शिवसेना आमदाराने विकासकामे केली नसल्याची टीका

अंबरनाथ : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर ठाण्यात शिवसेना-भाजपात पेटलेल्या संघर्षांची राळ आता थेट अंबरनाथपर्यंत पोहोचली असून विद्यमान आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या कारभारावर टीका करत भाजप पदाधिकाऱ्याने अंबरनाथ मतदारसंघावर दावा केला आहे. किणीकर यांना दहा वर्षे देऊनही शहराचा हवा तसा विकास झाला नाही. आजही शहर चांगले रुग्णालय, पिण्याचे पाणी, उद्याने यांसारख्या सुविधांपासून वंचित आहेत, असा आरोप करत भाजपच्या उद्योग सेलचे अध्यक्ष सुमेध भवार यांनी आमदार किणीकरांवर हल्ला केला आहे, तसेच त्यांनी हा मतदारसंघ भाजपासाठी सोडण्याची मागणीही केली आहे.

विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपल्यानंतर विविध मतदारसंघात इच्छुकांनी आपापले दावे बळकट करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या ताब्यात असून डॉ. बालाजी किणीकर येथून सलग दोनदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि भाजपातील दुरावा वाढल्याने शहरात विधानसभेसाठी भाजपातर्फे इच्छुकांची गर्दी झाली होती. त्याचवेळी गेल्या वर्षी अंबरनाथमधील उद्योजक सुमेध भवार यांना पक्षात घेत भाजपने त्यांना उद्योग विभागाचे अध्यक्षपद देऊ  केले होते. त्यानंतर शहरातील इच्छुकांची संख्या कमी झाली होती.

लोकसभा निवडणुकीत युती झाल्याने भाजपातून या मतदारसंघाबाबत अधिक बोलले जात नव्हते. मात्र लोकसभा निवडणूकीचा निकाल लागताच भाजपातील इच्छुकांनी पुन्हा आपले दावे करण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच सुमेध भवार युथ फाउंडेशनच्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी सुमेध भवार यांनी पत्रकार परिषद घेत अंबरनाथ विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकला आहे. यावेळी त्यांनी विद्यमान शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या कारभारावर टीका केली आहे. अंबरनाथ शहरात नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात असून दहा वर्षांपासून आमदार आणि खासदार शिवसेनेचे आहेत. आमदार डॉ. किणीकर यांना दोनदा शहराने संधी दिली. मात्र शहराचा विकास झालेला नाही. त्यामुळे शहरासाठी यंदा ही जागा भाजपला मिळावी, अशी मागणी करणार असल्याचेही भवार यांनी सांगितले आहे.

काँग्रेसचाही जागेवर दावा

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. मात्र गेल्या दोन वेळा याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला प्रभाव पाडता आला नाही. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, अशी काँग्रेसची मागणी होती. त्यानुसार ही जागा काँग्रेसच्या पदरात पडल्याची माहिती कॉंग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी दिली.

राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम नसलेली लोक माझ्यावर आरोप करत आहेत. ते भाजपचे आहेत, असे म्हटले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबरनाथला दिलेल्या कोटय़वधी रुपयांच्या निधीवर आणि त्याच्या शहर प्रेमावर ते संशय व्यक्त करत आहेत. माझ्यालेखी ते दुय्यम आहेत. अंबरनाथची जागा कुणाला द्यायची तो वरिष्ठांचा निर्णय आहे.

– डॉ. बालाजी किणीकर, आमदार, अंबरनाथ