News Flash

सहज सफर : पक्ष्यांचे खेळघर : मिठागर

मीठ आपण नेहमी प्लास्टिकच्या पिशवीतून आलेलं पाहिलं आहे.

मीठ आपण नेहमी प्लास्टिकच्या पिशवीतून आलेलं पाहिलं आहे. पण मी जिथे उभी होते, तिथे वेगवेगळ्या नैसर्गिक रूपांत मीठ पसरलेलं होतं. आतापर्यंत यश चोप्रांच्या सिनेमात पांढराशुभ्र हिमवर्षांव पहिला होता, तसंच भासणारं, पण हिमाऐवजी मीठ सारीकडे पसरलं होतं. आयताकृती खाचरांमध्ये कुठे मळकट खाडीचं पाणी भरलेलं होतं, तर कुठे कडेकडेनं मिठाचे स्फटिक तयार होऊ  लागले होते. कुठे पूर्ण पांढरी साय पृष्ठभागावर जमली होती, तर कुठे पांढऱ्या मिठाचे बांध तयार झाले होते. रस्त्यापासून उंचावर कुठे मिठाच्या डोंगरावरचे शुभ्रस्फटिक सूर्यप्रकाशात अक्षरश: हिऱ्यांसारखे चमचमत होते, तर कुठे थोडं तपकिरी झाक असलेलं दुय्यम प्रतीचं मीठ रास करून ठेवलं होतं. काही मिठाचे डोंगर पिवळे गवत टाकून पूर्ण झाकले होते. अशा झाकलेल्या डोंगरातलं मीठ पावसाळ्यातसुद्धा विरघळत नाही, असं मला कळलं. वेगवेगळी अवजारे घेऊन वेगवेगळ्या टप्प्यांवरच्या मिठाची निर्मिती प्रक्रिया चालू होती. कुठे टोपल्यांमध्ये तयार मीठ भरून त्यांचे नवे डोंगर बनवायचं काम चाललं होतं. एरवी पानात घेऊन उरलेलं मीठ टाकून द्यायला आपल्याला काहीच वाटत नाही, पण जेवणाला चव आणणारं मीठ बनवण्यामागची मेहनत मात्र प्रथमच मी बघितली.

गंमत म्हणजे मी चालले होते सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर बघायला! कैलासातल्या शुभ्र हिमराशीऐवजी कैलासराणा इथे मिठागरात वसला होता. वसई शहराच्या पूर्व वेशीवर चिमाजी अप्पांचा अश्वारूढ पुतळा  दिसतो. समोरच आत वळणारा कच्चा खडबडीत रस्ता दिसतो. पावसाळ्यात हा रस्ता जवळजवळ बंदच होतो. या रस्त्यानं आत जाताना दोन्हीकडे वहिवाटेच्या कडेला आढळणारी हिरवी झुडपे लागतात. मिठागराशी पोचून उंचवटय़ावर उभं राहिलं की दूरवर महामार्गाकडे जाणारी वाहनांची नि:शब्द वर्दळ दिसते. याच रस्त्याने पुढे पुढे जात राहिल्यावर वाळवंटात कसं ओअ‍ॅसिस असतं, तसा या रूक्ष खाऱ्या जमिनीत एक हिरवाईचा पुंज दिसतो. बेताच्या आकाराचं एक शुभ्र मंदिर आहे. आजूबाजूला साधीसुधी जास्वंदी, तगर, चाफा अशी फुलझाडं आणि नारळाची झाडं आहेत. हे मंदिर पटेल नावाच्या सद्गृहस्थाने बांधले आहे. याच्याच आवारात छोटंसं घर आहे, जे शंभर वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी देऊळ म्हणून बांधलं होतं, असं म्हणतात. परंतु हे किंवा आत्ता असलेलं कोणतंच देऊळ इतकं प्राचीन वाटत नाही, परंतु इथे मनोकामनापूर्तीसाठी करावयाच्या नवग्रह वा तत्सम पूजा नेहमीच चालू असतात. देवदर्शन घेऊन मागच्या आवारात गेल्यावर एक हिरव्यागार पाण्याने भरलेला तलाव आहे. इथे शांत उभं राहावं. शहराच्या हृदयाचे ठोके असावे, तशी लोकलची धडधड दूरवरून आल्यासारखी मध्येच जाणवते आणि मग हळूच डुबकीचा आवाज येतो. काठावरच्या एखाद्या बेडकाने पाण्यात बुडी मारल्याचा.. मग  एखादं कासव हळूहळू पोहताना दिसतं, पोपटांचा आवाज येतो, चिमुकला राखाडी वटवटय़ा पक्षी आवाज करत या फांदीवरून त्या फांदीवर उडय़ा मारताना दिसतो. साळुंक्यांची अखंड बडबड चाललेली असते. बुलबुलांच्या जोडय़ा एकमेकांशी पाठशिवणीचा खेळ खेळत असतात. पिवळाधम्मक सावध हळद्या कुठल्याशा आवाजाने दचकून सोनाराने कस लावायच्या दगडावर सोनेरी रेघ ओढावी तसा हवेत सूर मारून पसार होताना दिसतो. ताम्रपंखी भारद्वाज जमिनीलगत काही शोधताना आढळतो, तर कम्पाऊंड बाहेरच्या जवळच्या झाडावर काळा कुळकुळीत कोकीळ बैठक जमवून बसलेला असतो. शेपटी फुलवत नाचण प्रियाराधन करताना दिसतो. शेपूट दुभंगलेला कोतवालही आसपासच असतो. पाणपक्षी आणि हवेत भिरभिरणाऱ्या पाकोळ्याही इथे आढळतात. या सर्वावर कळस म्हणजे एका हंगामात बाजूच्या नारळाच्या झाडावर सुगरण पक्षांना घरटी विणतानाही मी पाहिलं आहे. हे इतके सारे पक्षी इथे कसे? असं नवल मला वाटलं, पण बहुधा आजूबाजूच्या इतर रूक्ष पाश्र्वभूमीवर इथे पाणी, गारवा आणि झाडं असल्याने असावेत कदाचित! कारण काहीही असो, आपल्या कानांना त्यांची किलबिल ऐकण्याचं सुख आणि सहजासहजी न दिसणारे पक्षी सहज बघण्याचं भाग्य मिळतं हे खरं!

टीव्ही-मोबाइलच्या मायावी जगतातून बाहेर आणून आपल्या मुलांना नैसर्गिक अधिवासातल्या साध्यासुध्या पण सुरेख जिवंत गोष्टींशी परिचय करून द्यायला हे ठिकाण उत्तम आहे. मुलांसोबत एखादी उनाड संध्याकाळ वा उमलती सकाळ घालवायला इथे या. तुम्हीही तुमचं वय कधी विसराल पत्ता लागणार नाही.

मिठागर

कसे जाल?

राष्ट्रीय  महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर वसई पश्चिमेकडे उड्डाण पूल जातो, तिथे पूर्वेकडे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर डावीकडे सिद्धेश्वर महादेव मंदिराकडे अशी दिशा दाखवणारी पाटी दिसते. खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाऊ  शकतात.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2017 1:52 am

Web Title: birds saltpan
Next Stories
1 नामवंतांचे बुकशेल्फ : वाचन हीच जगण्याची ऊर्जा!
2 गडकरी पुतळ्याचा वाद साहित्य संमेलनातही उमटणार?
3 तपासचक्र : दरोडय़ाची उकल
Just Now!
X