|| मयुर ठाकुर 

विधानसभा निवडणुकीत बंडखोरी  होण्याच्या भीतीमुळे  भाजपमधील दोन गटात वाद :- मिरा रोड मधील  शांतीनगर परिसरातील   नवरात्री उत्सवात  भाजपा  पक्षातील  नगरसेवकांमध्ये चक्क  हाणामारी  घडल्याचे समोर  आले आहे. भाजप पक्षातील दोन गटामधील हा वाद असून पूर्व महापौर तसेच वर्तमान  नगरसेविका गीता जैन यांच्या विरोधात  नया नगर पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिरा रोड मधील शांती नगर सेक्टर तीन परिसरात नवरात्री उत्साहाचे आयोजन करण्यात आले होते.नवरात्री उत्साहाचे आयोजन हे भाजप  नगरसेवक दिनेश जैन  यांनी केले होते. कार्यक्रमाला शहरातील  प्रमुख पाहुण्यांनी देखील हजेरी लावली असतानाच  भाजप  पूर्व महापौर तसेच वतर्मान  नगरसेविका गीता जैन यांनी हजेरी लावली. परंतु कार्यक्रमात उपस्थित राहून देखील  गीता जैन यांना  कुठल्याही प्रकारचा सन्मान न दिल्यामुळे  त्यांच्या समर्थकांमध्ये  संतापाचे वातावरण निर्माण  होऊन   चक्क  वादाला सुरुवात झाली. वाद इतक्या प्रमाणात वाढला की भाजप पक्षातील दोन्ही नगरसेवक गीता जैन आणि  दिनेश जैन हे आपसात भिडले.कार्यक्रमात झालेल्या वादामुळे  पूर्व महापौर गीता जैन यांच्या विरोधात  नया नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवरात्री उत्सवात झालेला वाद हा भाजप पक्षातील दोन गटांमधील वाद असल्याचे समोर आले आहे. पूर्व महापौर गीता जैन यांनी पूर्वीच  आपण   विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते परंतु त्यांना भाजप पक्षातुन   तिकीट न मिळाल्यामुळे बंडखोरी होण्याची शक्यता अधिक वर्तवली जात होती.  विधानसभा निवडणुकीपूर्वी मिरा भाईंदर शहरातील समर्थकांमुळे राजकीय वातावरण अधिक तापून येत असल्याचे आढळून येत आहे.