तळोजा परिसर औद्योगिक वसाहत म्हणून प्रसिद्ध आहे. औद्योगिक वसाहतीतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये बिबट्या फिरताना आढळून आला आहे. त्यामुळे तळोजा परिसर व आजूबाजूला भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तळोजा औद्योगिक वसाहतीत बिबट्या फिरत असल्याचे एका सीसीटीव्ही फुटेज मधून समोर आले आहे. त्यामुळे तळोजा परिसरातील ग्रामस्थ व औद्योगिक वसाहतीत एकच खळबळ उडाली आहे. पनवेल तालुक्यातील पेणधर गावाशेजारील कोलटेन कंपनीच्या संरक्षक भिंतीच्या आत उडी घेऊन बिबट्या कंपनी परिसरात आल्याचे १९ नोव्हेंबरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या सीसीटीव्हीच्या व्हिडीओमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. परिसरातील नागरिक बाहेर जाण्यास टाळत आहेत.

तळोजा एमआयडीसी मध्ये सीसीटीव्ही फुटेज मध्ये जो प्राणी दिसला आहे तो बिबट्याच आहे. एमआयडीसी परिसर हा औद्योगिक असल्याने तिथं बिबट्या फार काळ राहणार नाही, तरीही आमचा शोध सुरू आहे. जवळपासच्या लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
– ज्ञानेश्वर सोनवणे ( रेंज झोन अधिकारी वनविभाग)