|| हेमेंद्र पाटील

बोईसर ग्रामपंचायतीच्या बोगस पावत्या देऊन फेरीवाल्यांकडून वसुली; प्रशासनाचे दुर्लक्ष

बोईसर ग्रामपंचायती हद्दीतील फेरीवाल्यांकडून होणाऱ्या बाजारकर वसुलीत गैरव्यवहार होत असल्याचे दिसून येत आहे. बाजारकर वसुलीचा ठेका घेणारा ठेकेदार नियमावली झुगारून फेरीवाल्यांकडून वसुली करत आहेत. फेरीवाल्यांना देण्यात येणाऱ्या कराच्या पावतीत बोईसर ग्रामपंचायतीचा शिक्का नसून बोगस पावत्या वापरून अधिक रकमेची वसुली केली जात आहेत. विशेष म्हणजे याकडे बोईसर ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याने लाखोंचे महसुली नुकसान होत आहे.

बोईसरमधील बाजारपेठा, रस्त्याच्या कडेला असलेले फेरीवाले, विक्रेते, रस्त्यावरील टपऱ्या यांच्याकडे पाच ते २० रुपये बाजारकर वसूल केला जातो. हे दर ग्रामपंचायतीने ठरवून दिले आहेत. त्यासाठी १८ लाख २० हजार रुपयांचा वार्षिक ठेका देण्यात आला आहे. मात्र ठेकेदार ही वसुली करताना नियमभंग करत असल्याचे दिसून आले आहे. ठेकेदाराकडून दुकानदार व फेरीवाले यांना देत असलेल्या करवसुलीच्या पावत्यांमध्ये ग्रामपंचायतींचा शिक्का आणि अनुक्रमांक नसल्याचे दिसून आले आहे. दुकानदार व फेरीवाल्यांकडून ग्रामपंचायतीने ठरवलेल्या बाजारकरापेक्षा अधिक रक्कम वसूल करण्यात येत आहे. बाजारकराच्या रूपाने दररोज १० ते १५ हजार रुपयांची करवसुली होत असतानाही ग्रामपंचायतीच्या उत्पन्नामध्ये वाढ होत नसल्याचे दिसून आले आहे. ठेकेदाराकडून वसुली करत असलेल्या पावत्या बेकायदा असल्याचे निदर्शनास आल्यानंतरही ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.

ग्रामपंचायतीचा बाजारकर ठेका देताना ई-टेंडर काढणे अपेक्षित आहे, मात्र ते काढण्यात आले नाही. त्यामुळे बोईसर ग्रामपंचायतीने दिलेला हा ठेका नियमबाह्य ठरत आहे. गतवर्षी बाजारकरांच्या माध्यमातून नेमकी किती वसुली झाली याचा तपशील ग्रामपंचायतीकडे उपलब्ध होत नसल्याने पुढील ठेका देताना मर्यादा येत असून यामुळे ग्रामपंचायतीला तोटा सहन करावा लागत आहे.

विशेष म्हणजे काही ठिकाणी फेरीवाले व टपरीविक्रेत्यांकडून अधिक रक्कम वसूल केली जात आहे. दर शुक्रवारी बोईसर येथे आठवडा बाजार भरत असून या बाजारातील विक्रेत्यांकडून पावतीपेक्षा दुप्पट रक्कम वसूल केली जात असल्याचा आरोप होत आहे. या सर्व प्रकारामुळे बोईसर ग्रामपंचायतीचा बाजार करव्यवस्थेमधील घोळ समोर आला असून बाजारकर ठेक्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

बाजारात टोपली घेऊन भाजी विकण्यासाठी बसणाऱ्या आदिवासी महिलांकडूनही पावतीपेक्षा अधिक करवसुली केली जाते. त्यातच करपावतीवर ग्रामपंचायतीचा कोणत्याही प्रकारे शिक्का नसल्याचे उघड झाले आहे. याबाबत ग्रामपंचायत मासिक सभेत विषय उपस्थित करून कारवाईची मागणी करण्यात येणार आहे.      – परशुराम दुमाडा, ग्रामपंचायत सदस्य, बोईसर

ग्रामपंचायत ठेकेदारामार्फत करवसुली करते. करवसुलीसाठी देण्यात येणाऱ्या पावत्यांची नोंद घेतली जाते. बाजारकराबाबत ई-टेंडरची प्रक्रिया माहीत नसल्याने ते करता आले नाही. वसूल करण्यात येणाऱ्या पावतीवर शिक्का मारण्यात यावा, त्याला अनुक्रमांकअसावा, तसेच वसूल होणाऱ्या पुस्तिकेची नोंद करण्यात यावी यासाठी संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली आहे.       – कमलेश संखे, ग्रामविकास अधिकारी, बोईसर