आगामी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजप यांच्यातील दरी अधिकच रूंदावत चालल्याचे समोर येत आहे. या दोघांचा मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या रामदास आठवले यांच्या वक्तव्याने या गोष्टीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये युती होणारच नाही, असा दावाच आठवले यांनी केला.

नक्की वाचा:- ‘पॅकेज’चे वक्तव्य मुख्यमंत्र्यांना भोवण्याची शक्यता

भाजप सध्या रिपाईच्या साथीने निवडणूक लढवण्याची चाचपणी करत असून आम्ही त्यांच्याकडे २२ जागांची मागणी केल्याचे आठवले यांनी सांगितले. पालिकेच्या १३७ जागांपैकी २२ जागा आमच्यासाठी सोडणे भाजपला अवघड नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी शिवसेना-भाजपची बोलणी सुरू असली तरी त्यामधून फार काही निष्पन्न होणार नसल्याचे दिसत आहे.
दरम्यान, आठवले यांनी शिवसेनेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी (मनसे) युती करण्याचाही सल्ला दिला . मात्र, त्यासाठी राज यांना मनसेचे विसर्जन करून पुन्हा शिवसेनेत परतावे लागेल. उद्धव आणि राज यांनी एकत्र यावे ही अनेकांची इच्छा असली तरी ही गोष्ट त्या दोघांना जाणवली पाहिजे. बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर राज ठाकरे यांनी शिवसेनेत आले पाहिजे. परंतु, मनसे आणि शिवसेना असे दोन स्वतंत्र पक्ष अस्तित्वात असताना दोघांमध्ये युती होणे शक्य नसल्याचे आठवलेंनी यावेळी म्हटले.