एमएमआरडीएच्या नव्या आराखडय़ात आरक्षणच रद्द

आधीच मीरा-भाईंदरमध्ये पर्यटनस्थळांची, मनोरंजनाच्या साधनांची कमतरता आहे, त्यातच मीरा-भाईंदर शहराचे आकर्षण ठरेल आणि पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येईल, अशा उत्तन येथील जैवविविधता उद्यानाच्या प्रस्तावाचे भवितव्यच आता धोक्यात आले आहे. एमएमआरडीएने उत्तन व आसपासच्या परिसरासाठी नुकत्याच जाहीर केलेल्या विकास आराखडय़ात हे उद्यान ज्या जागेवर वसणार होते, त्या जागेचे पर्यटनस्थळ हे आरक्षणच रद्द झाले आहे. त्यामुळे या उद्यानाचे आता काय होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

उत्तन व आसपासच्या गावांचे नियोजन शासनाने एमएमआरडीएकडे दिले आहे. जुन्या आराखडय़ात उत्तन येथील ९९ हेक्टर सरकारी जागा पर्यटनस्थळासाठी राखीव ठेवण्यात आली होती. मीरा-भाईंदरमध्ये पर्यटनाला चालना मिळावी यासाठी या आरक्षित जागेवर महापालिकेने जैवविविधता उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. या उद्यानाच्या माध्यमातून पर्यटकांना निसर्गाची जवळून ओळख व्हावी, असा उद्देश प्रशासनाचा होता. ९९ हेक्टरपैकी ३१ हेक्टर क्षेत्रफळावर हे उद्यान वसणार होते. मुंबईतील एका कंपनीला उद्यानाचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यास सांगण्यात आले होते. या अहवालानुसार या उद्यानात फुलपाखरू, बांबू, बॉटॅनिकल, रॉक या उद्यानांसह थीम उद्यान विकसित करण्यात येणार आहे. शिवाय दृकश्राव्य अ‍ॅम्फी थिएटर, पक्षीनिरीक्षण, कांदळवनाची सैर आदी उपक्रमांसोबत बच्चेकंपनीसाठी खेळाच्या विभागाची स्वतंत्र निर्मिती करण्यात येणार आहे. सौरऊर्जेचा वापर तसेच पावसाळी पाण्याच्या नियोजनाला प्रोत्साहन देण्यासाठी या उद्यानात प्रकल्पही उभारण्यात येणार आहेत. आधीच या उद्यानाचा प्रस्ताव विविध कारणांमुळे गेल्या तीन वर्षांपासून रखडला आहे. त्यात, आता उद्यान वसणार असलेल्या जागेचे पर्यटनस्थळ हे आरक्षणच रद्द झाले आहे.

विकसित कसे करायचे?

एमएमआरडीएने या परिसराचा विकास करण्यासाठी विकास आराखडय़ास नुकतेच अंतिम स्वरूप दिले आहे. नवा आराखडा तयार करताना आधीची अनेक आरक्षणे रद्द झाली आहेत. त्यात उद्यानाच्या जागेचे आरक्षणही रद्द झाले आहे. त्यामुळे आता हे उद्यान विकसित कसे करायचे, असा प्रश्न प्रशासनापुढे उभा ठाकला आहे. या जागेची शासनाच्या पर्यटन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करावी आणि या ठिकाणी जैवविविधता उद्यान उभारावे, असा निर्णय ऑगस्ट महिन्यात पर्यटनमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता; परंतु असा प्रस्ताव अद्याप जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आलाच नसल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली. पर्यटन विभागाने जागा ताब्यात घेतल्यास या ठिकाणी जैवविविधता उद्यान उभारण्यास चालना मिळणार आहे. पर्यटन विभागाने जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही लवकरात लवकर सुरू करावी, अशी विनंती या विभागाकडे केली आहे.