भाजप तसेच श्रमजीवीच्या आंदोलनाचा प्रवाशांना फटका

ठाणे : भाजप आणि त्यापाठोपाठ श्रमजीवी संघटनेने काढलेल्या मोर्चामुळे मंगळवारी ठाणे तसेच कळवा शहरातील अंतर्गत मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते मोर्चाच्या ठिकाणी पायी निघाल्यामुळे ठाणे आणि कळवा भागातील वाहतूक काही काळ रोखून धरल्याने कोंडी झाली. ऐन दुपारच्या वेळेत झालेल्या कोंडीमध्ये अन्य वाहनांसह विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने अडकून पडली होती. तर कळव्याहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे अनेक नागरिक कळवा पुलावरून ठाणे स्थानकाच्या दिशेने पायपीट करताना दिसून आले.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी सकाळी भाजपच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. त्यासाठी भाजपचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जमले होते. हा मोर्चा संपत नाही तोच श्रमजीवी संघटनेचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. सेंट्रल मैदानाजवळील  रस्त्यावरील वाहतूक बंद करून या मोर्चेकरांना तिथे थांबविण्यात आले होते. दिवसभरात दोन मोर्चे निघाल्यामुळे शहरातील वाहतुकीचे तीनतेरा वाजले. भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, जिल्हा रुग्णालय, साकेत, सिडको आणि कळवा भागातील वाहतुकीवर परिणाम होऊन कोंडी झाली होती. भाजपचा मोर्चा संपल्यानंतर वाहतूक पोलीस सर्वच अंतर्गत मार्गावरील कोंडी सोडवून वाहतूक पूर्ववत करीत होते. मात्र, तासाभरातच श्रमजीवीचा मोर्चा ठाण्यात आला. या मोर्चात सामील होण्यासाठी आलेले कार्यकर्ते साकेत रोड येथून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने पायी निघाले होते. यामुळे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अंतर्गत मार्गावरील वाहतूक काही काळ रोखून धरण्यात आली होती. यामुळे परिसरातील मार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.

ऐन दुपारच्या वेळेत झालेल्या या कोंडीत शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने अडकून पडली होती. तर कळव्याहून ठाण्याच्या दिशेने येणारी वाहतूक बंद करून ती खारेगाव टोल नाका मार्गे वळविण्यात आली होती. यामुळे नागरिकांना खारेगावहून वळसा घालून प्रवास करावा लागत होता. तसेच कळवा- ठाणे स्थानक अशी रिक्षा आणि बस वाहतूक ठप्प झाल्यामुळे नागरिकांनी स्थानकाच्या दिशेने पायी प्रवास सुरू केला. त्यामुळे कळवा पुलाहून ठाणे स्थानकाच्या दिशेने नागरिकांचे जथे पायपीट करताना दिसून आले. अखेर काही काळानंतर सेंट्रल मैदानासमोरील रस्त्यावर मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी थांबविले आणि इतर सर्व मार्गावरील वाहतूक पूवर्वत केली. मात्र कोंडी सोडविताना पोलिसांच्या नाकीनऊ आल्याचे चित्र होते.

बससेवेवरही परिणाम

ऐरोली, दिघा, विटावा आणि कळवा परिसरातील नागरिक टीएमटी आणि एनएमटीच्या बस गाडय़ांनी ठाणे स्थानकाजवळील सिडको बस थांब्यापर्यंत प्रवास करतात. मात्र, मंगळवारी दुपारी मोर्चामुळे कळव्याहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक रोखून धरल्यामुळे या भागातून येणारी बस वाहतूक ठप्प झाली होती. काही काळानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली होती. मात्र, तरीही या मार्गावर वाहतूक कोंडी कायम होती. त्यात या बसगाडय़ा अडकून पडल्या होत्या. सिडको बस थांब्यावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. तसेच बस गाडय़ांना उशीर झाल्याने प्रवाशांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या.

मोर्चामुळे काही काळ वाहतूक रोखून धरण्यात आली होती. मात्र मोर्चा ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर वाहतूक पूवर्वत करण्यात आली. त्यामुळे काही काळ कोंडी झाली होती. ती तात्काळ सोडवून वाहतूक पूवर्वत करण्यात आली.

-अमित काळे, पोलीस उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा

ऐरोली येथून दुपारी एक वाजता कामावर जाण्यासाठी बसने ठाणे स्थानकात जात होतो. मात्र, विटावा येथे बस वाहतूक कोंडीत अर्धा तास अडकून पडली होती. त्यामुळे कामावर पोहोचण्यास उशीर होत असल्याने बसमधून उतरून ठाणे स्थानकाच्या दिशेने पायी निघालो.

-राजेश परब, ऐरोली

कल्याण ते ठाणे रेल्वे प्रवास केल्यानंतर बाळकुम भागात जाण्यासाठी रिक्षाने प्रवास करीत होतो. रिक्षा कोंडीत अडकून पडल्यामुळे बाळकुम येथे पोहोचण्यास उशीर झाला.  नेहमी २० ते २५ मिनिटे लागतात. मात्र कोंडीमुळे एक तासाहून अधिक वेळ लागला.

-अवकाश म्हात्रे, कल्याण</strong>