भिवपुरी म्हटले की, आपल्याला आठवतात ते आषाणे व कोषाणे ही धबधब्यांची जोडगळी. पण हिरवाईने नटलेल्या येथील डोंगरमाळेत पावसाळय़ात अनेक धबधबे प्रसवतात. गर्दी नसलेल्या आणि निसर्गाची मुक्त उधळण असलेल्या अशा काही धबधब्यांवर जायला आपल्याला नक्की आवडेल. यापैकी एक आहे बेकरे गावचा धबधबा. भिवपुरी रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला या धबधब्याभोवतालचा परिसर म्हणजे निसर्गाचे अद्भुत लेणे. हिरव्याकंच डोंगररांगा, त्यातूळ खळखळत वाहणारे धबधबे, वाहत्या पाण्याच्या शुभ्र धारा आणि मन प्रसन्न करणारे वातावरण.. यामुळे या धबधब्याच्या परिसरात पर्यटनाचा आनंद लुटण्यात एक वेगळीच मजा आहे.भिवपुरी रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर पूर्वेला कल्याणच्या दिशेला चालायला सुरुवात केली की ३० ते ४० मिनिटांत आपण बेकरे गावात पोहोचतो. बेकरे गावातून धबधब्यापर्यंतचा प्रवास तर अविस्मरणीय असा आहे. डोंगरातील पायवाट, भाताची शेते, झाडी-झुडपे, लहान-मोठे झरे यातून प्रवास करताना आणि या परिसरातील निसर्गवैभवाचा आनंद घेताना मन विलक्षण प्रसन्न होते. धबधब्याच्या जवळपास आलात तर तुम्हाला धब-धब असा मोठा आवाज ऐकू येतो, त्या दिशेने जाण्यासाठी आपली पावले आसुसलेली असतात. थोडे पुढे चालत राहिलात तर या लोभसवाण्या धबधब्याचे दर्शन होते. सुमारे ५० फुटांपर्यंत उंची असलेला हा धबधबा आपल्याला खुणावतो. त्याच्या धुंद, स्वच्छंद जगण्यात आपणही सामील व्हावे, असा इशाराच तो करत असल्याचे वाटते. मग काय, कसलाही विचार न करता आपसूकच आपण या धबधब्याच्या पाण्यात शिरतो आणि चिंब चिंब होऊन जातो. या धबधब्याच्या खाली बाजूला पाणी साचते आणि एक छोटासा जलाशय निर्माण होतो, त्यात भिजण्याचा आणि पाणी एकमेकांच्या अंगावर उडविण्याचा आनंद काही औरच असतो.या मुख्य धबधब्याच्या जवळच वरच्या बाजूला आणखी एक लहानसा धबधबा आहे. एक छोटीशी टेकडी पार करून येथे पोहोचलात तर या डोंगराच्या कुशीतला हा निर्झरही मनाला आनंद देतो. या धबधब्याजवळ खूपसे खडक असल्याने येथे जरा जपूनच आनंद घ्या.एकूणच हा परिसर म्हणजे निसर्गाचे सहजसुंदर लेणे. येथून माथेरानच्या हिरव्यागार डोंगररांगा दिसतात. त्यातून प्रसवणाऱ्या अनेक धबधब्यांच्या माळा दिसतात. अनेक रंगीबेरंगी पक्षी, विविध प्रकारच्या वनस्पती, डोंगरदऱ्या, झुळझुळ वाहणारे ओहोळ आणि धुंद वातावरण यामुळे या परिसरातील पावसाळी सहल अविस्मरणीय अशीच ठरेल. प्रदूषण व शहरी गोंगाटापासून काही वेळ निवांतपणा हवा असेल, तर हे ठिकाण उत्तम असेच आहे.

कसे जाल?

Torrential rain with hail in Shirol and Hatkanangle taluka
शिरोळ, हातकणंगले तालुक्यात गाऱ्यांसह वळिवाची दमदार हजेरी; उन्हात गरव्याची सुखद अनुभूती
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना
sangli wild animal attack marathi news
सांगली : हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात २४ मेंढ्या ठार, ७ गायब

बेकरे धबधबा, भिवपुरी

मध्य रेल्वेवरील कर्जतच्या अलीकडील भिवपुरी स्थानकावर उतरावे. तेथून पूर्व दिशेला कल्याणच्या बाजूने चालावे. धबधब्यापर्यंत जाण्यासाठी पाऊण-एक तास लागतो.

रेल्वे स्थानकापासून बेकरे गावापर्यंत जाण्यासाठी रिक्षाची सोय आहे. या गावातून धबधब्यापर्यंत जाण्यासाठी मात्र चालावेच लागते.