21 February 2019

News Flash

दुचाकी रुग्णवाहिका दुर्गम भागासाठी वरदान

दुचाकी रुग्णवाहिकेने जिल्ह्य़ातील २७५, तर तालुक्यातील ७५ रुग्णांना वैद्यकीय सुविधा मिळवून दिली आहे

(संग्रहित छायाचित्र)

दोन महिन्यांत पालघर जिल्ह्य़ात २७५ रुग्णांना वैद्यकीय सुविधा

विजय राऊत, कासा

पालघर जिल्ह्य़ातील दुर्गम भागातील रुग्णांना तातडीची वैद्यकीय सुविधा पुरवता यावी,  यासाठी जव्हार आरोग्य विभागाने दोन महिन्यांपूर्वी दुचाकी रुग्णवाहिका (बाइक अ‍ॅम्ब्युलन्स) उपलब्ध करून दिली. ही रुग्णवाहिका फायदेशीर ठरत असून दोन महिन्यांत पालघर जिल्ह्य़ातील २७५, तर जव्हार तालुक्यातील ७५ रुग्णांना या दुचाकी रुग्णवाहिकेमुळे वैद्यकीय सुविधा मिळणे सुलभ झाले.

पालघर जिल्ह्य़ात अतिदुर्गम, डोंगराळ भागात रुग्णांची नेहमीच हेळसांड होत असते. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्राची स्थिती दयनीय असल्याने कित्येक रुग्णांना उपचार मिळत नाहीत. त्यामुळे मुख्य आरोग्य केंद्रात त्यांना नेण्याची आवश्यकता असते. मात्र वाहन उपलब्ध नसणे, कच्चे आणि अरुंद रस्ते यांमुळे रुग्णांची परवड होते. अनेकदा रुग्णांना जीव गमावावा लागतो. त्यामुळे दुचाकी रुग्णवाहिका ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. जव्हार तालुक्यातील नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील दुचाकी रुग्णवाहिकेने जिल्ह्य़ातील २७५, तर तालुक्यातील ७५ रुग्णांना वैद्यकीय सुविधा मिळवून दिली आहे.

सध्या एक दुचाकी रुग्णवाहिका उपलब्ध असून अधिक रुग्णवाहिकांची गरज असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. एक शहरासाठी आणि दोन ग्रामीण भागासाठी दुचाकी रुग्णवाहिका असावी. तातडीने वैद्यकीय मदत मिळण्यासाठी त्या उपयुक्त ठरणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

रुग्णवाहिका कशी मिळेल?

१०८ क्रमांकावर दूरध्वनी केल्यास अपघात किंवा अत्यावश्यक उपचारासाठी रुग्णाची माहिती द्यावी लागेल. त्यानुसार २५ ते ३० किलोमीटर दरम्यान रुग्णालयात किती तातडीने उपचार करणे आवश्यक आहे हे डॉक्टरांना कळवले जाईल. त्यानंतर दुचाकी रुग्णवाहिका घेऊन उपलब्ध डॉक्टर थेट रुग्ण असलेल्या ठिकाणावर पोहोचेल. प्राथमिक उपचार केल्यानंतर मागून येणाऱ्या रुग्णवाहिकेसोबत पुढील उपचारांसाठी रुग्णाला रुग्णालयात नेले जाईल.

दुचाकी रुग्णवाहिकेचा पालघर जिल्ह्य़ात अनेकांना फायदा झाला आहे. रुग्णांना वेळेवर आणि आवश्यक उपचार मिळाले आहेत. जिल्ह्य़ात २७५ रुग्णांना या रुग्णवाहिकेने वैद्यकीय सुविधा मिळवून दिली आहे.

– डॉ. अजमल खान, जिल्हा व्यवस्थापक, १०८ अ‍ॅम्ब्युलन्स

First Published on October 12, 2018 3:31 am

Web Title: bike ambulances boon to remote areas