|| किन्नरी जाधव

वितरक कंपन्यांपुढे नव्या वेळापत्रक आखणीचे आव्हान

उरण येथील जवाहरलाल नेहरू बंदरातून भिवंडीतील गोदामांच्या दिशेने होणाऱ्या अवजड वाहतुकीत सुसूत्रता येऊन वाहतूक व्यवस्थेवर येत असलेला ताण कमी करावा, यासाठी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आखलेले गोदामांच्या सुट्टय़ांचे नियोजन अमलात येण्यास किमान महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. आठवडय़ाच्या वेगवेगळ्या दिवशी गोदामे टप्प्याटप्प्याने बंद करण्याचे निश्चित झाल्यास याबाबतचे वेळापत्रक देशभरातील वितरक व कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवावे लागणार आहे. हे वेळापत्रक गणेशोत्सवानंतर आखण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

भिवंडी परिसरात गेल्या काही वर्षांत हजारोंच्या संख्येने गोदामे उभी राहिली आहेत. देशभरातील नावाजलेल्या कंपन्यांची गोदामे येथे थाटण्यात आली असून येथून मालाची ने-आण मोठय़ा प्रमाणावर होत असते. हे लक्षात घेऊन राज्य सरकारने मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून या भागात लॉजिस्टिक पार्कची आखणीही केली आहे. गेले चार महिने मुंब्रा बाह्य़वळण रस्त्याचे काम सुरू झाल्याने ठाणे, नवी मुंबई तसेच आसपासच्या परिसराची वाहतूक यंत्रणा या अवजड वाहनांमुळे कोलमडून पडली. त्यामुळे या कालावधीत गोदामांना सुट्टय़ा जाहीर कराव्यात, असा प्रस्ताव पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे आणला होता. मात्र गेल्या दोन महिन्यांत यावर फारसा विचार झाला नव्हता. नवे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मात्र या निर्णयाची लागलीच अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

भिवंडीत एकूण १६ हजार गोदामे आहेत. या सर्व गोदामांना रविवारी सुट्टी असल्याने महामार्ग तसेच भिवंडीतील अंतर्गत रस्त्यावर अवजड वाहनांची वाहतूक नसते. मात्र इतर दिवशी या रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी होते. यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी प्रांत अधिकारी, तहसीलदार, वाहतूक संघटना आणि गोदाम मालकांची बैठक घेऊन गोदामांच्या साप्ताहिक सुट्टीची विभागणी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे रस्त्यावर येणाऱ्या वाहनांचे प्रमाण विभागण्यात येऊन या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल, असा दावा वाहतूक पोलिसांतर्फे करण्यात येत आहे. मात्र पहिल्या बैठकीत घेण्यात आलेला निर्णय स्थानिक कर्मचारी, वितरकांपर्यंत पोहोचण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

सुट्टीचा फायदा असा

  • उरण येथून भिवंडीच्या दिशेने रविवारचा अपवाद वगळला तर दिवसाला १० ते १२ हजार अवजड वाहने ये-जा करत असतात. यापैकी जवळपास ७५ टक्के वाहने ही मुंब्रा बाह्य़वळण रस्त्यामार्गे भिवंडीत येजा करतात.
  • उरण येथून गुजरात आणि नाशिकच्या मार्गे दिवसाला किमान तीन ते चार हजार वाहने मार्गक्रमण करत असतात असा वाहतूक पोलिसांचा अहवाल आहे.
  • भिवंडीतून मुंबई, ठाणे, नाशिक तसेच आसपासच्या भागांत लहान वाहनांमधून मालाचे वितरण करणारी एक मोठी यंत्रणा आहे.
  • भिवंडीत गोदामांचा सुट्टीकाळ जाहीर झाला तर सोमवार ते शनिवार या सहा दिवसांच्या काळात वाहनांच्या संख्येचे विभाजन होईल असा जिल्हा प्रशासनाचा दावा आहे.
  • दररोज रस्त्यावर येणाऱ्या वाहनांपैकी दिवसाला किमान तीन हजार वाहने यामुळे कमी होतील, असा अंदाज आहे.

सुट्टय़ांच्या नियोजनासाठी घेतलेल्या बैठकीत भिवंडीतील गोदाम मालकांशी बोलणे झाले आहे. या संदर्भात स्थानिक प्रतिनिधी, सरपंच, गोदाम मालक, पोलीस यांच्याशी चर्चा व्हायची आहे. हा निर्णय वितरकांपर्यंत पोहोचविण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. साधारण एक महिन्यानंतर या सुट्टय़ांचा निर्णय लागू होईल.   -डॉ. मोहन नळदकर, उपविभागीय अधिकारी, जिल्हा प्रशासन