२७ गावांमध्ये भाजप, संघर्ष समितीचा विजय

 

मनसेच्या चमकदार कामगिरीमुळे पाच वर्षांपूर्वी दोन आकडी संख्याही गाठू न शकलेल्या भाजपला यंदा डोंबिवलीतील परंपरागत मतदारांनी मोठा हात दिला आहे. शहरातील तब्बल २० जागांवर विजय मिळवत बालेकिल्ल्यांमध्ये भाजपने पुन्हा मुसंडी मारल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. एकीकडे डोंबिवलीत पराभवाचे दणके बसत असताना शिवसेनेला कल्याणमधील मतदारांनी मात्र अपेक्षित साथ दिली. तेथील जवळपास २५ पेक्षा अधिक जागा शिवसेनेने राखल्याने या पक्षाला पन्नाशीपल्याड उडी घेता आली. डोंबिवलीलगतच्या २७ गावांमध्ये मात्र भाजप आणि संघर्ष समितीच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला.

पाच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत मनसेने डोंबिवलीतील भाजपच्या बालेकिल्ल्यांना िखडार पाडले होते. डोंबिवलीतून रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील एक मोठा गट त्या वेळी भाजपवर नाराज होता. राज यांच्या भाषणांची या परंपरागत मतदारांना भुरळ पडली आणि भाजपची गाडी तेव्हा जेमतेम नऊवर येऊन थांबली. यंदा मात्र निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा पुढे करून भाजपने गेल्या वेळची चूक टाळण्याचा प्रयत्न केला. डोंबिवलीत स्मार्ट सिटीच्या परिसंवादासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी सभा संपताच संघ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतरही डोंबिवलीतील उमेदवारी वाटपात जुन्या कार्यकर्त्यांना डावलले गेल्याची चर्चा होती. त्यामुळे संघातील एक मोठा गट नाराज असल्याची चर्चा कानी पडताच अखेरच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा संघ पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. याशिवाय शहरातील उद्योजक, सुशिक्षित नागरिकांच्या स्वतंत्र बैठका त्यांच्यासोबत आयोजित करण्यात आल्या. या सर्वाचा फायदा भाजपला डोंबिवलीत झाल्याचे स्पष्ट चित्र आता पुढे येत आहे. डोंबिवली पूर्वेत तर १४ जागांवर विजय मिळवून भाजपने मुसंडी मारल्याचे दिसून आले.

कल्याण शिवसेनेचे

डोंबिवलीत एकीकडे दारुण पराभवाला सामोरे जावे लागत असताना कल्याणात मात्र शिवसेनेला अपेक्षित असे यश मिळाले. कल्याण पश्चिमेत भाजपचे नरेंद्र पवार हे आमदार आहेत. पूर्वेतील अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनाही भाजपने निवडणुकांपूर्वी पंखाखाली घेतले होते. या दोघांच्या जोरावर कल्याणमधील शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांना धडक मारण्याचे बेत आखले जात होते. विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही मतदारसंघ मोजक्या मतांच्या फरकाने शिवसेनेला गमवावे लागले होते. गणपत गायकवाड यांना पक्षात घेऊन शिवसेनेला या भागात धक्का देण्याचा बेत भाजपने आखला होता. गायकवाड यांनीही पूर्वेत शिवसेनेला बऱ्यापैकी टक्कर देण्याचा प्रयत्न केला असला तरी पश्चिमेत मात्र नरेंद्र पवार यांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. पारनाक्यासारख्या एके काळच्या भाजपच्या बालेकिल्ल्यातून शुभा पाध्ये यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले असून या प्रभागातील मुस्लीम समाजाचे धुव्रीकरण झाल्याचे चित्र पुढे आले आहे.

test