कोंडी फोडण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न
ठाण्यातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहेत. वाहतूक कोंडीचा केंद्रबिंदू ठरलेल्या तीन हात नाका, नितीन कंपनी चौक आणि कॅडबरी जंक्शन परिसरातील वाहतुकीत बदल करण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत. हे प्रस्तावित बदल नेमके कसे असतील, याचे ठोस सादरीकरण महापालिका आणि पोलिसांना करावे लागणार असून या नव्या बदलांचे वेध ठाण्यातील नागरिकांना लागले आहेत.
झपाटय़ाने होत असलेल्या नागरीकरणामुळे शहरातील वाहनांची संख्याही वाढू लागली आहे. तुलनेने रस्ते अपुरे पडत आहेत, अशी स्थिती आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. या कोंडीत ठाणेकरांची सुटका करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. मात्र, त्याही पुरेशा नाहीत. काही ठिकाणचे रस्ते फारच अरुंद आहेत, तर काही ठिकाणी अतिक्रमणांनी वेढले गेले आहेत. त्यामुळे कोंडीवर उतारा शोधण्यासाठी विविध प्रकारचे मार्ग शोधले जात आहेत.

बदलांचे नेमके परिणाम काय?
कोरमसारख्या बडय़ा मॉलच्या दिशेने जाण्यासाठी ‘यू टर्न’, सेवा आणि पूर्व द्रुतगती महामार्ग जोडण्यासाठी जोड मार्गिका, जलवाहिन्या तसेच सेवा वाहिन्यांचे स्थलांतरण अशी काही महत्त्वाची कामे येत्या काळात करण्याचा सविस्तर प्रस्ताव पालिकेने तयार केला असून यासाठी सुमारे दोन कोटींची तरतूद केली आहे. ठाणे वाहतूक पोलिसांच्या समन्वयातून ही कामे केली जातील, असा दावा पालिकेने केला असला तरी या प्रस्तावित बदलांचे नेमके कसे परिणाम साधले जातील, याविषयी अद्यापही स्पष्टता नाही. यापूर्वी वाहतूक पोलिसांनी केलेल्या बदलांच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यामुळे हे प्रस्तावित बदल नेमके कसे असतील याचे ठोस सादरीकरण महापालिका आणि पोलिसांना करावे लागणार आहे.

* शहरातील विविध मार्गाचे खासगी संस्थेद्वारे सर्वेक्षण करून त्याआधारे वाहतूक मार्गात बदलांची योजना महापालिकेने आखली आहे.
* ठाणे शहराला भेदून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावरील तीन हात नाका, नितीन कंपनी आणि कॅडबरी जंक्शन येथे सर्वाधिक कोंडी होते.
* या मार्गावर कोंडी होताच अंतर्गत मार्गावरही त्याचे परिणाम दिसून येतात.
* त्यामुळे महापालिका प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी एका खासगी संस्थेद्वारे या तिन्ही जंक्शनचे सर्वेक्षण केले होते.
* या सर्वेक्षण अहवालाच्या आधारे महापालिकेने या मार्गावरील वाहतूक मार्गात मोठे बदल करण्याचे जवळपास पक्के केले आहे.

आधी कामे.. मग बदल

प्रत्येक चौकात आठ ठिकाणी याप्रमाणे तिन्ही चौकात २४ ठिकाणी सेवा रस्ते आणि पूर्व द्रुतगती महामार्गाना जोडण्यासाठी मार्गिका तयार करण्यात येणार आहे. यामुळे तिन्ही जंक्शनवरील सद्य:स्थितीतील सिग्नलचा वेळ कमी होईल, असा दावा महापालिकेने केला आहे. तीनही चौकांवर पादचाऱ्यांसाठी रस्ता ओलांडणे सुरक्षित होईल, तसेच मार्गिकेच्या कामासाठी त्याठिकाणी असलेल्या जलवाहिनी, एमजीएल गॅस कंपनीची वाहिनी, इतर सेवा वाहिन्या आणि रस्त्यावरील विद्युत दिवे स्थलांतरित करण्यात येणार आहेत. या तिन्ही चौकांतील बदलांसाठी कोणती कामे करण्यात येणार आहेत, याविषयी प्रस्तावामध्ये माहिती देण्यात आली आहे. मात्र, हे बदल नेमके कसे असतील आणि त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी किती प्रमाणात कमी होईल, याविषयी काहीच स्पष्टता दिलेली नाही.