बेकायदा बांधकामांची पाठराखण केल्याचा नगरसेविकेचा आरोप

कल्याण : ठाकुर्ली-चोळे गावातील बेकायदा बांधकामांविरोधात दोन वर्षे पाठपुरावा करूनही कारवाई होत नसल्याच्या आणि माहितीही दिली जात नसल्याच्या निषेधार्थ चोळे प्रभागाच्या भाजपच्या नगरसेविका प्रमिला चौधरी यांनी सभा सुरू असताना आपल्या हातामधील बांगडय़ा नगररचना अधिकाऱ्यांच्या समोर फोडल्या आणि आयुक्तांच्या दिशेने भिरकावल्या. त्यामुळे आयुक्त गोविंद बोडके नाराजी दर्शवत सभागृहातून निघून गेले.

सभा सुरू होताच नगरसेविका चौधरी यांनी चोळे येथील बेकायदा बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला. चोळे प्रभागातील ३० फुटांपेक्षा अरुंद रस्त्यावर एका विकासकाला नगररचना विभागाने पाच मजली इमारत बांधण्यास परवानगी दिली होती. विकासकाने त्यावर दोन वाढीव बेकायदा मजले बांधले. चौधरी यांनी वाढीव बांधकामाची तक्रार केली असता, नगररचना विभागाने उडवाउडवीची उत्तरे देऊन विकासकाची पाठराखण केली, असा चौधरी यांचा आरोप आहे.

विकासकाने हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) वापरला नसल्याचे उत्तर नगरविकास विभागाने चौधरी यांना दिले. त्यानंतर वाढीव बेकायदा बांधकाम नियमित करण्यात आले, असे चौधरी यांनी सभागृहात सांगितले. आधी बेकायदा बांधकाम करायचे मग ते नियमित करायचे, असे कसे चालते, असा प्रश्न राहुल दामले, पवन भोसले, राजन सामंत, सुधीर बासरे यांनी साहाय्यक संचालक नगररचना मारुती राठोड यांना केला.

नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे यांनी या कामात कोणतीही अनियमितता नाही. विहित कायद्यानुसारच बांधकाम नियमित केले आहे, असे सांगितले. पवन भोसले, दामले, सभापती दीपेश म्हात्रे यांनी तुम्ही चुकीची माहिती नगरसेविकेला देऊ नका. हा विषय सामोपचाराने मिटवा, असे सांगितले. आयुक्त बोडके यांनी सविस्तर माहिती घेऊन देतो, असे सांगितले.

चोळे प्रभागातील अन्य एका विकासक प्रफुल्ल शहा यांनी रस्त्यात इमारतीचे बांधकाम केले आहे. इमारतीची संरक्षक भिंत रस्त्याला अडथळा ठरत आहे. त्यासंदर्भातील कारवाईवरील स्थगिती आदेश उठविण्यासाठी पालिकेने कोणतेही प्रयत्न करत नाहीत, असाही विषय चौधरी यांनी उपस्थित केला. ही वाढीव बांधकामे तोडून टाका, अशी आग्रही भूमिका चौधरी यांनी घेतली.

शिवसेनेच्या नगरसेविका शालिनी वायले यांनी महिलांचा आवाज दाबू नका. अधिकारी बेशिस्त आहेत, अशी टीका केली. अधिकारी उत्तरे देणार नाहीत, असे वाटल्यामुळे प्रमिला चौधरी यांनी हातातील बांगडय़ा काढून नगररचना अधिकाऱ्यांच्या टेबलावर फोडल्या. त्यानंतर सभा तहकूब करण्यात आली.

गुन्हा दाखल करणार

नगरसेविका प्रमिला चौधरी यांनी आयुक्त, नगररचना अधिकाऱ्यांच्या दिशेने बांगडय़ा फोडून फेकल्याने प्रशासनाने महाराष्ट्र प्रांतिक अधिनियमानुसार त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच, त्यांना नगरसेविका म्हणून अपात्र ठरविण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्याच्या हालचाली सुरू आहेत. लवकरच ही कारवाई करण्यात येणार आहे, असे प्रशासनातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला सांगितले. अधिकाऱ्यांच्या बाबतीत असे प्रकार वारंवार होऊ लागले तर त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती अधिकाऱ्यांच्या बैठकीत उपस्थित करण्यात आली.