ठाणे : ठाणे पालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याविरोधात भाजपच्या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सर्वसाधारण सभेत मन मानेल त्या पद्धतीने मांडण्यात येणाऱ्या विषयांना विरोध केल्यास आयुक्त नगरसेवकांची कामे रोखण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देत असतील तर अशा हुकूमशाही प्रवृत्तीला आपण घाबरणार का, असा सवालही भाजप नगरसेवकांनी सर्वपक्षीय नगरसेवकांना पाठविलेल्या पत्रात केला आहे. विकासकामांचे प्रस्ताव रोखल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही दिला आहे.

ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाने मांडलेले प्रस्ताव सर्वपक्षीय नगरसेवकांनी तहकूब केल्याने चिडलेले पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी नगरसेवक निधीची कामे थांबवण्याचे आदेश सर्व विभागांना दिले आहेत. तसेच मंजूर झालेल्या निविदांची कामेही रोखून धरण्याची सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना केल्याचे समजते. त्यामुळे नगरसेवक विरुद्ध प्रशासन असा संघर्ष पेटला आहे.

ठाणे महापालिकेत हुकूमशाही राजवट सुरू असल्याची टीका करत भाजप नगरसेवकांनी थेट आयुक्तांवर हल्लाबोल केला. ‘दिव्यातील खासगी सीआरझेड जागेवर आधी कचरा टाकायचा. त्यानंतर ५० कोटी खर्चून सामाजिक झाडे लावायची आणि ही जमीन टीडीआरच्या बदल्यात ताब्यात घ्यायची, असा दुहेरी बाजूने भ्रष्टाचाराचा ठराव लोकप्रतिनिधींनी नामंजूर केला. यात गैर काय,’ असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर आणि नारायण पवार यांनी केला आहे.

‘संघटितपणे प्रतिकार करू या आणि आपले हक्क शाबूत राखू या. वेळप्रसंगी विशेष सर्वसाधारण सभा बोलावून अविश्वास ठराव आणावा लागला तरी बेहत्तर,’ असे या पत्रात म्हटल्याची माहिती पाटणकर यांनी दिली.