News Flash

भिवंडीत पोलीस आपल्या दारी…

भिवंडी पोलिसांनी नवा उपक्रम हाती घेतला आहे

(संग्रहित छायाचित्र)

|| किशोर कोकणे

नागरिकांच्या तक्रारी जागेवरच निकाली; तक्रारदारांचे पोलीस ठाण्यातील हेलपाटे वाचणार

ठाणे : पोलीस आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करण्यासाठी तसेच नागरिकांच्या तक्रारींचा लवकरात लवकर निपटारा होऊन त्यांना न्याय मिळावा, या उद्देशातून भिवंडी पोलिसांनी नवा उपक्रम हाती घेतला आहे. ‘पोलीस आपल्या दारी, संरक्षण आमची जबाबदारी’ असे या उपक्रमाचे नाव असून त्याच्या माध्यमातून पोलीस विविध मोहल्ले तसेच सभागृहात तक्रारदार नागरिकांना बोलावून त्यांच्या समस्या समजून घेत आहेत. त्यापैकी काही तक्रारींचा निपटारा जागेवरच केला जात असून यामुळे पोलीस ठाण्याचे हेलपाटे वाचत असल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.

ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि वागळे अशी पाच परिमंडळे ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात येतात. त्यापैकी भिवंडी परिमंडळामध्ये ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही परिसरांचा समावेश आहे. या ठिकाणी नारपोली, भिवंडी शहर, शांतीनगर, भोईवाडा, निजामपुरा आणि कोनगाव अशी सहा पोलीस ठाणे आहेत. पोलीस ठाण्याची पायरी चढायची नाही म्हणून अनेकजण तक्रारी करण्यासाठी पुढे येत नाहीत. तर काहीजण पोलीस ठाण्यात तक्रारी करतात. त्यात कौटुंबिक तक्रारी, अमली पदार्थ सेवन, महिला छेडछाड अशा स्वरूपाच्या तक्रारी असतात. परंतु न्यायासाठी तक्रारदाराला पोलीस ठाण्यात हेलपाटे मारावे लागतात. यातूनच पोलीस आणि नागरिकांमध्ये दरी वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे असे प्रकार टाळण्यासाठी भिवंडीचे पोलिस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी ‘पोलीस आपल्या दारी, संरक्षण आमची जबाबदारी’ हा नवा उपक्रम सुरू केला आहे. १९ फेब्रुवारीपासून त्याची अंमलबजावणी सहा पोलीस ठाण्यांमध्ये सुरू झाली आहे.  या उपक्रमामध्ये प्रत्येक आठवड्याला दोन मोहल्ल्यांमध्ये नागरिकांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात येते. या बैठकीला वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक यांच्यासह तक्रारदारांसह इतर नागरिक उपस्थित असतात. बैठकीत तक्रारदारांच्या तक्रारी अधिकारी समजून घेतात आणि तेथेच त्यांच्या तक्रारीचा निपटारा करतात. या उपक्रमात जागेवरच न्याय मिळत असल्यामुळे नागरिकही समाधान व्यक्त करीत आहेत. तक्रारींचा निपटारा करण्याबरोबरच विविध समाजिक विषयांवर नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम पोलीस करीत आहेत. पाल्यांना शिक्षण देणे कसे गरजेचे आहे, मुलींवर अत्याचार होत असल्यास थेट पोलिसांना कसा संपर्क साधावा, अमली पदार्थ सेवनापासून आपल्या पाल्यांना दूर ठेवावे, करोनाच्या काळात शहरातील रुग्णांचे प्रमाण वाढू नये यासाठी नियमांचे पालन करणे, याबाबत पोलिस नागरिकांमध्ये जनजागृती करीत आहेत.

पोलीस आपल्या दारी, संरक्षण आमची जबाबदारी या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करणे आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आम्हाला नागरिकांशी थेट संवाद साधता येत असून त्यातून त्यांच्या समस्या जाणून घेणे शक्य होत आहे. नागरिकांकडून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. – योगेश चव्हाण, उपायुक्त, भिवंडी परिमंडळ.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2021 12:18 am

Web Title: bhiwandi police at your door akp 94
Next Stories
1 शहरात स्वस्त घरांची निर्मिती
2 कर उत्पन्न वाढवण्याकरिता अभय योजना
3 खाडी पूल बार्ज अपघात प्रकरणात आठ जणांना अटक
Just Now!
X