पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेवर स्वार होऊन गेल्या काही वर्षांपासून भारतीय जनता पक्षाने इतर पक्षातील आयारामांची जोरदार आयात सुरू केल्याने बदलापुरातील पक्षाच्या नव्या कार्यकारिणीवर पूर्वाश्रमीच्या भाजपचा वरचष्मा दिसू लागला आहे. या भागातील पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विद्यमान भाजप आमदार किसन कथोरे यांच्या भाजप प्रवेशानंतर हे चित्र ठसठशीतपणे दिसू लागले आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे कपिल पाटील भाजपात दाखल झाले. तात्काळ त्यांना तिकीट जाहीर होऊ न ते खासदार म्हणून निवडूनही आले. विधानसभा निवडणूकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात डावलले जात असल्याचे कारण देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन आमदार किसन कथोरे यांनीही भाजपची वाट धरली. त्यांच्यासोबत बदलापूर शहरातील राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि पदाधिकारी भाजपमध्ये दाखल झाले. बदलापुरात भाजप आणि संघाची विचारसरणी बाळगणाऱ्यांची संख्या कमी नाही. या पक्ष प्रवेशामुळे यापैकी अनेक नाराज झाले. मात्र, बेरजेचे गणित लक्षात घेऊन पक्षातील वरिष्ठांनी नाराजांकडे फारसे लक्ष दिले नाही. विधानसभा निवडणुकीत किसन कथोरे यांचा मोठय़ा मताधिक्याने विजय झाला असला तरी बदलापूर नगरपालिका निवडणुकीत मात्र भाजपचा निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश घेतलेले अनेक नगरसेवक पक्षात सक्रिय झाले. हे होत असताना पक्षातील जुने नेते मात्र आडोशाला गेले असल्याचे चित्र असून बदलापूर, मुरबाड पट्टय़ात यामुळे दोन गट दिसू लागले आहेत. सध्या भाजपचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार हे राष्ट्रवादीतून आलेले, तसेच विद्यमान आमदारही राष्ट्रवादी काँग्रेसचे पूर्वाश्रमीचे नेते आहेत. त्यात आणखी भर पडली आहे ती बदलापूर शहराध्यक्षपदी नुकतेच निवडले गेलेले नगरसेवक संभाजी शिंदे यांची. शिंदे हे आमदार कथोरे यांचे खंदे समर्थक आहेत. त्यांच्या निवडीमुळे पक्षातील माजी नगराध्यक्षांपासून अनेक धडाडीचे जुने नेते नाराज असल्याची जाहीर चर्चा सुरू झाली आहे. कथोरे यांच्या कट्टर समर्थकाच्या गळ्यात शहराध्यक्षपदाची माळ पडणार हे स्पष्टच होते. तरीही कथोरे यांची कार्यपद्धती पाहता त्यांना पक्षात मोकळे रान देऊ नका, असा मतप्रवाह काही जुन्या नेत्यांमध्ये होता. मात्र, िशदे यांची निवड झाल्याने बदलापुरातील भाजपवर कथोरे यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसू लागला आहे.

याविषयी भाजप गटनेते राजेंद्र घोरपडे यांनी नाराजी असल्याचे कबूल केले. त्यामुळे नव्या शहर अध्यक्षांपुढे शहरात जुन्या नेत्यांसोबत काम करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

नवे विरुद्ध जुने

नुकत्याच झालेल्या शहर अध्यक्ष निवड प्रक्रियेवर जुन्या भाजप नेत्यांनी आक्षेप घेतला असून, एका बडय़ा नेत्याच्या नाराजीला दूर करण्यासाठी खासदारांना बदलापुरात येण्याची वेळ आल्याचे समजते आहे. एकंदरीतच निवड प्रक्रियेवर बोट ठेवत जुन्यांनी नव्यांविरोधात वरिष्ठ पातळीवर आघाडी उघडली आहे. त्यामुळे हा वाद लवकर न मिटल्यास त्याचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता आहे.