इंधनविरहीत वाहनाचे माहात्म्य अधोरेखित करणार 

मध्यंतरीच्या काळात दुचाकी आणि चारचाकींच्या प्रभावामुळे काहीशी अडगळीत पडलेल्या सायकलीला तिच्या पर्यावरणस्नेही आणि आरोग्यदायी गुणधर्मामुळे पुन्हा बरे दिवस येऊ लागले आहेत. नव्या पिढीतील या सर्व सायकलप्रेमी मंडळींचे एक संमेलन जानेवारी महिन्यात डोंबिवलीत होणार आहे.

क्रीडाभारती, डोंबिवली सायकल क्लब, नॅशनल युथ ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने  रविवार २८ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले नाटय़मंदिर येथे होणाऱ्या या राज्यातील पहिल्या सायकल मित्र संमेलनात या इंधनविरहीत वाहनाची महती सांगितली जाणार आहे.

इंधनाची वाढती किंमत आणि त्यामुळे होणारे प्रदुषण यामुळे स्वयंचलीत वाहने डोकेदुखी ठरू लागली आहेत. पुन्हा नियमित सायकल चालविणे आरोग्यवर्धकही असते. त्यामुळे आता सायकल चालविण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत अनेक शहरांतून सायकल ट्रॅक बांधण्यात आले आहेत. अशारितीने ‘जुने ते सोने’ या न्यायाने पुन्हा सायकलीचा वापर वाढू लागल्याने या वाहनाविषयी सर्व संबंधित घटकांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी हे संमेलन भरविण्यात आल्याची माहिती संयोजकांनी दिली.

या संमेलनाची सुरुवात डोंबिवली शहरातून पाच वेगवेगळ्या ठिकांणाहून सकाळी साडेसहा वाजता निघणाऱ्या सायकल फेरीने होणार आहे. या सायकल फेरीत तब्बल एक हजारांहून अधिक सायकल स्वार असणार आहेत. या सायकल स्वारीत शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक संघ, विविध संघटना यांचा समावेश असणार आहे. संमेलनाचे उद्घाटन हे सकाळी नऊवाजता डोंबिवली पूर्व येथील सावित्रीबाई फुले नाटय़गृह या ठिकाणी पार पडणार आहे. दिवसभर चालणाऱ्या या सायकल संमेलनात सांगली, पुणे, नाशिक, नागपूर, अकोला, मुंबई, बदलापूर, गोवा या ठिकांणाहून सायकल प्रेमी येणार असून त्या ठिकाणी झालेल्या सायकल फेरी कार्यक्रमांचे सादरीकरण, तेथील छायचित्रे या ठिकाणी दाखवण्यात येणार आहेत. ‘पर्यावरणपूरक सायकलींगला पुढे आणण्यासाठी या अनोख्या पहिल्या महाराष्ट्र सायकल मित्र संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या संमेलनात महाराष्ट्रातील जास्तीत जास्त सायकल प्रेमींनी सहभाग घ्यावा” असे आवाहन डोंबिवली सायकल क्लबचे कमलाकर क्षीरसागर यांनी केले आहे.