भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती सभापतिपदाची निवड प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडली. या निवडणुकीत भाजप पक्षाला आपले सहाही उमेदवार निवडणूक आणण्यास यश आले आहे.

महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतिपदाची मुदत ३१ मार्च २०२० मध्ये संपुष्टात आली होती. परंतु करोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचे आयोजन करण्यात आले नव्हते. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर २४ ऑक्टोबर रोजी  शहरातील सहा प्रभाग समिती सभापतिपदाकरिता अर्ज स्वीकारण्यात आले होते. त्यानुसार  मंगळवारी सकाळी ११ वाजल्यापासून  ऑनलाइन पद्धतीने टप्प्याटप्प्याने निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली.

यामध्ये मीरा-भाईंदर भाजप पक्षाला सहा प्रभागांत आपले सभापती निवडणूक आणण्यात  यश आले. प्रभाग क्रमांक १ मध्ये वैशाली राखली, प्रभाग २ मधून रक्षा भुकतानी, प्रभाग ३ मधून मीना कागणे, प्रभाग ४ मधून दौलत गजरे, प्रभाग ५ मधून हेतल परमार आणि प्रभाग ६ मधून सचिन म्हात्रे यांची निवड झाली. यापैकी प्रभाग २ आणि प्रभाग ६ पदाची निवड ही बिनविरोध झाल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. तर शिवसेना आमदार गीता जैन यांच्या गटातील नगरसेवकांनीदेखील भाजप उमेदवाराला मतदान केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू  झाली आहे.

नाराजांना थांबवण्याचा प्रयत्न

अपक्ष आमदार गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे त्यांच्यासह भाजप पक्षातील नाराज नगरसेवक गटदेखील जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे अशा नाराज नेत्यांना प्रभाग समिती सभापतिपद देऊन थांबवण्याचा प्रयत्न भाजप पक्षातून करण्यात आला असल्याचे दिसून आले. त्याचबरोबर यंदा पहिल्यांदाच निवडून आलेल्या नागरसेवकांना  जबाबदारी देण्यात आल्याची माहिती भाजप जिल्हा अध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी दिली.