कल्याण पूर्वेतील फलकांवरील छायाचित्रे हटवली

कल्याण पूर्व मतदारसंघात येणाऱ्या उल्हासनगरमधील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेवर लावण्यात आलेल्या गणपत गायकवाड यांच्या बॅनरवरून काही शिवसेना नगरसेवकांनी आपल्या छबी कापून काढल्यामुळे युतीमधील दरी आणखी रुंदावली आहे. गायकवाड यांची उमेदवारी आम्हाला मान्य नाही त्यामुळे आमची छबी वापरण्याचा त्यांना अधिकार नाही असा पवित्रा या नगरसेवकांनी घेतला आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी गायकवाड यांच्या प्रचार रॅलीमध्ये कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सहभागी झाल्याने शिवसेनेतील बंडाची धार बोथट होत असल्याची चर्चा होती. मात्र, नेते जरी गायकवाड यांच्यासोबत असले तरी शिवसैनिक त्यांच्या विरोधात आहे, अशी भूमिका या नगरसेवकांनी घेतली आहे.

Rahul gandhi
“सत्तेत आल्यावर पहिल्याच दिवशी…”, राहुल गांधींची भंडाऱ्यात अग्निवीर योजना आणि जीएसटीबाबत मोठी घोषणा
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
Kolhapur Lok Sabha, Hasan Mushrif
कोल्हापूरच्या आखाड्यात हेलिकॉप्टरवरून जुंपली
Eknath Shindes Shiv Senas claim on Bhiwandi Lok Sabha
भिवंडी लोकसभेवर शिंदेच्या शिवसेनेचा दावा, कल्याणचे पडसाद भिवंडीत

शिवसेना भाजप युतीला कल्याण शहरात मोठय़ा प्रमाणावर बंडखोरीची लागण झाली आहे. पूर्वेची जागा भाजपच्या वाटेला गेल्याने तिथे गणपत गायकवाड यांना भाजपने उमेदवारी दिली. या ठिकाणी उल्हासनगर महापालिकेचे शिवसेना नगरसेवक धनंजय बोडारे यांनी बंडखोरी करत आपली उमेदवारी दाखल केली आहे. त्यांना उल्हासनगर महापालिकेतील १० तर कल्याण महापालिकेतील १८ नगरसेवकांनी राजीनामा देत पाठिंबा दिला. त्यामुळे शिवसेना धनंजय बोडारे यांच्या पाठीशी उभी असल्याचे बोलले जात होते. मात्र बंडखोरांना नाही तर महायुतीच्याच उमेदवाराला विजयी करा असा आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर शिवसैनिक गणपत गायकवाड यांच्या पाठीशी उभे राहतील अशी शक्यता होती. मात्र दोन दिवसात शिवसैनिकांचा असहकार कायम असल्याचे दिसून आले आहे.

उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील १० प्रभाग कल्याण पूर्व मतदारसंघात येतात. शिवसेनेची उल्हासनगरची मध्यवर्ती शाखाही त्यातच येते. भाजपच्या गणपत गायकवाड यांची छबी असलेला बॅनर मंगळवारी या मध्यवर्ती शाखेवर लावण्यात आला होता. मात्र दुपारी काही कार्यकर्त्यांनी इथे येत या बॅनरवरून प्रभागातील सहा नगरसेवकांची छबी कापून काढली आहे.

यात लीलाबाई आशान, अरुण आशान, सुनील सुर्वे, सुरेंद्र यादव, मिताली चानपूर आणि शेखर यादव यांची छबी छापण्यात आली होती. मात्र आपण यापूर्वीच अपक्ष उमेदवार धनंजय बोडारे यांना पाठिंबा जाहीर केला असून रीतसर राजीनामेही पक्षश्रेष्ठींकडे सुपूर्द केले आहेत. त्यामुळे आमचा गणपत गायकवाड यांना विरोध असल्याचे नगरसेवक अरुण आशान यांनी सांगितले आहे. ‘आम्हाला भाजप उमेदवाराने कधीही विश्वासात घेतले नाही. आता पायाखालची वाळू सरकल्याने आमचे छायाचित्र फलकावर लावून आमच्या प्रभागात मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे,’ असे आशान म्हणाले.