भाजपचे ठाणे शहरात आंदोलन, तर मनसेची महावितरण कार्यालयावर धडक

ठाणे : टाळेबंदीच्या काळात महावितरणतर्फे ग्राहकांना भरमसाट वीज देयके पाठवण्यात आली असून ही वीज देयके रद्द करण्यासाठी आता राजकीय पक्ष मैदानात उतरले आहेत. ग्राहकांची वाढीव वीज देयके रद्द करण्याच्या मागणीसाठी भाजपच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बुधवारी जोरदार आंदोलन करण्यात आले. तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली.

महावितरण कंपनीने टाळेबंदीच्या काळात १ एप्रिलपासून स्थिर आकार, वहन आकार आणि वीज आकारमध्ये दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टाळेबंदीच्या काळात रोजगार बंद असलेल्या नागरिकांना महावितरणातर्फे किमान दोन हजार ते ५० हजारांपर्यंत देयके पाठवण्यात आली आहेत. तर करोना टाळेबंदीच्या काळात व्यापारी आणि उद्योग क्षेत्राबरोबरच शाळा, महाविद्यालये बंद होती. मात्र, त्यांनाही महावितरणाने सरासरी वीज वापराच्या नावाखाली लाखो रुपयांची देयके पाठवली आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

नागरिकांच्या या संतापाला आता राजकीय नेत्यांनी पािठबा दिला असून वाढीव वीज देयके रद्द करण्यासाठी आता राजकीय पक्ष मैदानात उतरले आहेत. वाढीव वीज देयके रद्द करण्यासाठी भाजप आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. या वेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना वीज देयकांची दरवाढ यंदा स्थगित करावी यासह विविध मागण्यांचे निवेदन राज्य सरकारकडे पाठविण्यासाठी देण्यात आले.

तर, ठाण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी शहरातील महावितरणच्या कार्यावर धडक देत नागरिकांना दिलेल्या वाढीव देयकांविरोधात महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. ग्राहकांना वाढवून दिलेल्या अतिरिक्त देयकांचे समायोजन करून देऊ, असे लेखी अश्वासन यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून लिहून घेतले.