News Flash

पोलिसांच्या जागेवरही भूमाफियांचा डल्ला

वसईतील पोलीस ठाण्यांना जागा मिळत नसल्याने तुळींज पोलीस ठाणे गटारावर बांधण्यात आले.

(प्रतिकात्मक छायाचित्र )

पोलीस ठाण्याच्या नियोजित जागेवर अनधिकृत इमारत; पोलीस ठाणे मात्र गटारावर

वसई-विरारमध्ये भूमाफियांचा सुळसुळाट झाला असून अनेक सरकारी जमिनीही त्यांनी बळकावल्या आहेत. या भूमाफियांना पोलिसांचेही भय वाटत नसल्याचे चित्र दिसत आहे. कारण नालासोपाऱ्यात पोलीस ठाण्यासाठी राखीव असलेल्या जागेवरच भूमाफियांनी डल्ला मारला असून त्या ठिकाणी सातमजली इमारत उभी राहिली आहे. विशेष म्हणजे जागेअभावी नालासोपाऱ्यातील तुळींज पोलीस ठाणे गटारावर बनवण्यात आले आहे.

वसईतील पोलीस ठाण्यांना जागा मिळत नसल्याने तुळींज पोलीस ठाणे गटारावर बांधण्यात आले. नव्या पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी समेळपाडा येथे जागा निश्चित करण्यात आली. मात्र या जागेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने भूमाफियांनी ती बळकावली आणि त्यावर सातमजली इमारत बांधली. महापालिकेने आता त्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. बोगस सीसी बनवून ही इमारत उभी राहिली असून या इमारतीला कुठलीच परवानगी दिली नसल्याचे नगररचना विभागाने स्पष्ट केले. या इमारतीला बनावट बांधकाम परवानग्या वापरून इमारत बांधण्यात आली आली आहे. या विकासकांनी पालिकेप्रमाणे ग्राहक, वित्तीय संस्था तसेच बँकांचीही फसवणूक केल्याचे नगररचना विभागाने म्हटले आहे.

पोलिसांना जागेची अडचण

वसई शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांना जागेची अडचण आहे. नालासोपाऱ्यातील तुळींज पोलीस ठाणे गटारावर बनवण्यात आले आहे. विरार येथील उपअधीक्षकांना जागा नसल्याने शहरापासून लांब चंदनसार येथे कार्यालय उघडावे लागले, तर नालासोपाऱ्याच्या उपअधीक्षकांनाही अडगळीची जागा मिळाली आहे. पोलीस जागा शोधण्यासाठी धडपड करत असताना दुसरीकडे भूमाफियांनी पोलिसांच्या जागेवरच डल्ला मारल्याचे प्रकरण उघडकीस आले.

पोलिसांसाठी राखीव असलेल्या जागेवर अतिक्रमण करून अनधिकृत इमारत बांधली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावर कारवाई करण्याचे आदेश नगररचना विभागाकडून प्राप्त झाले असून त्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल.

– प्रकाश जाधव, साहाय्यक आयुक्त, प्रभाग समिती ‘ई’.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 3:13 am

Web Title: bhumafia grab land reserved for police station in nalasopara
Next Stories
1 तपासचक्र : सौदेबाजीतून सुटका
2 मैदानप्रश्नी सेनेत खदखद
3 पुलांखाली व्यायामाचा ‘योग’
Just Now!
X