पालघर जिल्ह्यतील नगर परिषद निवडणुकांत भाजपचा धुव्वा; तलासरीत माकप, मोखाडा शिवसेनेच्या ताब्यात

आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिवासीबहूल पालघर जिल्ह्य़ात नगर परिषद निवडणुकीत भाजपचा अक्षरश: धुव्वा उडाला आहे. जिल्हय़ातील तलासरी, मोखाडा आणि विक्रमगड या तीनही नगर परिषदेत सवरा यांना वर्चस्व राखता आले नाही. तलासरी नगर परिषद माकपने, तर मोखाडा नगर परिषद शिवसेनेने जिंकली आहे. विक्रमगड नगर परिषदेत कुठल्याच पक्षाला बहुमत मिळालेले नसले तरी भाजपला केवळ दोनच जागा मिळाल्या.

पालघर जिल्ह्यातील मोखाडा, तलासरी व विक्रमगड या तीन नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. कुठलाही अनुचित प्रकार न घडता शांततेत तब्बल ८४ टक्के मतदान झाले होते. सोमवारी मतमोजणीचा निकाल जाहीर झाला. त्यात भाजपचा दारुण परावभ झाला.

मोखाडा नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने तब्बल १३ जागा जिंकून आपले वर्चस्व दाखवून दिले आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. भाजपला केवळ एकच जागा मिळाली. तलासरी नगर परिषदेच्या एकूण १७ जागांपैकी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने तब्बल ११ जागांवर विजय मिळविला असून भाजपला केवळ ४ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे.

विक्रमगड नगर परिषदेत मतदारांनी कुठल्याच पक्षाला स्पष्ट कौल दिलेला नाही. एकूण १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत श्रमजीवी संघटनेच्या जागृती परिवर्तन पॅनलने सहा जागांवर, विक्रमगड विकास आघाडी आणि काँग्रेस या मित्रपक्षांनी सात जागांवर, भाजपने दोन जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एका जागेवर विजय मिळवला आहे. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने विक्रमगड विकास आघाडीला व श्रमजीवी जागृत पॅनलला सत्ता स्थापनेसाठी एकत्र यावे लागणार आहे.

ग्रामीण भागावर वर्चस्व मिळविण्यासाठी भाजपने कंबर कसली होती. पालकमंत्री विष्णू सवरा यांनी यासाठी आपली ताकद पणाला लावली होती. मात्र ग्रामीण भागातील जनतेने भाजपला सपशेल नाकारले आहे.