ठाणे जिल्ह्यातील वाडा – भिवंडी राज्य महामार्गावरील खड्ड्यांमुळे एका डॉक्टर तरुणीला बुधवारी प्राण गमवावा लागला. खड्ड्यांमुळे दुचाकीवरुन खाली पडल्यानंतर डॉ नेहा शेखला ट्रकने चिरडले होते. यानंतर संतप्त ग्रामस्थांना टोल नाका बंद पाडला होता. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या ठिकाणी तरुणीचा अपघात झाला तिथे तीन दिवसांपुर्वीच रस्त्याचं काम करण्यात आलं होतं अशी माहिती कंत्राटदाराने दिली आहे.

या घटनेसाठी जबबादार सुप्रीम मनोर वाडा भिवंडी प्रायव्हेट लिमिटेडचे महाव्यवस्थापक शेख जहीर अहमद जबाबदर आहेत. अपघात झाला तिथे तीन दिवसांपूर्वी डागडुजीचं काम करण्यात आलं होतं असं त्यांनी सांगितलं आहे. पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “पण जर आम्ही जबाबदार असतो तर पोलिसांनी आमच्याविरोधात गुन्हा दाखल केला असता. हा ६४ किमीचा लांब रस्ता आहे. पण पावसामुळे रस्ता चांगल्या स्थितीत नाही. डागडुजीचं काम अद्यापही सुरु आहे. रस्ता सुस्थितीत असावा यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत”.

लग्नाची खरेदी करुन परतताना खड्ड्यांमुळे अपघात; तरुणीचा ट्रकखाली चिरडल्याने मृत्यू

२३ वर्षीय डॉ नेहा शेख ही तरुणी तिच्या भावाबरोबर बुधावारी रात्री ११ च्या सुमारास वाडा-भिवंडी रोडवरुन घरी जात होती. दुचाकीवरुन दुर्गाडी परिसरातून रात्रीच्या अंधारामधून जाताना रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या गाडीचे चाक रस्त्यामधील खड्ड्यात अडकले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे दुचाकीवर भावाच्या मागे बसलेली नेहा रस्त्यावर पडली. त्याच वेळी मागून आलेल्या भरधाव ट्रकने तिला चिरडले. या अपघातात नेहाचा जागीच मृत्यू झाला. नेहाच्या भावाला काय झाले हे समजण्याआधीच नेहाचा मृतदेह रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

पुढील महिन्यामध्ये नेहाचे लग्न असल्याने ती खरेदीसाठी भावाबरोबर ठाण्याला गेली होती. लग्नाची खरेदी करुन परत येतानाच हा अपघात झाला. या अपघातामुळे शेख कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ज्या घरामधून नेहाची वरात निघणार होती त्याच घरातून नेहाची अंतयात्रा काढण्याची वेळ शेख कुटुंबावर आली. या अपघातामध्ये नेहाचा मृत्यू झाल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. स्थानिकांनी या घटनेनंतर काही काळ येथील टोलनाका बंद पाडला होता. भिवंडी परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमळे रोज दुचाकीस्वारांचे अपघात होत असताना प्रशासन रस्ता डागडुजी करण्यासंदर्भात काहीच उपाययोजना करत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.