07 March 2021

News Flash

बदलापुरात भाजपही सत्तेत

बुधवारी घेण्यात आलेल्या विशेष समित्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले.

अंबरनाथमध्येही सर्वपक्षीयांना विषय समित्यांमध्ये स्थान; विधानपरिषदेत केलेल्या मदतीची परतफेड

विधान परिषद निवडणुकीत दिलेल्या शब्दाला जागत शिवसेनेने बुधवारी अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकांमधील सत्तेत भाजपला सहभागी करून घेतले. या  नगरपालिकांमधील निवडणुका या दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात लढविल्या होत्या. बुधवारी घेण्यात आलेल्या विशेष समित्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले.

मुंबईसह राज्यभर शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा रंगला असताना ठाणे जिल्ह्य़ात मात्र या दोन्ही पक्षांत मैत्रीचे नवे पर्व सुरू झाल्याचे चित्र आहे. विधान परिषद निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावीत शिवसेनेचे रवींद्र फाटक यांना मदतीचा हात पुढे केल्याने पालकमंत्री एकनाथ िशदे यांनीही भाजपला विविध शहरांमध्ये सत्तेत सहभागी करून घेण्यास सुरुवात केली आहे. ठाणे महापालिकेत स्थायी समितीत अवघा एक सदस्य असताना भाजपला सभापतिपद देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला. याप्रमाणे अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेतही विशेष समित्यांचे सभापतिपद भाजपला देत विधान परिषद निवडणुकीत दिलेला शब्द शिवसेनेने पूर्ण केल्याचे चित्र बुधवारी दिसून आले.

बदलापुरात विरोधात असलेल्या भाजपने विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेला युती धर्माची आठवण करून देत सत्तेत वाटा देण्याची मागणी केली होती. विधान परिषद निवडणुकीत दगाफटका होऊ  नये यासाठी शिवसेनेनेही भाजपच्या मागणीला प्रतिसाद देत उपनगराध्यक्ष पदासह दोन विषय समित्या देण्याचे आश्वासन दिले. अंबरनाथ नगरपालिकेतही काँग्रेस वगळता, शिवसेनेने भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अपक्षांनाही विषय समित्यांमध्ये स्थान दिले. त्यामुळे बुधवारी घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये भाजपला सत्तेत सहभागी करून घेण्याची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. बदलापूर पालिकेत भाजपच्या वाटय़ाला पाणीपुरवठा समिती सभापतिपद देण्यात आले. भाजपच्या सूरज मुठे यांची या पदावर बिनविरोध निवड करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतिपदी चेतन धुळे, स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतिपदी वैशाली पाटील, नियोजन व विकास समिती सभापतिपदी उज्ज्वला आंबवणे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी नेहा आपटे, तर उपसभापतिपदी मीनल धुळे यांची निवड झाली. शिक्षण समितीच्या सभापतिपदी उपनगराध्यक्ष श्रीधर पाटील यांची याआधीच निवड झाली होती.

अंबरनाथमध्ये महायुती

अंबरनाथमध्ये ठरल्याप्रमाणे महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी वीणा उगले, सार्वजनिक बांधकाम समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सदाशिव पाटील, आरोग्य समितीवर भाजपच्या कल्पना गुंजाळ, तर नियोजन समितीसाठी अपर्णा भोईर आणि रेश्मा गुडेकर यांची पाणीपुरवठा समितीच्या सभापतिपदावर वर्णी लागली. त्यामुळे अंबरनाथमध्ये महायुती स्थापन झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2016 1:42 am

Web Title: bjp also came power in badlapur municipalities
टॅग : Bjp
Next Stories
1 कॉलेजच्या कट्टय़ावर : पर्यावरणदिनी माहुली गडाची स्वच्छता
2 खेळ मैदान : क्रिकेट प्रशिक्षण वर्गाचा समारोप
3 पाऊले चालती.. : एकमेव मैदानात अतिक्रमण अन् अस्वच्छतेचा ‘खेळ’
Just Now!
X