24 February 2019

News Flash

जैव विविधता उद्यान येत्या सहा महिन्यांत खुले

ठाणे येथील साकेत-माजिवडा परिसरात सुमारे ५.२६ हेक्टर जमिनीवर हे उद्यान विकसित केले जात आहे.

सामाजिक वनीकरण विभागामार्फत ठाणे कारागृह ते बाळकूम रस्त्यालगत आणि कळवा खाडीपर्यंत विकसित करण्यात येणारे जैव विविधता उद्यान येत्या सहा महिन्यांत पूर्ण करण्यात यावे, अशा स्वरूपाचे आदेश ठाण्याच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी संबंधित विभागास दिले आहेत. या उद्यानाच्या प्रतिकृतीचे अनावरणही मंगळवारी टाउन हॉल येथे करण्यात आले. जागतिक पाणथळ प्रदेश दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात यासंबंधीचे आदेश देण्यात आले. या वेळी ठाणे परिसरातील विविध शाळांमधील मुलांनी उद्यानाच्या जागेत खारफुटीची लागवड करून पाणथळ दिवस साजरा केला.
ठाणे येथील साकेत-माजिवडा परिसरात सुमारे ५.२६ हेक्टर जमिनीवर हे उद्यान विकसित केले जात आहे. पाच भागांत विस्तारलेले हे उद्यान चार वर्षांत टप्प्याटप्प्याने विकसित केले जाणार असले तरी या उद्यानाचा पहिला टप्पा येत्या सहा महिन्यांत पूर्ण करावा, असे आदेश जिल्हाधिकारी जोशी यांनी मंगळवारी दिले. या उद्यानात अद्ययावत असे माहिती केंद्र विकसित केले जाणार असून उद्यानात प्रवेश करताच वनसंवर्धन, कांदळवनाचे संवर्धन यासंबंधीची सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे. निसर्गाच्या विविधतेचे एक आगळेवेगळे शैक्षणिक केंद्र या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न असणार असून या ठिकाणी एक फुलपाखरू उद्यानही उभारण्यात येणार आहे. औषधी वनस्पती, रॉक गार्डन, नक्षत्र वन असे विविध विभाग या उद्यानात असणार आहेत. पर्यटकांसाठी निरीक्षण मनोरा, ध्यानधारणा केंद्र, वाचनालय, पर्यावरणपूरक लहान पुलाची उभारणी या ठिकाणी करण्यात येणार आहे. ठाणे आणि कळवा या दोन शहरांच्या अगदी मध्यभागी असलेल्या या उद्यानाच्या उभारणीविषयी पर्यावरणप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता असून चार टप्प्यांत सुरू करण्यात येणारे हे उद्यान पर्यटकांसाठी नेमके कधी खुले होईल, असा सवाल मध्यंतरी उपस्थित केला जात होता. हे लक्षात घेऊन या उद्यानाचा पहिला टप्पा येत्या सहा महिन्यांत तर उर्वरित उद्यान पुढील चार वर्षांत पूर्ण केले जाईल, असे डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले.

First Published on February 3, 2016 12:44 am

Web Title: biodiversity park open in six months
टॅग Biodiversity Park