28 November 2020

News Flash

विद्युतवाहिन्यांवर आता पक्षीरोधक यंत्रणा

बदलापूर शहरातील विद्युत व्यवस्थेचे नूतनीकरण झालेले नसल्यामुळे त्यात सातत्याने बिघाड होत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

 

सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यावर नियंत्रणासाठी प्रयोग

बदलापूर :  विद्युतवाहिन्यांवर पक्षी बसत असल्यामुळे बदलापूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याचा दावा महावितरणकडून करण्यात येत आहे. या दाव्याच्या आधारे त्यांनी आता ही समस्या सोडविण्यासाठी विद्युतवाहिन्यांवर पक्षीरोधक यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या यंत्रणेमुळे विद्युतवाहिन्यांवर पक्षी बसणार नाहीत आणि त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार थांबेल, असा दावा महावितरणकडून करण्यात येत आहे.

बदलापूर शहरातील विद्युत व्यवस्थेचे नूतनीकरण झालेले नसल्यामुळे त्यात सातत्याने बिघाड होत आहे. त्याचे परिणाम गेल्या काही वर्षात शहरातील नागरिकांना सोसावे लागले आहेत. सोमवारी कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या विविध विभागांच्या संयुक्त बैठकीत उपस्थित झालेल्या पाणीप्रश्नावर उत्तर देताना जीवन प्राधिकरणाच्या अधिकऱ्यांनी पाणीपुरवठ्यातील त्रुटींसाठी महावितरण जबाबदार असल्याचा दावा केला होता. तसेच गेल्या दोन महिन्यांत सातत्याने खंडित झालेल्या वीजपुरवठ्याची माहिती जीवन प्राधिकणाच्या वतीने सादर केली होती. त्यामध्ये दोन महिन्यांत तब्बल ५० तास वीजपुरवठा खंडित झाल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. त्याचा पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याचा दावा केल्याने महावितरणाची कोंडी झाल्याचे चित्र होते.

शहरात सातत्याने खंडित होणाºया वीजपुरवठ्याला पक्षी जबाबदार असल्याचा दावा महिवातरणाच्या अभियंत्यांनी केला होता. शहरातील ज्या भागात मोकळ्या जागेवर कचरा किंवा खरकटे अन्न टाकले जाते, त्या ठिकाणी पक्षी ते अन्न खाण्यासाठी येत असतात. पक्षी अनेकदा कचºयाच्या ठिकाणावर जाण्यापूर्वी विद्युतवाहिन्यांवर बसतात आणि अनेकदा ते तारांना चिकटतात, असा दावा महावितरणाच्या अभियंत्यांनी केला होता. त्यावर लोकप्रतिनिधींकडून टीका होऊ  लागताच त्यावर उपाय शोधण्याचा निर्णय महावितरणाने घेतला आहे. या निर्णयानुसार अशा ठिकाणी पक्षीरोधक यंत्रणा बसवली जाणार असल्याचे महावितरणाच्या अभियंत्यांनी सांगितले. प्रायोगिक पद्धतीने काही ठिकाणी सर्वप्रथम ही यंत्रणा बसवली जाणार आहे. त्याचे निरीक्षण करून जर वीजपुरवठा सुधारण्यास मदत झाली तर संपूर्ण शहरभर ही यंत्रणा बसवली जाणार असल्याचे अभियंत्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महावितरणाच्या या नव्या प्रयोगाचा शहरातील वीजपुरवठ्यावर कसा परिणाम होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मध्यरात्री विजेचा लपंडाव

महावितरणाच्या कारभारावर टीका होत असतानाच दिवसासह आता रात्रीही विजेचा लपंडाव सुरू झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दररोज मध्यरात्री काही मिनिटांसाठी वीजपुरवठा खंडित होत आहे. अनेकदा पहाटेही अर्ध्या तासाहून अधिक काळ वीज नसल्याने त्याचा परिणाम नोकरदारांच्या सकाळच्या वेळापत्रकावर होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 12:09 am

Web Title: bird protection system power lines akp 94
Next Stories
1 नगरसेवकांकडूनच सुरक्षित अंतराचा फज्जा
2 वाहनकोंडीचे ग्रहण सुटेना!
3 दिव्याचे अग्निशमन केंद्र ‘संपर्काबाहेर’
Just Now!
X