भिवंडी महापौर निवडणुकीत ‘हाता’साठी अवलक्षण

भिवंडी महापालिकेतील ९० पैकी ४७ नगरसेवकांचे खणखणीत संख्याबळ असूनही महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस श्रेष्ठींनी दाखविलेल्या गाफीलपणाचा फटका गुरुवारी पक्षाला बसला. भाजप आणि कोणार्क विकास आघाडीने केलेल्या व्यूहरचनेकडे केलेले दुर्लक्ष आणि मुस्लीम नगरसेवकांचा भरणा असताना उमेदवाराची निवड करताना दाखवलेला गलथानपणा यामुळे काँग्रेसला महापौर निवडणुकीत पराभवाचे तोंड पाहावे लागले.

भिवंडी महापालिकेत काँग्रेस पक्षाकडे स्पष्ट बहुमत असतानाही गुरुवारी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या अचूक खेळीमुळे काँग्रेस नामोहरम झाल्याचे पाहायला मिळाले. या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसला उघडपणे मदत केली, मात्र काँग्रेसच्याच नगरसेवकांत फूट पडली. कोणार्क विकास आघाडीच्या नगरसेविका प्रतिभा पाटील यांना भाजप, सपा, रिपाइं यांच्यासह काँग्रेसच्या १८ नगरसेवकांनी उघडपणे मतदान करत विजयी केले. प्रतिभा पाटील या महापौरपदी तर इम्रानवल्ली खान हे उपमहापौरपदी निवडून आले. खान हे उपमहापौर झाले असले तरी पक्षातील फुटीर नगरेसवकांच्या पाठबळावर ते निवडून आल्याने पुढील काळात पक्षादेशाचा वाद न्यायालयीन प्रक्रियेत सापडण्याची चिन्हे आहेत.

भिवंडी महापालिकेची निवडणूक अडाच वर्षांपूर्वी पार पडली. या निवडणुकीत ९० पैकी ४७ जागा मिळवून काँग्रेसने एकहाती सत्ता मिळविली होती. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक जावेद दळवी हे महापौर झाले होते. त्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यामुळे गुरुवारी महापौर पदासाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत बहुमताच्या जोरावर काँग्रेस पक्षाचा महापौर पुन्हा विराजमान होण्याची शक्यता होती. तसेच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर आल्यामुळे भिवंडीत शिवसेनेच्या १२ नगरसेवकांच्या मदतीने काँग्रेसच्या बहुमताचा आकडा ५९ वर पोहचेल अशी शक्यता वर्तविली जात होती. या बहुमताच्या आकडय़ामुळे प्रतिस्पर्धी उमेदवाराचा दारुण पराभव होईल, असे अंदाज बांधले जात होते. असे असताना अवघे चार नगरसेवक असलेल्या कोणार्क विकास आघाडीने भाजपच्या मदतीने काँग्रेस, शिवसेनेला धूळ चारल्याचे पाहायला मिळाले.

भाजपची खेळी निर्णायक

भिवंडी महापालिकेतील भाजपच्या १९ नगरसेवकांनी प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला होता. महापालिकेतील सत्तेपासून काँग्रेसला दूर करण्यासाठी भाजपने ही खेळी खेळली होती. त्यामध्ये भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जात आहे. भाजपपाठोपाठ सपा, रिपाइं आणि अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे प्रतिभा पाटील यांचे संख्याबळ ३१ पर्यंत पोहोचले होते. असे असतानाच कोणार्क विकास आघाडीचे नगरसेवक विलास पाटील यांनी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांना गळाला लावले आणि त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली. या नगरसेवकांच्या जोरावर प्रतिभा पाटील यांनी काँग्रेसच्या उमेदवार रिषिका राका यांचा आठ मतांनी पराभव करून महापौर पद काबीज केले. तर पाटील यांना उघडपणे मतदान करणारे काँग्रेसचे नगरसेवक इम्रानवल्ली खान यांनी शिवसेनेचे बाळाराम चौधरी यांचा आठ मतांनी पराभव केला.

उमेदवार निवड अंगलट

जावेद दळवी यांच्या पाठोपाठ यंदाही काँग्रेसने मुस्लीम समाजातील नगरसेवकाला महापौर पदाची उमेदवारी द्यावी असा पक्षातील बहुसंख्य नगरसेवकांचा आग्रह होता. हा आग्रह पूर्ण होत नसल्याचे पाहून पक्षातील नगरसेवकांचा एक मोठा गट नाराज होता. कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील हे या भागातील मोठे प्रस्थ मानले जातात. यापूर्वीही त्यांनी इतर पक्षांतील नगरसेवकांना गळाला लावून महापालिकेवर सत्ता स्थापन केली आहे. यंदा पाटील यांना भाजपचे खासदार कपिल पाटील आणि स्थानिक आमदार महेश चौगुले यांची साथ मिळाली. राज्यातील सत्तेत समाजवादी पक्ष सहभागी असला तरी या पक्षातील दोन नगरसेवकांनी कोणार्क आघाडीला साथ देण्याचा निर्णय घेतला. अल्पसंख्याक समाजाला दूर ठेवल्याचा आरोप करत काँग्रेसमधील बंडखोरांनी हे पाऊल उचलले असल्याचे दाखविले जात असले तरी या निवडणुकीत झालेला घोडाबाजार निर्णायक ठरल्याची चर्चा आहे.

भिवंडी महापालिकेत काँग्रेसचा उपमहापौर झाला असून या ठिकाणी अजूनही काँग्रेसची सत्ता आहे. आजही आणि उद्याही पक्षातच राहणार आहोत. दोन पक्षादेशाबाबत आम्हाला काहीच माहिती नसून जो पक्षादेश आला, त्याचे पालन झाले आहे.  – इम्रानवल्ली खान, नवनिर्वाचित उपमहापौर (काँग्रेस)

आम्ही कोणत्याही नगरसेवकाला बंदिस्त केलेले नसून नगरसेवकांचे स्वातंत्र्य कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. काँग्रेसच्या नगरसेवकांनी स्वत:हून फोन करून आम्हाला सहकार्य करण्याबाबत कळविले होते.  – विलास पाटील, नगरसेवक, कोणार्क विकास आघाडी