भाजप नगरसेवक आणि समर्थकांचे कृत्य

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ‘ह’ प्रभागातील अभियंता महेश गुप्ते यांना बुधवारी सायंकाळी महापालिका मुख्यालयातील शहर अभियंता कार्यालयात भाजपचे डोंबिवलीतील नगरसेवक शैलेश धात्रक व त्यांच्या समर्थकांनी शिवीगाळ, धक्काबुक्की करत मारहाण केली.

बुधवारी संध्याकाळी कल्याण मुख्यालयातील शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांच्या कार्यालयात अभियंता महेश गुप्ते उपस्थित होते. त्या वेळी तेथे नगरसेवक शैलेश धात्रक, त्यांच्या समर्थकांनी विकासकामांच्या नस्ती गुप्ते मार्गी लावत नाहीत, असा आरोप करत महेश गुप्ते यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. या वेळी धात्रक यांच्या पाठीराख्यांनी गुप्ते यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण केली. शहर अभियंता कुलकर्णी व अन्य अधिकाऱ्यांच्या समक्ष हा प्रकार झाला. बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुप्ते यांनी रात्री उशिरा शैलेश धात्रक यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

पालिकेतील काही ठरावीक नगरसेवक ऑनलाइन विकासकामांच्या नस्ती मंजूर करण्याच्या प्रक्रियेला वळण देऊन स्वत:च्या मर्जीने व रेटून नस्ती मंजूर करून घेतात. यासंबंधीच्या तक्रारी काही अभियंत्यांनी आयुक्तांपर्यंत पोहोचविल्या आहेत.

आरोप-प्रत्यारोप

प्रभागातील विकासकामांच्या नस्ती तातडीने मंजूर करा, असा दबाव सातत्याने नगरसेवकांकडून होत असल्याच्या तक्रारी यानिमित्ताने काही अभियंत्यांनी आयुक्त ई.रव्ींद्रन यांच्याकडे केल्या आहेत. विष्णुनगर प्रभागाचे भाजपचे नगरसेवक शैलेश धात्रक ‘ह’ प्रभागातील अभियंता महेश गुप्ते यांच्यावर सातत्याने दबाव टाकून प्रभागातील विकासकामांच्या नस्ती मंजूर करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप अभियंत्याने केला आहे. योग्य मार्गाने विकासकामांच्या नस्ती मंजूर झाल्यास पुढील कामात अडथळा येणार नाही, असे अभियंता गुप्ते यांचे म्हणणे होते. त्यांनी तसे धात्रक यांना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र गुप्ते हे जाणूनबुजून आपल्या प्रभागातील कामांच्या नस्ती अडवून ठेवतात, असा आरोप धात्रक यांनी केला आहे.