातत्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

महापालिकेकडून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा कमी दाबाने होतो तर काही वेळेस पाणीपुरवठा होतच नाही, असे येथील रहिवाशांनी सांगितले. गेल्या एक महिन्यांपासून पाणी विकत घ्यावे लागत असून त्यासाठी दररोज १०० रुपये इतका खर्च करावा लागत आहे. त्यामुळे महिन्याकाठी तीन ते चार हजार रुपयांचा भुर्दंड सोसावा लागतो आहे, असेही त्या रहिवाशांने सांगितले. पाणीटंचाईच्या समस्येमुळे या ठिकाणी भाडेकरू मिळत नसल्याचे घरमालकांचे म्हणणे आहे.

या संदर्भात भिवंडी निजामपूर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ अभियंते एल. पी. गायकवाड यांच्याशी मोबाइलवरून वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

जलनियोजनात अपयश

भिवंडी-निजामपूर महापालिका क्षेत्राला दररोज स्टेम प्राधिकरण, मुंबई महापालिका आणि स्वतचा पाणीपुरवठा असा एकूण ११५ दशलक्ष लीटर इतका पाणीपुरवठा होतो. भिवंडी शहराच्या वेशीवर गेल्या काही वर्षांत मोठी गृहसंकुले उभी राहिली असून येथील वाढते नागरिकीकरण लक्षात घेऊन येथील पाणीपुरवठय़ात वाढ करण्याची गरज आहे. मात्र, तसे होत नसल्यामुळे याठिकाणी पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्याची माहिती रहिवाशांनी दिली.

न्यायालयात जाण्याचा इशारा

पाणी टंचाईच्या समस्येसंदर्भात महापालिकेकडे अनेकदा पत्राद्वारे तक्रारी करण्यात आल्या. मात्र, त्याकडे महापालिका दुर्लक्ष करीत आहे. पाणी समस्येमुळे रहिवाशांचा मानसिक, आर्थिक आणि शाररिक छळ होत आहे. येथील सर्व इमारतींना अधिकृतरीत्या मान्यता असताना इमारतीतील रहिवाशांना मात्र पिण्याच्या पाण्याचा सुयोग्य पुरवठा होत नसल्याने महापालिकेविरोधात फसवणुकीचा आणि छळाचा गुन्हा दाखल करावा यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.