बदलापूरने मिळवलेली सांस्कृतिक शहराची ओळख शहरातील अनेक संस्था आजही जपत आहेत. कुळगावमधील संगीत विद्यालय यांसारख्या संस्थांनी केवळ ही ओळख जपली नाही तर वेळोवेळी द्विगुणितही केली. १९७२मध्ये स्थापन झालेल्या या संगीत विद्यालयाने आजवर हजारो शिष्य घडवले आहेत. ४३ वर्षे या विद्यालयाचे संचालक व संगीत शिक्षक अच्युत जोशी अविरत गुरू-शिष्य परंपरा जपत आहेत. त्यांच्या विद्यालयात आलेले अनेक विद्यार्थी या गुरू-शिष्य परंपरेचे पाईक झाले असले, तरी त्यांच्या दोन विद्यार्थिनींनी गुरू-शिष्य परंपरेचा आब राखत गुरूंना अनोखी भेटही दिली आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘सा रे ग म प’ या मराठी संगीताला वाहिलेल्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये संगीत शिक्षक अच्युत जोशी यांच्या अनघा ढोमसे व ऊर्मिला धनगर या दोन विद्यार्थिनींनी यश संपादन केले. त्यांच्या या यशामागे त्यांचे संगीत गुरू अच्युत जोशी यांनी दिलेली शिकवण त्यांच्या कामी आली आहे.
अनघा ढोमसे ही १९९७मध्ये अच्युत जोशी यांच्याकडे संगीताचे धडे गिरवण्यासाठी आली. तिच्या विद्यालयातील पदार्पणातच गुरू-शिष्य परंपरेतील सर्वात महत्त्वाची घटना घडली असल्याचे जोशी यांनी सांगितले. अनघाचे वडील अशोक ढोमसे यांची इच्छा होती की, अनघाने अच्युत जोशी यांच्याकडेच शिक्षण घ्यावे आणि या शिक्षणाची सुरुवात अनघाने गंडाबंधनाच्या विधीने करावी, अशी त्यांची अट होती. आजकाल गुरू-शिष्याच्या नात्याची जपणूक करणारा हा विधी कालबाह्य़ होत असतानाच अनघाने जोशी यांच्या हस्ते पदार्पणातच गंडा बांधून घेतला होता. अनघाच्या वडिलांचा २००३च्या रेल्वे बॉम्बस्फोटात मृत्यू झाला. पण, त्यांची अट अनघाने योग्य ठरवत यश संपादन केल्याचे जोशींनी सांगितले. अनघाचा आवाज पातळ होता, त्यामुळे ती आर्ततेने चांगली गाणी गायची. तिच्या या आवाजाच्या बळावरच तिने २००७मध्ये प्रथमच मराठीत सुरू झालेल्या ‘सा रे ग म प’मध्ये प्रेक्षकांची मने जिंकली.
‘सा रे ग म प’ची २०१०मध्ये झालेली महागायिका ऊर्मिला धनगर आज बहुतांश मराठी चित्रपटांच्या गाण्यांनी प्रत्येक घरात ओळखली जाते. मात्र २००३ पासून गाणे शिकण्यास आलेली व कला शाखेच्या पहिल्या वर्गात आलेली ऊर्मिला बऱ्याच विद्यालयांमध्ये जाऊन शेवटी आपण योग्य ठिकाणी आल्याचे पहिल्या दिवशीच सांगून गेली होती. ऊर्मिलाचा आवाज पहिल्यापासूनच खडा असल्याने ती लोकसंगीत वा लावण्या चांगली गात असे. आजही मराठी सिनेमांमध्येच ती अशी गाणी गाते, परंतु ऊर्मिलाची हीच एकमेव ओळख होऊ नये म्हणून मी तिच्याकडून गाण्यांचे सर्व प्रकार गाऊन घेतले आहेत. ऊर्मिलाने माझ्याकडे असताना केवळ भावगीतेच नव्हे तर नाटय़संगीत व शास्त्रीय संगीतही अत्यंत ताकदीने गायले आहे. तिची ‘सा रे ग म प’च्या कार्यक्रमासाठी निवड झाली, तेव्हाच तिला सांगितले की, तू पहिलीच येशील आणि ती खरेच महागायिका झाली, असे अच्युत जोशी यांनी सांगितले. अनघा व ऊर्मिला आज खूप मोठय़ा स्थानावर असल्या, तरी माझ्यासाठी त्या माझ्या शिष्यच आहेत आणि याचे त्यांनाही भान असून त्या वेळोवेळी मला भेटायला येतात किंवा दूरध्वनीवरून संपर्क साधतात. गुरुपौर्णिमेला तर त्या शक्य असेल तेव्हा माझी भेट घेतात.