जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय; चार वर्षांत टप्प्याटप्प्याने उभारणी
निसर्गाचा सहवास अनुभवण्यासाठी येऊरच्या पायथ्याकडे धाव घेणाऱ्या ठाणेकरांना आता त्यांच्या परिसरात निसर्गसंपन्नतेचा आणि वैविध्याचा अनुभव घेता येणार आहे. ठाण्यातील साकेत परिसरात तब्बल साडेपाच हेक्टर जागेत जैवविविधता उद्यान उभारण्याचा निर्णय ठाणे जिल्हाधिकारी विभागाने घेतला आहे, अशी माहिती ठाण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी दिली. सामाजिक वनीकरण विभागाला या उद्यानाचा आराखडा तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.
ठाणे कारागृह ते बाळकूम रस्त्यालगत आणि कळवा खाडीपर्यंत हे उद्यान विकसित करण्यात येणार असून ते एकंदर पाच भागांत विस्तारले जाणार आहे. पुढील चार वर्षांत टप्प्याटप्प्याने हे उद्यान विकसित केले जाईल, असे डॉ. जोशी यांनी सांगितले. या उद्यानात अद्ययावत निसर्ग माहिती केंद्र उभारण्यात येणार आहे. उद्यानात प्रवेश करताच वन संवर्धन, कांदळवनांचे संवर्धन यासंबंधीची सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे. निसर्गाच्या विविधतेची माहिती देणारे हे एक आगळेवेगळे शैक्षणिक केंद्र असेल, असे डॉ. जोशी यांनी सांगितले. या उद्यानात एक फुलपाखरू उद्यानही असेल. फुलपाखरांना आकर्षित करणाऱ्या स्थानिक झाडांची लागवड या ठिकाणी करण्यात येईल. त्यांच्या शास्त्रीय नावांची माहिती फलकांवर लावण्यात येणार आहे. मुख्य प्रवेशद्वाराजवळ उद्यानास भेट देणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांकरिता वाहनतळाची सुविधा असेल. उद्यानाच्या कुंपणाला चोहोबाजूंनी वेलींचे आच्छादन असेल, असा आराखडा तयार करण्यात आला आहे.
औषधी वनस्पती, रॉक गार्डन, नक्षत्र वन असे विविध विभागही या ठिकाणी तयार करण्यात येणार आहेत. पर्यटकांसाठी निरीक्षण मनोरा, पर्यावरणपूरक चार लहानगे पूल अशी रचना या ठिकाणी असणार आहे. या उद्यानात वीजपुरवठय़ासाठी सौर ऊर्जेचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धार्मिक महत्त्व असलेल्या काही महत्त्वाच्या वृक्षांची जोपासनाही या ठिकाणी करण्यात येणार आहे. फिरायला नैसर्गिक पायवाटा, वृद्धांसाठी आसने यामुळे हे उद्यान ठाणेकरांसाठी पर्यटन केंद्र ठरेल, असा विश्वास सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक फले यांनी व्यक्त केला.