कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या ठरावांबाबत दोन दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी
कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या जून महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर झालेले ठराव रद्द करण्यात यावेत, यासाठी भाजपच्या सर्वच नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून येत्या १७ डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत सुनावणी होणार आहे. सत्ताधारी शिवसेनेला हा धक्का मानला जात असून आगामी सर्वसाधारण सभेतील काही ठरावांवरही भाजपचे नगरसेवक नाराज असल्याचे समजत आहे. त्याबाबतही तक्रार करण्याचा निर्धार त्यांच्यापैकी काहींनी बोलून दाखविला आहे. त्यामुळे बहुमताच्या जोरावर ठराव मंजूर झाल्यानंतरही ठराव रद्द करण्याची पाळी आल्यास हा सत्ताधारी शिवसेनेला मोठा फटका मानला जाईल, अशी चर्चा सध्या पालिका वर्तुळात होत आहे.
बदलापूर पालिकेच्या १७ जून २०१५च्या सर्वसाधारण सभेत मंजूर झालेले ठराव रद्द करण्यात यावेत, अशी मागणी भाजपचे गटनेते राजेंद्र घोरपडे यांनी सर्व भाजप नगरसेवकांच्या सह्य़ा असलेल्या पत्राद्वारे जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांच्याकडे केली आहे. या सभेतील विषय क्रमांक १७ व ४० हे रद्द करण्यात यावेत, अशीही लेखी तक्रार करण्यात आली आहे.
त्यामुळे भाजपने सत्ताधारी शिवसेनेविरुद्ध शड्डू ठोकल्याचे दिसत असून उत्तरोत्तर हा संघर्ष वाढत जाण्याचीच चिन्हे दिसत आहेत. तसेच आगामी १८ डिसेंबरच्या सभेतही असेच काही ठराव मंजुरीला असल्याचे भाजपचे म्हणणे असून, त्यांनाही विरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बदलापूर पालिकेच्या दलित वस्तीच्या विषयातील कामांबाबतसुद्धा भाजपतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली असून, त्याचीही सुनावणी १७ तारखेलाच होणार आहे.
ठरावांवरील आक्षेप…
*विषय क्रमांक १७ नुसार शासकीय संस्था, उदाहरणार्थ सार्वजनिक बांधकाम खाते, मुंबई प्रदेश विकास प्राधिकरण आदींना  पालिका हद्दीत काम करताना पालिकेचा ना हरकत दाखला घेणे बंधनकारक नाही, तसे न्यायालयाचे आदेश असताना या  ठरावात पालिकेचा ना हरकत दाखला घेणे बंधनकारक केलेले आहे. ठराव मंजूर करणे म्हणजे न्यायालयाचा अवमान  होणारआहे.

*विषय क्रमांक ४० हा आलेल्या निविदांवर निर्णय घेणे हा होता. मात्र या वेळी एकही निविदा वाचून दाखवलेली नाही किंवा  विषयपत्रिकेवरसुद्धा निविदांचा उल्लेख नाही. त्याचप्रमाणे एकाही निविदेच्या टिप्पणीमध्येसुद्धा उल्लेख नाही. त्यामुळे  निविदांबाबतची कोणतीही माहिती मिळत नसल्याने हा विषयसुद्धा रद्द करण्यात यावा.